आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकित्सक बुद्धीचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे मित्र शेषराव मोरे यांची अंदमानच्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली ही अत्यंत योग्य गोष्ट झाली. हे साहित्य संमेलन अंदमानात होत असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीला अर्पण केलेले आहे. शेषरावजी मोरे हे सावरकरांचे जागरूक, पण नितांत भक्त आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारसरणीला व बुद्धिवादाला उजाळा मिळेल यात शंका नाही. मोरे यांनी सावरकरांच्या हिंदुत्वावर व बुद्धिवादावर उत्तम ग्रंथ लिहिले आहेत.
माझा आणि शेषरावांचा परिचय त्यांच्या ‘गांधीजींनी आणि काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?’ या पुस्तकाच्या निमित्ताने झाला. त्या पुस्तकातील विचारांचा चिकित्सक अभ्यास करणारा प्रतिवाद नावाचा ग्रंथ राजहंस प्रकाशनाने दोन वर्षांपूर्वी काढण्याचे ठरविले. मला या ग्रंथाचा संपादक म्हणून काम करण्यास सांगितले. त्या ग्रंथात अनेक नावाजलेल्या अभ्यासकांचे शेषरावांच्या विचारांना धक्का देणारे व पारखून घेणारे लेख आलेले आहेत.
माझा स्वतःचा लेख त्यात असून शिवाय त्याला मोठी प्रस्तावनाही आहे. फाळणी हा विषय अजूनही लोकांच्या स्मरणातून गेलेला नाही. ज्यांनी फाळणी पाहिली असे फारच थोडे लोक आता शिल्लक असतील. तरीदेखील फाळणीचा विषय निघाला की अनेक लोकांच्या हृदयावर एक नवीन ओरखडा उठतो. मात्र, शेषराव मोरे यांचे प्रतिपादन फार वेगळेच होते. त्यांचे म्हणणे असे की फाळणी होणे हेच भारताच्या दृष्टीने योग्य होते. हैदराबाद निझामापासून स्वतंत्र झाले नसते. आपली वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती झाली नसती. तेव्हा झाले ते चांगलेच झाले असे मानून त्यांनी मागे वळून फाळणीकडे पाहायचे ठरवले होते.
त्यात शेषरावांचा मुख्य रोख असा होता की, गांधीजींना कळून चुकले होते की, फाळणी टाळता येणे अशक्य आहे. फाळणी हिंदूंना स्वीकारायला लावायची असेल तर त्यासाठी आपणाला फाळणीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही हे सिद्ध करून दाखवले पाहिजे. म्हणून गांधीजींनी बेचाळीसच्या लढ्याची हूल उठवली. तो लढा त्यांना करायचाच नव्हता. त्याची कोणतीही रूपरेषा गांधीजींनी ठरवलेली नव्हती. लढ्याची हूल उठवून ब्रिटिश सरकारशी वाटाघाटी करायच्या आणि त्या वाटाघाटींच्या वेळी फाळणीचा प्रश्न अनिवार्यपणे आल्यावर काँग्रेसला आणि हिंदूंना असे पटवून द्यायचे की फाळणीखेरीज स्वातंत्र्य मिळू शकत नाही.

हा सर्व युक्तिवाद मला तेव्हाही पटला नाही आणि आजही पटत नाही. गांधीजींनी पाकिस्तानला राजकीयदृष्ट्या कसा विरोध करायचा याचा अभ्यास चालू ठेवला होता. पाकिस्तानचा ठराव १९४० मध्ये मुस्लिम लीगने मंजूर केल्यावर गांधीजींची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, अहिंसक रीतीने मुस्लिम लीगच्या या ठरावाला कसा विरोध करायचा ते मला कळलेले नाही. परंतु, याचा अर्थ असा होत नाही, की गांधीजींना फाळणी हवीच होती. बेचाळीस सालच्या लढ्याची तयारी गांधीजींनी केली नव्हती हे म्हणणेही बरोबर नाही. बेचाळीसचा लढा करण्याची गरज गांधीजींना भासली ती अशामुळे की जपानी आक्रमणानंतर तेथील जनतेला वा-यावर सोडून इंग्रज अधिकारी व सैन्य यांनी घाईघाईने माघार घेण्याची योजना आखली होती. ओरिसा, तामिळनाडू आणि बंगाल या भागात गांधीजींच्या सहकारी मीरा बहेन (ह्या एका इंग्रज नाविक अधिका-याची कन्या होत्या) यांनी प्रवास करून याबद्दलची प्रत्यक्ष माहिती गांधीजींना सांगितली होती. तेव्हा गांधीजींना वाटले की, हिंदुस्थानचे रक्षण स्वतंत्र हिंदुस्थानच करू शकेल. त्यासाठी इंग्रजांचे साहाय्यही आपण घेऊ; पण युद्धाची सूत्रे स्वतंत्र हिंदुस्थानच्या हातीच असली पाहिजेत. यामुळे त्यांनी इंग्रजांना चालते व्हा, असा इशारा देऊन लढ्याची तयारी केली. या लढ्याची रूपरेषा त्यांनी त्यांचे सचिव महादेवभाई यांच्याकडे दिली होती. परंतु, ९ ऑगस्टला गांधीजींना पहाटेच अटक झाल्याने ही सर्व योजना तिथेच स्थगित झाली. तथापि, शेषराव यांनी आपल्या मनाशी गांधीजींना फाळणी हवी होती, हा निर्णय घेतलेला असल्याने या सर्व युक्तिवादाचा काहीच परिणाम त्यांच्यावर होणारा नव्हता.

आज आपली जी स्थिती आहे त्यावरून मागे जाऊन तेव्हाचे जे धुरीण होते त्यांनी काय निर्णय घेतले असावेत याचा तर्क करणे याला इतिहासाचे लेखन म्हणत नाहीत. जो निर्णय घेणारा असतो त्याला निर्णयाचे काय परिणाम होणार, याची नक्की खात्री असू शकत नाही. निर्णयाचे जसे अपेक्षित परिणाम असतात तसे अनपेक्षितही असतात. त्या अनपेक्षित परिणामांनीच इतिहासाला कलाटणी मिळते. तसे नसते तर इतिहास हा तर्कशास्त्राचा भाग होऊन गेला असता. असो. हा वाद बाजूला ठेवला तर सर्वांनाच हे मान्य करावे लागेल की मुस्लिम मनाचा, मुस्लिम तत्त्वज्ञानाचा फार सखोल अभ्यास शेषरावांनी केला आहे. त्यासाठी फारसी, उर्दू या भाषा ते शिकले. अनेक मुस्लिम धर्मगुरूंशी त्यांनी आदराने संवाद साधला. कुराणातील सुरांचा अर्थ लावताना त्या धर्मगुरूंचा सल्ला त्यांनी घेतला. अनेक हिंदुत्ववादी हे मुस्लिम धर्माविषयी आणि त्यांच्या विचारसरणीविषयी पूर्णपणे अज्ञानी असतात. शेषरावांचा हा विशेष आहे की, जे आपले प्रतियोगी आहेत त्यांची पूर्ण माहिती त्यांनी मोठ्या कष्टाने करून घेतली आहे.

इतके असले तरी शेषरावजी यांनी सावरकरांच्या अलीकडे मागे पडलेल्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा एक ठोस प्रयत्न गेली काही वर्षे केला आहे यात शंका नाही. शेषरावजी यांचे दुसरे गुरू प्रा. नरहर कुरुंदकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा यांच्यावर प्रखर टीका करणारी पुस्तके व लेख लिहिलेले आहेत. अशाही स्थितीत तशाच युक्तिवादाचा उपयोग करून सावरकरांच्या विचारसरणीतील सोने लोकांपुढे ठेवण्याचा चांगला उपक्रम शेषरावांनी गेली अनेक वर्षे केला आहे. शेषरावजी या नव्या साहित्य संमेलनात आपले सावरकरांविषयीचे विचार घासून-पुसून नव्याने मांडतील. त्यांनी मला स्वतःच सांगितले होते की, मुंबईत नोकरी करत असताना रात्रीच्या रात्री जागून त्यांनी सावरकर स्मारकाच्या अभ्यासिकेत सावरकरांच्या ग्रंथांचे सखोल वाचन केले होते. शेषरावजींची बुद्धी प्रखर असून स्वतंत्र आहे. त्यामुळे हे वाचन त्यांनी अतिशय चिकित्सकपणे केले होते यात शंका नाही. या चिकित्सकतेचा अभाव मराठीत हल्ली दिसून येतो. शेषरावजींच्या प्रेरक भाषणातून ह्या पारखून घेण्याच्या महाराष्ट्राच्या परंपरेला पुन्हा उभारी आली तर ती त्यांची मोठीच देण ठरेल.
गणित आणि तत्त्वज्ञान या विषयातील पीएचडी, आयआयटी मुंबई येथे अध्यापक. भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस, 'नवभारत' मासिकाचे संपादक.