Home »Editorial »Columns» Article On Social Issues

मानसिकता बदलण्याची गरज

डॉ. विवेक कोरडे | Jan 04, 2013, 22:37 PM IST

  • मानसिकता बदलण्याची गरज

दिल्लीत बसमध्ये झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेने केवळ राजधानी दिल्लीतच नव्हे, तर भारतातील बहुतेक शहरांतून जनमत खवळून उठले. समाजातला तरुणवर्ग या घटनेच्या निषेधार्थ संताप व्यक्त करत त्या तरुणीसाठी न्यायाची आणि स्त्रियांसाठी सुरक्षिततेच्या मागणीसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला. ज्या देशांमध्ये बलात्कारासारख्या घटनांमध्ये आणि एकंदरीतच न्यायव्यवस्थेमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये तत्परता आहे, कार्यक्षमता आहे, त्या देशांमध्ये महिलांच्या विरोधातल्या गुन्ह्यांमध्ये या गोष्टींमुळे घट झाली आहे का, हा खरा प्रश्न आहे आणि याचे उत्तर नाही असे असल्याने या प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.


कोणत्याही दंगलीची सर्वात जास्त झळ स्त्रियांना बसते. दंगलींमध्ये पुरुषाचा केवळ जीव घेतला जातो. पण स्त्रियांना केवळ बळी बनवले जात नाही तर त्यांची अब्रूही लुटली जाते. 2002च्या गुजरातच्या दंगलींमध्ये एका विशिष्ट समाजाच्या स्त्रियांना लक्ष्य करण्यात आले. बलात्कारासह अत्यंत हीन असे अत्याचार स्त्रियांवर करण्यात आले. या दंगलींच्या काळात पोलिस यंत्रणा केवळ निष्क्रिय नव्हती, तर या घटनांची मूक साक्षीदार बनून एका अर्थी या घटनांना मोकळे रान देऊन त्यातील भागीदार बनली होती. एक प्रकारे ही राज्य शासन पुरस्कृत अशी दंगल होती. या दंगलीत सामील असल्याचा आरोप असलेल्या (आणि आरोप सिद्ध झालेल्या) अनेकांना लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून दिले. या दंगली जाणीवपूर्वक घडू देणा-या नरेंद्र मोदींना गुजरातच्या जनतेने आता तिस-यांदा मुख्यमंत्रिपदी बसवले आहे. महिलांवर अनन्वित अत्याचार ज्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत घडवून आणले जातात, त्याला समाज जर विकासपुरुष समजून गौरवत असेल तर त्या समाजाच्या मानसिकततेत काही समस्या आहेत, असा त्याचा अर्थ होतो.


गुजरातच्या दंगलीत बलात्कारित झालेल्या स्त्रिया तुमच्या माझ्या माता-भगिनींसारख्या होत्या, की तुमच्या माझ्या माता-भगिनीच तेवढ्या स्त्रीत्वाचा आविष्कार घेऊन जन्माला आल्या आहेत, या प्रश्नाचे उत्तर मोदींना निवडून देणा-या समाजाला शोधावे लागले. बलात्काराच्या घटनांचा निषेध करतानाही हा समाज सिलेक्टिव्ह असतो. विशेषत: दलित स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध बहुधा दलित संघटनांनाच करावा लागतो. खैरलांजीत घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या वेळी ही गोष्ट प्रामुख्याने पुढे आली. खैरलांजीतल्या अत्याचाराला बळी पडलेल्या दलित स्त्रिया आणि अन्य समाजाच्या स्त्रिया या स्त्री म्हणून सारख्याच आहेत वा काही वेगळ्या आहेत, याचे उत्तर मेणबत्तीवाल्या समाजाला द्यावे लागेल.


महिलांवरील अत्याचारांचा, त्यांच्या अवहेलनेचा तारसुरात निषेध करणारे राजकारणी कोणत्या भाषेत बोलतात, त्याचाही विचार या ठिकाणी करणे योग्य होईल. गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नीचा उल्लेख, ती त्यांची पूर्वीची मैत्रीण असल्याने जाहीर सभेत ‘पचास करोड की गर्लफ्रेंड आपने कभी देखी है?’ असा प्रश्न जमावाला विचारून करतात. या खालच्या पातळीवरच्या विधानाचा निषेध केवळ काँग्रेसवाल्यांनी करायचा असतो. मग काँग्रेसचे खासदार भाजपच्या स्मृती इराणींना टीव्ही चॅनलवर ‘ठुमकेवाली औरत’ म्हणतात, तेव्हा त्याचा निषेध केवळ भाजपवाल्यांनी करायचा असतो. या घटनांचा अर्थ दुस-या पक्षाच्या महिला आणि आपल्या पक्षातल्या महिला यांचे स्त्रीत्व वेगळे असते, असा होतो का?


बलात्कार झाल्यावर गळे काढून निषेध करण्यात चढाओढ करणारे राजकीय पक्ष, सर्वच राजकीय पक्ष बलात्काराचा आरोप असणा-यांना निवडणुकीत उमेदवारी का देतात? गेल्या काही महिन्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांनी बलात्काराचे आरोप असणा-या 260 जणांना उमेदवारी दिली. इतर वेळी एकमेकांना ब्रह्मज्ञान शिकवणारे हे राजकीय नेते या कृतीतून कोणता संदेश जनतेला देऊ पाहत आहेत? स्त्रियांचा धर्म, जात, पक्ष पाहून सोयीस्करपणे अत्याचारांच्या घटनांकडे पाहण्याची ही मानसिकता संकुचित होत होत आपल्या घरापुरती मर्यादित झाली आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया तेवढ्या पवित्र आणि आदरणीय आहेत; बाकीच्या छेडछाड, टिंगलटवाळी आणि जमेल तेव्हा अत्याचार करण्यासाठीच आहेत, ही सर्वसाधारण समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय समाजात स्त्री सुरक्षित होणार नाही. कठोर कायदे व त्वरित न्याय या मागण्या योग्यच आहेत, परंतु समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ही गोष्ट त्याहून जास्त महत्त्वाची आहे. स्त्रीत्वाचा अपमान ही गोष्ट समाजाच्या इतकी अंगवळणी पडलेली आहे की कोणत्याही भांडणात आणि ब-याचदा अगदी साध्या संभाषणात आई-बहिणीवरून शिव्या देणे अगदी सहज म्हणून घडणारी बाब झाली आहे. याच घाणेरड्या शिव्या शाळकरी मुलेही देत असतात. अनेकदा स्त्रियांच्या समोरच या गोष्टी घडत असतात. पण त्याचे समाजाला काहीही वाटत नाही. इतका हा समाज संवेदनाहीन झालेला आहे. कायद्याच्या दृष्टीनेही शिव्या देणे हा गुन्हा अदखलपात्र आहे. येथूनच स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात होते.

Next Article

Recommended