आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचा निशाणा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ हे राजकारणाचे मुख्य सूत्र मानणाऱ्या पवारांनी राज्यातील प्रमुख महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालानंतर काहीसा वेगळा सूर आळवायला प्रारंभ केला आहे.
 
गेल्या दोन-तीन दिवसांतील पवारांच्या वक्तव्यांतून दोन बाबी प्रामुख्याने समोर येतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र यावे यावर जसा त्यांचा भर आहे तसाच त्यांचा रोख राज्यातील सरकार पडल्यास होणाऱ्या संभाव्य मध्यावधी निवडणुकांकडेही दिसून येतो. त्यामुळे पवार साधत असलेला हा निशाणा भाजपच्या यशावर आहे, सद्य:स्थितीत नेमके काय करावे ते सुचत नसलेल्या शिवसेनेवर आहे की आपल्याच पक्षाची गळती थांबवण्याचा हेतू त्यामागे आहे, ते समजावून घ्यावे लागेल.  
 
पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण सर्वज्ञात आहे. राजकीय ‘टायमिंग’ साधण्यात पवारांचा हात अन्य कुणी धरू शकत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल बाहेर येत असतानाच भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत त्यांनी केलेले सूतोवाच आणि त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेत झालेले आमूलाग्र परिवर्तन हे त्याचे अगदी अलीकडचे उत्तम उदाहरण. त्यामुळे नुकत्याच लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांबाबत ते काय भूमिका घेतात तसेच या निकालांचे विश्लेषण ते कशा पद्धतीने करतात ते औत्सुक्याचे होते. पण, या वेळी कारणमीमांसा वगैरेच्या भानगडीत पवार बिलकुल पडलेले नाहीत. जाहीरपणे तसे करणे त्यांनी टाळले आहे. उलट संधी मिळेल तेथे पवार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन शक्य असेल तिथे सत्ता स्थापन करावी हाच संदेश प्रामुख्याने देत आहेत. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पवारांना नुकतीच डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी नांदेड येथे आलेल्या पवारांना गाठून पत्रकारांनी राज्यातील सद्य:स्थितीबाबत छेडले असता त्यांनी मुंबईत महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. तसेच वेळ आल्यास अन्य पक्षांना पाठिंब्याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, असे सांगत प्रसंगी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेतही देऊन टाकले. तेवढ्यावरच न थांबता उद्या शिवसेनेने खरोखरच फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तर मध्यावधीला सामोरे जायची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. पण, या सगळ्यापेक्षा त्यांचा भर होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन शक्य तेथे सत्ता स्थापन करण्यावर. विशेष म्हणजे, ‘स्थानिक विषय नको, आपण केंद्रातील राजकारणावर बोलू’, असा पवित्रा माध्यमांसमोर काही काळापासून घेणारे पवार या निमित्ताने अगदी गावपातळीवरच्या राजकारणावर बोलू लागले आहेत, हे विचारात घेण्यासारखे आहे. 

त्यामागचे मुख्य म्हणजे भाजपची कार्यपद्धती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती. विरोधकांची विश्वासार्हता पूर्णपणे लोप पावल्याचे पाहून स्थानिक निवडणुकांत फडणवीस सरकार पद्धतशीरपणे डावपेच आखत आहे. नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय असो अथवा बहुसदस्यीय प्रभाग रचना असो त्यामागे पक्षाकडे पाहून मतदान व्हावे हाच मुख्य हेतू होता. या निवडणुकांच्या निकालानंतर तो हेतू चांगल्या प्रकारे साध्य झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे अन्य पक्षांतील मातब्बरांना सामावून घेऊन त्यांच्याच माध्यमातून विरोधकांचे स्थानिक बुरूज ढासळवण्याची भाजपची रणनीती अपेक्षेपेक्षाही यशस्वी होत असल्याचे पाहायला मिळते. विशेषत: जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सर्वाधिक प्रभाव आहे त्या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात भाजपची ही खेळी विजयाकडे झेपावत आहे. 

भाजपमध्ये होणारे हे सारे ‘इनकमिंग’ सत्तेच्या प्रभावामुळे आहे आणि असेच सुरू राहिले तर आहे त्या ठिकाणचीदेखील आपली ताकद कमी होण्यास फार वेळ लागणार नाही हे पवारांनी ताडले असणार. फार काळ सत्तेपासून दूर राहिल्यास पक्षात आणखी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू होण्याची शंकाही त्यांना भेडसावत असणार. त्यामुळेच कदाचित शक्य तिथे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करावी यावर पवारांनी आपला भर ठेवला असावा. तसे झाले तर अजूनही राज्यातील १५ ते १८ जिल्ह्यांमध्ये आपली सत्ता आहे, परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलेली नाही, असा दिलासा स्वपक्षाच्या स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांना देण्याचा हेतूही त्यामागे असणार. कारण,  भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या धक्क्यातून अनेक जण अद्यापही सावरलेले नाहीत. अशा स्थितीत कुंपणावरचे अनेक जण भाजपच्या चालत्या गाडीचा आसरा शोधण्याच्या मन:स्थितीत असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. त्यातून संभवणाऱ्या पक्षफुटीचा धोका टाळण्याचा उद्देश तूर्तास पवारांच्या वक्तव्यांमागे प्रामुख्याने दिसतो.
बातम्या आणखी आहेत...