आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Social Movement Current Condition By Sudhakar Jadhav, Divya Marathi

प्रेरणादायी चळवळीची शोकांतिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि अनेक विधायक कार्यांचे प्रेरणास्रोत राहिलेला गांधीजींचा सेवाग्राम आश्रम वर्तमानातही अधूनमधून चर्चेत असतो, तो चर्चिला जाऊ नये अशा कारणासाठी. जवळपास वर्षभर गांधीजींच्या चष्मा चोरीबद्दल चर्चेत राहिलेला आश्रम नव्या वर्षात देशभरातून तेथे जमलेल्या गांधीजींच्या शिष्योत्तमांनी आपल्या असंयमी वर्तनाने चर्चेत आणला आहे. निमित्त होते सर्वोदय चळवळीच्या सर्व सेवा संघ या शीर्षस्थ संस्थेच्या अधिवेशनात झालेल्या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे. निवडणुका आणि वाद याचा अतूट संबंध सर्वांना माहीत असूनही गांधीजींच्या आश्रमात आणि सर्वोदय चळवळीच्या शीर्षस्थ संस्थेत तो घडावा याबद्दल सर्वत्र आश्चर्य आणि नापसंती व्यक्त होत आहे. असे वाद सर्वत्र होत असतील तर सर्व सेवा संघात झाले म्हणून नवल वाटण्याचे खरे तर काही कारण नव्हते. प्रेम, अहिंसा आणि भाईचारा याचा संदेश देणा-या संस्थेत अध्यक्षाच्या निवडीवरून प्रकट झालेले हेवेदावे व वापरण्यात आलेली उग्र भाषा त्या संस्थेतील कार्यकर्त्यांचे झालेले पतन आणि दांभिकता दर्शवत असल्याने सर्वसामान्यांना हा प्रकार भावला नाही हे उघड आहे. सर्वसामान्यांची ही भावनादेखील कमी दांभिक नाही.

एरवी ते कार्यकर्ते न भांडता काही कार्यक्रम ठरवून आपापल्या गावी गेले असते तर समाजाने त्यांची दखलही घेतली नसती. त्यांच्या कार्यक्रमाची अजिबात दखल घ्यायची नाही; मात्र त्यांनी निरलस भावनेने कार्य करीत राहिले पाहिजे, असे मानायचे. ही समाजमनातील विसंगती आणि कार्यकर्त्यांच्या वागण्यातील विसंगती सारखीच आहे. समाजाचे अजून पूर्णपणे अध:पतन झाले नाही हा दिलासा समाजाला हवा असतो आणि तसा तो अशा संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे पाहून मिळत असतो. कार्यकर्तेही असा दिलासा समाजाला देणे आपला धर्म आहे असे मानून धर्मावतारी बनतात. हा धर्मावतार चळवळीतून येतो आणि चळवळ आहे तोपर्यंतच राहू शकतो याचे भान समाजाला नसले तरी कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे चळवळीचे औचित्य, चळवळीची प्रासंगिकता संपली तरी त्यासोबत आपला धर्मावतारही संपेल या भीतीपोटी चळवळ तिथेच संपवण्याऐवजी पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो. या प्रयत्नात चळवळीतील धर्मावतारी लोक मठाधिपती बनतात. सेवाग्राममध्ये घडले ते हेच. पण ही केवळ सर्वोदय चळवळीची शोकांतिका नाही. सर्वच आदर्श आणि प्रेरणादायी चळवळीची शोकांतिका आहे.


एका चळवळीतून ताकद घेऊन दुसरी चळवळ कशी पुढे जाते याचे चांगले उदाहरण सर्वोदय चळवळ आहे. स्वातंत्र्य चळवळीचे पुढचे पाऊल म्हणून, स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न म्हणून गांधींच्या सर्वोदयाला विनोबांनी नवा आशय आणि कार्यक्रम दिला. स्वातंत्र्यानंतरचे दशक विनोबांच्या भूदान चळवळीचे राहिले. हजारो कार्यकर्त्यांनी घरदार सोडून स्वातंत्र्य चळवळीसारखेच या चळवळीत काम केले. खरे तर एका दशकात ही चळवळही थांबली असती. कारण या चळवळीतून जेवढी कृषी जमीन दान मिळायची होती ती मिळून गेली होती. पण अशा वाटपातून प्रश्न सुटू शकत नाही हे विनोबांच्या वेळीच ध्यानी आले आणि त्यातून ग्रामदानाची संकल्पना आली. यामुळे चळवळीचे आयुष्य वाढले. पण मूलत: त्या वेळचा समाज कृषिप्रधान असल्याने समाजाची गरज म्हणून ही चळवळ चालली. समाजाची वाटचाल कृषिप्रधान समाजाकडून औद्योगिक समाजाकडे सुरू झाल्यानंतर कृषी आणि उद्योग यांचे परस्पर हितकारी संबंध निर्माण करणा-या चळवळीची समाजाला गरज होती. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी या चळवळीला राजकीय आयाम देत अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न केला. पण कृषिप्रधान समाजच चांगला या कल्पनेने ग्रस्त सर्वोदय समाज बदलाच्या आकलनात कमी पडला आणि समाजाची दिशा आणि सर्वोदय चळवळीची दिशा परस्परविरोधी झाली. इथेच सर्व सेवा संघाची सर्वोदय चळवळ संपली. उरला तो सर्व सेवा संघ नामक मठ. उरली ती मठातील सुविधा उपभोगण्यासाठीची मारामारी. प्रसारमाध्यमांत रंगवली गेली तशी शारीरिक हाणामारी तिथे झाली नाही, हे प्रत्यक्षदर्शी म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. योग्य वेळी चळवळ थांबली नाही किंवा चळवळीत नवी दिशा नवे कार्यक्रम स्वीकारण्याची क्षमता आणि दृष्टी नसेल तर काय घडू शकते हे सर्वोदय चळवळीने दाखवून दिले आहे.

इतर चळवळीसाठीदेखील हे तितकेच लागू आहे. महाराष्‍ट्रातील शेतकरी चळवळ याचे चांगले उदाहरण आहे. शेतीमालाच्या किफायतशीर किमतीच्या प्रश्नाला समाजात आणि सरकारात मान्यता मिळवून देण्यात यश प्राप्त केल्यानंतर शेतक-यांचे प्रश्न सुटले नसले तरी शेतकरी संघटनेच्या चळवळीची उपयुक्तता संपली होती. तिथेच या चळवळीचे विसर्जन झाले असते तर एकमेकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम शेतकरी नेत्यांना हाती घेण्याची संधी मिळाली नसती आणि शेतकरी संघटनेची व संघटनेच्या चळवळीत सामील हजारो कार्यकर्त्यांची आज झाली तशी परवड झाली नसती. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या काँग्रेस संघटनेची आणि स्वातंत्र्याच्या लढाईत सामील कार्यकर्त्यांची फरपट होऊ नये म्हणून तर गांधीजींनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. ज्या सर्व सेवा संघाची या लेखात चर्चा केली आहे तो सर्व सेवा संघ विसर्जित करण्याचा सल्ला आचार्य विनोबा भावे यांनी दिला होता. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनीदेखील शेतकरी संघटनेच्या विसर्जनासाठी योग्य वेळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. योग्य वेळी चळवळी, संस्था, संघटना विसर्जित झाल्या नाही तर त्या संस्था, संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कशी परवड होते याचे काँग्रेस, सर्वोदय आणि शेतकरी चळवळ उत्तम उदाहरणे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या देशातील सर्वात मोठ्या मानल्या गेलेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनलोकपाल आंदोलनालादेखील कुठे थांबायचे हे न कळल्याने आंदोलनाची वाताहत झाल्याचे आपण पाहिलेच आहे. ‘जो थांबला तो संपला’ असे म्हणतात . पण या सगळ्या चळवळींचा अनुभव लक्षात घेतला तर योग्य वेळी थांबत नाही तो संपतो, असे म्हणणे जास्त वास्तववादी ठरेल.


ssudhakarjadhav@gmail.com