आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नपूर्तीच्या विलंबाकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी मनाला असलेली अज्ञाताची ओढ जशी नवनवीन संशोधनांची प्रेरणा बनत आली आहे, तशीच ती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘सर्वांसाठी अंतराळ सफर’ या अंतराळ पर्यटनाच्या प्रकल्पाचीही प्रेरणा बनली आहे. ज्ञात विश्वाच्या पलीकडे असलेले वेगळे विश्व याची देही याची डोळा पाहता यावे असे कोणाला वाटत नाही? विज्ञानाने ते साध्यही केले आहे. मात्र, अजून ते सर्वसामान्यांसाठी साध्य बनलेले नाही. ज्यांच्याकडे खर्च करायला पैसा आहे, त्यांना ते साध्य करता आले पाहिजे या भावनेतून ब्र्रॅन्सन यांनी अंतराळ पर्यटनाची योजना आखली आहे. तिला मूर्त रूप येतायेताच स्पेसशिप २ या अंतराळयानाला ३१ ऑक्टोबरला अपघात झाला आणि सा-या जगात तो चर्चेचा विषय बनला. या यानाची ही दुसरी चाचणी होती आणि त्यात वापरल्या गेलेल्या प्लास्टिक इंधनाची पहिली चाचणी होती. ती यशस्वी झाली असती तर येत्या काही महिन्यांत एकावेळी िकमान सहा हौशी पर्यटकांना घेऊन हे यान अंतराळात झेपावले असते.
प्रत्येकी अडीच लाख अमेरिकन डॉलर खर्च करून जगभरातल्या ७०० हून अधिक व्यक्ती या अज्ञाताकडे डोळे लावून बसल्या आहेत. त्यात अनेक जगविख्यात गायक, अभिनेते आणि कलावंतही आहेत. दुस-या चाचणीच्या वेळी यानाला झालेल्या अपघातामुळे त्यांच्या छातीत धडकी भरली असेल का? सर ब्रॅन्सन यांच्या म्हणण्यानुसार अंतराळ सफर वाटते तितकी सोपी नाही, याची कल्पना त्या सफरीवर जाणा-यांना असतेच असते. त्यामुळेच त्यांच्या शौर्यावर शंका घेता येत नाही. ते खरेही आहे. जगभरातल्या अतिश्रीमंतांची संख्या पाहिली तर अडीच लाख अमेरिकन डॉलर हौसेखातर खर्च करण्याची क्षमता असलेले हजारोंच्या संख्येत नक्कीच असतील. त्यातल्या ७०० जणांनीच या सफरीसाठी नोंदणी केली आहे. त्यांची स्वप्नपूर्ती या अपघाताने किमान वर्षभर तरी पुढे ढकलली गेली आहे. अंतराळ सफर वाटते तितकी सोपी नाही आणि तिला सामान्य करणे तर त्याहूनही अधिक कठीण आहे, हेच त्यामुळे अधोरेखित झाले आहे.