आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार असं का वागतात ? (प्रकाश बाळ)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्याभोवती संशयाचा धुरळा उडवून घेतला आहे. या वेळी निमित्त घडलं आहे ते केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बारामती भेटीचं. ‘देशात बारामतीसारखी १०० गावं उभी राहिली तर भारत खऱ्या अर्थानं विकसित होईल,’ अशा शब्दांत पवार यांनी केलेल्या विकासाची जेटली यांनी वाखाणणी केली.

शिवाय ‘बारामतीत येऊन मी कृतकृत्य झालो,’ असेही उद्गार जेटली यांनी काढले.
पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळून जेटली परत गेल्यावर दोन-तीन दिवसांनी मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलताना पवार यांनी, ‘आज देशात घडणाऱ्या हिंसक घटनांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन केलं जात आह,े’ असं मतप्रदर्शन केलं. ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’ या नावाचं हे पुस्तक गांधीवादी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या डॉ. विवेक कोरडे या लेखकानं लिहिलं आहे.

आता गंमत अशी की, ‘देशात घडणाऱ्या हिंसक घटना’ म्हणजे संघ परिवारातर्फे घडवून आणण्यात येत असलेल्या घटना. पवारांनाही तेच अभिप्रेत आहे. अशा घटनांच्या निषेधार्थ विचार व उच्चार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अनेक लेखक व साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, तेव्हा अरुण जेटली यांनी त्याचं वर्णन ‘एक बेगडी व अर्थहीन राजकीय कृत्य’ असं केलं आहे. एका आठवड्याच्या अवधीतील पवार व जेटली यांच्या वरील विधानांत सर्वसामान्यांना प्रथमदर्शनी विसंगती वाटणं अगदी साहजिकच आहे. पण पवार आणि खुद्द जेटली व मोदीही तसं मानत नाहीत. किंबहुना अशी काही विसंगती आहे, हे एक डावे पक्ष सोडले, तर देशातील कोणताच राजकीय पक्ष मानत नाही. विशेष म्हणजे पवार यांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलावणारे गांधीवादी विचारांवर विश्वास ठेवणारेही मानत नाहीत. पवार ‘आपले’ आहेत असं हिंदुत्ववादी व पुरोगामी या दोघांनाही वाटतं, हे या ‘जाणता राजा’च्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य.

असं घडत असतं; कारण विकासात राजकारण आणता कामा नये, असा एक सोईस्कर पायंडा आता पाडून घेण्यात आला आहे. तो तसा पाडण्यात शरद पवार हे सर्वात आघाडीवर आहेत. त्यामुळं पवार यांच्या अशा राजकीय पवित्र्याला ‘संधिसाधू’ म्हटलं जात आलं आहे. विरोधकांनाच नव्हे, तर स्वतःच्या पक्षातील सहकाऱ्यांसह इतर अनेकांना पवार कसे ‘कात्रजचा घाट’ दाखवतात, याच्या कहाण्या रंगवून महाराष्ट्रात सांगितल्या जात असतात. त्याचबरोबर उत्तम संघटक आणि प्रशासनावर पक्की पकड व दांडगा जनसंपर्क असलेला राजकारणी अशीही पवार यांची प्रतिमा आहे. मात्र ‘पवार काय करतील हे सांगता येणार नाही,’ असा एक कायमस्वरूपी संशय त्यांच्याबाबत वाटत आला आहे. मात्र ‘संधिसाधू, चतुर’ अशी विशेषणं लावून पवार यांच्या या वागण्याचं जे विश्लेषण केलं जात आलं आहे, ते पुरेसं आहे काय? पवार (आणि इतर पक्षांचे बहुसंख्य नेते) असे वागतात, त्याचा येथील सामाजिक मानसिकतेशी काही संबंध तर नाही ना?

प्रगल्भ, जागरूक, संवेदनशील नागरिकांचा बनलेला समाज हा लोकशाही राज्यव्यवस्थेचा गाभा असतो. असा समाज आज भारतात नाही. उच्चार, विचार, आचार स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे जे समाजगट आहेत, ते अत्यल्प आहेत. बहुसंख्य समाज हा अजूनही ‘भारतीय नागरिक’ ही आपली प्राथमिक ओळख असल्याचं मानत नाही. त्याच्यासाठी जात, जमात, भाषा, प्रदेश याच ओळखी प्रथम येतात. शेवटी येते ते ‘भारतीय नागरिकत्व’. त्यामुळं लोकशाही राज्यव्यवस्था या आधुनिक प्रणालीनुसार मतदान होऊन त्याद्वारे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींतून सरकार स्थापन होत असलं, या सरकारनं नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत कारभार करायचा असला, तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. जनहिताचा कारभार कोणता पक्ष करील, या निकषावर प्रगल्भ नागरिक मतदार म्हणून त्या पक्षाच्या उमेदवाराला मत देईल, ही अपेक्षा असते. पण तसं होत नाही. प्रत्यक्षात मतदार हा ‘प्रगल्भ नागरिक’ नसतोच. किंबहुना नाहीच. त्याची मानसिकता ही अजूनही पारंपरिक सरंजामदारी समाजव्यवस्थेतीलच राहिली आहे. या व्यवस्थेत सरंजामदार (वा सुभेदार) हाच जनतेवर ‘राज्य’ करीत असतो. ‘राजानं मारलं, पावसानं झोडपलं, तर तक्रार कोणाकडं करायची,’ अशी जी म्हण आहे, ती दैववादी मनोवृत्तीच्या समाजाचं वर्णन करणारी आहे. तोच दैववाद आजही तेवढाच प्रबळ आहे. त्यामुळं प्रत्येक भारतीय हा ‘नागरिक’ असण्यापेक्षा ‘मतदार’ जास्त आहे आणि अशा या भारतीयाची मानसिकता ही ‘प्रजे’ची आहे, ‘नागरिका’ची नाही. त्यामुळं राज्यकर्ते व नागरिक अशा समीकरणाऐवजी आपल्या लोकशाहीत ‘राजा व प्रजा’ असं समीकरण प्रस्थापित झालं आहे.
...आणि अशा समीकरणात सरंजामदार हा ‘राजा’चा अंकित असतो आणि जो कोणी राजेपदी असेल, त्याची मर्जी सांभाळत आपली सत्ता व संपत्ती टिकवणं, यातच अशा सरंजामदाराला आपलं हित दिसत असतं. पवार यांच्या वागण्याला ही सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळं दिल्लीतील सत्तेत जे कोणी असेल, त्याची मर्जी सांभाळत राज्यातील आपली राजकीय सुभेदारी कायम ठेवणं, हे पवार यांच्या सगळ्या कारकीर्दीचं सूत्र राहिलं आहे. मग वेळ पडली तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडलीही आणि गरज भासली त्या वेळी या पक्षात ते पुन्हा गेलेही. आता काँग्रेसच्या हातची सत्ताच गेल्यावर आपली सुभेदारी टिकवण्यासाठी दिल्लीश्वरांची मर्जी राखण्याची गरज पवार यांना वाटत आहे. मोदी व जेटली यांच्या भेटी किंवा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना भाजपला दिलेला पाठिंबा हे निर्णय सुभेदारी टिकवण्याच्या धोरणाचाच भाग आहेत. अर्थात इतरांच्या तुलनेत पवार हे ‘चांगले’ राजकीय सरंजामदार आहेत. ते ‘प्रजे’ला पिडत नाहीत. तिचं शोषणही करीत नाहीत. मर्यादा फक्त एकच. सत्ता व संपत्तीला आव्हान न देण्याची. ‘प्रजे’पैकी कोणाच्या मनात असा विचार आलाच, तर त्याची एखाद्या निष्ठूर सरंजामदाराप्रमाणंच पवार गय करीत नाहीत. सुभेदारी टिकवण्यासाठी जनता (खरं म्हणजे रयत) आपल्या बाजूनं असायला हवी, याची जाण त्यांना आहे. त्यांनी केलेला ‘विकास’ हा ‘भारतीय नागरिकांचा हक्क’ म्हणून झालेला नाही. ‘रयतेचं हित’ जपतानाच आपली सुभेदारी दिल्लीतील ‘राजा’नं खालसा करू नये, यासाठी टाकलेली ती पावलं आहेत. त्यामुळं ‘प्रजा’ समाधानी आहे. म्हणून पवार कुटुंबीय गेली ५० वर्षे निवडून येत असतात आणि आपली सुभेदारीही टिकवून ठेवू शकतात.
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक)
prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...