आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संबंध बिघडवणारी राडेबाजी ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी खेळाडू, कलाकार आणि राजकारण्यांशी भारताने संबंध ठेवू नयेत या शिवसेनेच्या धोरणाचा उद्रेक होताक्षणी आयसीसीने, भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेवरील सामन्यातील पाकिस्तानी पंच अलिम दार यांना माघारी बोलाविले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांच्याशी बीसीसीआयची मुंबईतील बैठक सोमवारी उधळली गेल्यानंतर स्टार स्पोर्ट््स या वाहिनीनेही वसीम अक्रम व शोएब अख्तर या आपल्या दोन पाकिस्तानी समालोचकांना परत बोलावले आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील सलोख्याचे संबंध पुनर्प्रस्थापित करताना क्रिकेट या खेळाने नेहमीच शांतीदूताची भूमिका बजावली आहे. मात्र पाकिस्तान सीमेवर सतत कुरापती काढत असून भारताविरुद्ध कारवाया चालू ठेवत असताना त्यांच्याशी क्रिकेटचे संबंध नकोत याचा पुनरुच्चार शिवसेनेने केला आहे.
आतापर्यंत वैयक्तिक किंवा खासगी पातळीवरील पाकिस्तानी कलाकार आणि अन्य व्यक्तींच्या संबंधांना फारसे महत्त्व न देणाऱ्या शिवसेनेने आता व्यक्तिगत पातळीवरही विरोध करण्याचे धोरण स्वीकारले आहे. शिवसेनेचे आक्रमक रूप पाहता आणि पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता बीसीसीआयनेही नरमाईचे धोरण स्वीकारलेले सध्या दिसत आहे. भारतात क्रिकेट हा खेळ धर्मासारखा जपला जातो. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी क्रिकेटच्या व्यासपीठाचा वापर अधिक परिणामकारक करता येऊ शकतो याची कल्पना शिवसेना व अन्य राजकीय पक्षांनाही आहे. जे शस्त्र दोन कट्टर शत्रूंना एकत्र आणण्यासाठी उत्तम माध्यम किंवा मार्ग ठरू शकते तेच शस्त्र उलटले तर प्रचंड विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल व अन्य भ्रष्टाचारातून सध्या बाहेर पडत असलेल्या बीसीसीआयने सरकारशी आधी सल्लामसलत करूनच काही निर्णय घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट संबंध वृद्धिंगत करण्यापेक्षा परिस्थिती आहे तशीच ठेवणे महत्त्वाचे आहे.