आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघाचे ‘म्यँव’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेने 48 वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा केला तेव्हा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवूनही शिवसेनेची राजकीयदृष्ट्या किती अडचण झाली आहे, हे दर्शवणारी घटना घडली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून घोषित होईल, अशी अटकळ होती.

मात्र ऐनवेळी ‘डरकाळी’ फोडणा-या शिवसेनेच्या वाघाला भाजपपुढे ‘म्यँव’ करण्याची नामुष्की ओढवली. शिवसेनेच्या इतिहासात भाजपसमोर राज्य पातळीवरील विषयांवर लोटांगण घालण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या प्रवासात भाजप मोठा होत गेला आणि 2009 च्या निवडणुकीत तर तिने थेट सेनेला धोबीपछाड दिला. खरे तर विधानसभेच्या 60 जागा भाजपपेक्षा अधिक लढवूनही शिवसेनेला भाजपपेक्षा जागा कमीच मिळाल्या.

खरे तर तेव्हाच भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ झाला होता. मात्र तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात असल्याने पोपट मेला हे राजाला सांगणार कोण, असा विचार करून सारेच गप्प राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही व आपलेच सरकार असताना ते कधीही मुख्यमंत्रीही झाले नाहीत. पण त्यांचे नाव घेत त्यांच्या पद्धतीचे राजकारण करणारे उद्धव-राज ठाकरे यांनी मात्र या परंपरेला हादरा देत नवे समीकरण राज्याच्या राजकारणात उभे केले आहे.
आता प्रदीर्घकाळ युती करून, आपला खांदा वापरून भाजप आपल्यापेक्षाही मोठा पक्ष झाला आहे, हे सत्य शिवसेनेला पचवता आलेले नाही. त्यात केंद्रात एकहाती सत्ता आल्याने भाजपमध्ये प्रचंड आत्मविश्वास आला आहे. त्यामुळे भाजपने अधिक जागा जिंकल्या तरी आपल्या मोठ्या भावाच्या भूमिकेचा आदर ठेवून उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावे, ही संजय राऊत व मनोहर जोशी यांची मागणी भाजपसाठी गैरसोयीची होती.

निवडणुकीत ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा संकेत पाळण्यात येतो. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा अधिक आमदार निवडून आले असतानाही केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्याने मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देण्याची पाळी राष्ट्रवादीवर आली होती. आता परिस्थिती त्याच प्रकारची निर्माण झाली आहे.