आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमण्यांच्या निवा-याची गंभीर गोष्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही आई-आजी चिऊताईची गोष्ट सांगून घरातल्या लहान मुलांना जेवू-खाऊ घालतात; परंतु गोष्टीतल्या या चिमण्या हळूहळू भारतातल्या शहरांमधून हद्दपार, नाहीशा होताना दिसत आहेत. चिमण्यांचा चिवचिवाट आता मुंबई-ठाणे-पुण्यासारख्या शहरांमध्ये ऐकूदेखील येत नाही. याचे मूळ कारण म्हणजे वेगाने घडणारे काँक्रिटीकरण. मनुष्यप्राण्याच्या सहवासात राहणारी चिमणी अचानक शहरांमधून नाहीशी होऊ लागली, याची कारणे तशी बरीच आहेत.


पारंपरिक पद्धतीने बांधली जाणारी घरं, इमारती आता मुंबईसारख्या शहरांमधून दिसत नाहीत. पूर्वीच्या काळी घरं कौलारू असत, तसेच वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीच्या लाकडी फळ्यांच्या खिडक्या आणि तावदाने असत. अशा ठिकाणी चिमण्यांसारख्या छोट्या पक्ष्यांना सहज आसरा मिळे. कित्येकदा तिथेच या चिमण्या गवताच्या काड्यांपासून आपलं छोटंसं घरटं बनवीत. चिमणी कधीही झाडांवर घरटं करून राहत नाही; परंतु आताच्या नव्या बांधणीच्या घरांमध्ये या छोट्या पक्ष्यांना प्रामुख्याने चिमण्यांना घरटं करण्यासाठी छोटीशी का होईना, मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात साधारण पंचवीस अंडी देणारी चिमणी हळूहळू नाहीशी होऊ लागली आहे. अगदी लंडनसारख्या शहरांमधूनसुद्धा चिमणीचं प्रमाण गेल्या सहा वर्षांत साठ टक्क्यांहून कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर नेदरलँडसारख्या देशाने चिमणी हा पक्षी दुर्मिळ आणि नाहीसा होणारा पक्षी, असे जाहीर करून त्यास वाचवण्याचा अर्थात चिमणी संवर्धनाचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.


चिमणीचं प्रामुख्याने खाद्य धान्य आणि छोटे छोटे किडे-कीटक आहेत. पूर्वी शहरं आणि गावांमधून छोटी छोटी दुकानं असायची आणि गोण्यांमधून हे धान्य दुकानांमध्ये विक्रीस ठेवले जाई. आता मात्र शहरांमधून मोठी मोठी वातानुकूलित दुकानं आणि बंद प्लास्टिकच्या पिशव्यांमधून हे धान्य उपलब्ध होत असल्याने चिमण्यांच्या आहाराचा स्रोत बंद झाला आहे. त्याचबरोबर शहरांमधून उभे राहणारे, मोबाइल टॉवर आणि त्यांच्यामधून उत्सर्जित होणारे किरण यामुळे चिमण्यांसारखे छोटे आणि नाजूक पक्षी नाहीसे होत आहेत, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर हादेखील चिमण्यांच्या प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम करतो, असे सिद्ध झाले आहे. शिसेविरहित इंधन प्रदूषण कमी करते, असे म्हटले जाते; परंतु त्यांच्यापासून निर्माण होणारे बायप्रॉडक्ट्स हे मात्र चिमण्यांना हानिकारक असल्याचे सांगितले जाते.


इतर पक्ष्यांप्रमाणे चिमण्या स्थलांतर करीत नाहीत. अगदी शहरातल्या शहरातसुद्धा त्या आपले ठिकाण सोडून जात नाहीत. त्याचप्रमाणे इतर काही पक्ष्यांप्रमाणे चिमण्यांना धार्मिक परंपरेत स्थान नसल्यामुळे म्हणावे तसे चिमण्यांकडे लक्ष दिले जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व त्याचा सखोल अभ्यास करून मुंबईतील प्रमोद माने आणि सुधीर सकपाळ या तरुणांनी आपल्यासारख्याच समविचारी तरुणांना हाताशी घेऊन ‘स्पॅरो शेल्टर’ ही संस्था (www.sparrowshelter.org.in किंवा मोबाइल क्रमांक - 9867633355) जन्माला घातली आहे. ही संस्था पक्षिमित्रांना एकत्र आणते. ही संस्था चालवण्यासाठी मुळात प्रमोद माने आणि त्यांच्या मित्रांनी सर्वप्रथम स्वत: काही निधी जमा केला व त्यातून चिमण्यांसारख्या छोट्या पक्ष्यांसाठी मुंबई आणि परिसरातील गृह संकुलांमधील पक्षिप्रेमी नागरिकांशी थेट संपर्क साधला. त्याचबरोबर मुंबईतील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना या संकल्पनेची माहिती दिली. यातूनच या संस्थेच्या कार्याची ओळख मुंबईत आणि परिसरात होऊ लागली. आज हळूहळू का होईना, ही संस्था स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे आणि चिमण्यांच्या नष्ट होण्याबद्दल नागरिकांना जाणीव होत आहे. चिमण्या इमारतींमधून घरटं बांधू शकत नाहीत, एकीकडे पारंपरिक इमारती बांधल्या जात नाहीत. अशा वेळी चिमण्यांसाठी एखादं सुबक आणि उपयुक्त असं घरटं तरी बनवूया, या कल्पनेतून प्रमोद आणि सुधीर यांनी एक सुबक असे ‘स्पॅरो शेल्टर’ तयार केले. हेच स्पॅरो शेल्टर आज मुंबईत ब-याच इमारतींच्या गच्चीत किंवा पक्षिप्रेमी नागरिकांच्या खिडकीत दिसू लागले आहे.


हे आधुनिक घरटे शास्त्रीयदृष्ट्या बनवण्यात आले आहे. वजनाला अत्यंत हलके आहे. तसेच उत्तम आणि देखण्या रंगांनी सजवले असून, इमारतीच्या अथवा घराच्या बाहेरच्या भिंतीला अडकवण्यायोग्य आहे. त्याचबरोबर इमारतीची अथवा घराची शोभा वाढवण्यासदेखील मदत होत आहे. या छोट्याशा घरामध्ये चिमण्या आपले घरटे बनवू शकतात, तसेच अंडीदेखील घालू शकतात, हे घरटे त्या अंड्यांना व पिलांना मोठ्या पक्ष्यांपासून संरक्षण देण्यास उपयोगी पडते. मुंबईतील ब-याच शाळा, महाविद्यालये, राजभवन, महापौर निवासस्थान, मुंबई विद्यापीठ, राणीचा बाग आदी ठिकाणी ही ‘स्पॅरो शेल्टर्स’ बसवण्यात आली आहेत. मुंबईप्रमाणेच इतरही शहरांत या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास गोष्टीतली चिमणी प्रत्यक्षातही आपल्याला साद घालत राहील.


vikas.naik@dainikbhaskargroup.com