आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहारा ते बेसहारा (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१०-११ दरम्यान स्पेक्ट्रम व कोळसा घोटाळ्याच्या बातम्या जशा प्रसार माध्यमांच्या रोजच्या हेडलाइन्स बनू लागल्या तशी देशात “क्रोनी कॅपिटॅलिझम’ची चर्चा सुरू झाली. देशातील सर्वच आर्थिक नियतकालिकांमध्ये, वर्तमानपत्रांत, वृत्तवाहिन्यांवर उदारीकरणाच्या प्रक्रियेत नवभांडवलदारांचा वर्ग कसा वेगाने वाढत जात आहे याच्या सुरस कहाण्या सांगितल्या जात असत. बहुतांश कथा सक्सेस स्टोरीज म्हणून सांगितल्या जायच्या.

घरात अठराविश्वे दारिद्ऱ्य असलेला एखादा तरुण मेहनतीने कसा यशस्वी उद्योजक झाला व तो आता समाजाला त्याच्या संपत्तीची कशी परतफेड करत आहे, अशा प्रकारच्या कहाण्या रंगवून सांगितल्या जायच्या. अशाच कहाणीचा एक नायक कम उद्योजक होता सुब्रतो रॉय. ८० च्या दशकात लखनऊ, गोरखपूरमध्ये लॅम्ब्रेटा स्कूटरवरून स्नॅक्स विकणारे रॉय यांनी दोन दशकांत केवळ एक रुपयापासून दीड लाख कोटी रु.पर्यंत संपत्ती कशी कमावली याचा रंजकपट सांगितला जायचा. सहारा परिवाराचे मालक असलेले रॉय यांच्या व्यवसायाचा प्रचंड पसारा व संपत्तीचा इतका दबदबा होता की, बॉलीवूड ते राजकारण, क्रिकेट ते फॅशन दुनियेत काम करणारे बडे सेलिब्रिटी रॉय यांचे अदृश्य भांडवल होते. हे सेलिब्रिटी रॉय यांच्या घरच्या, समूहाच्या कोणत्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असायचे. सुब्रतो रॉय यांच्या सावलीत, त्यांच्या परिवारात एखादा सेलिब्रिटी सामील झाला की त्याच्या करिअरला वेगळे वळण लागायचे, त्याचे सोशल स्टेट्स वाढायचे, पेज थ्री पार्ट्यांचे ग्लॅमर वाढायचे.

भारतीय क्रिकेटही त्यातून सुटले नाही. रॉय यांनी भारतीय क्रिकेट टीम जवळपास ताब्यात घेतली. त्यांच्या प्रायोजकत्वामुळे भारतीय क्रिकेट इतके गर्भश्रीमंत झाले की, भारत हा क्रिकेटची एक मोठी बाजारपेठ बनला. क्रोनी कॅपिटॅलिझम हा भांडवलशाहीचा फुगा म्हटला जातो व हा फुगा कधी ना कधी फुटतो. भांडवलशाहीला अभिप्रेत असलेली नफेखोरी वेगळी असते, पण क्रोनी कॅपिटॅलिझम हा हपापाचा माल गपापा असतो. आपल्याच नातेवाइकांमध्ये, गोतावळ्यात वाटून घेतलेला नफा असतो. सुब्रतो रॉय यांचा एकूण कारभार या प्रकारचा होता. बाहेरून त्यांचे आर्थिक साम्राज्य चिरेबंदी वाटत असले तरी त्यांच्या सर्वच कंपन्यांमधील असलेली आर्थिक बेशिस्त, चिटफंड उद्योगात त्यांनी केलेल्या बारा भानगडी बऱ्याच होत्या. त्याच त्यांच्या अंगाशी आल्या आणि मुकाबला सरकार नामक अजस्र यंत्रणेशी आला. हा संघर्ष आता इतका शिगेला पोहोचला आहे की, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाचे ड्रीम वर्ल्ड समजली जाणारी सुमारे ३४ हजार कोटी रु.ची किंमत असलेली अॅम्बी व्हॅली लिलावात काढण्याचा आदेश देत रॉय यांच्या साम्राज्याच्या मुळावर घाव घातला.

ज्या सामान्य गुंतवणूकदारांनी सहारा समूहाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांचे पैसे परत देण्यासाठी मालमत्ता विकावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. यापूर्वी रॉय यांनी न्यायालयाला पाच हजार कोटी रु. परतावा देण्याचे आश्वासन दिले होते; पण हे केवळ आश्वासनच असल्याचे लक्षात आल्याने न्यायालयाला कायद्याचा दणका द्यावा लागला. आजपर्यंत न्यायालयाने सहारा समूहाच्या देशभरातील व परदेशातील सर्व मालमत्ता विकण्याचे आदेश दिले होते. त्या विकूनही गुंतवणूकदारांचे पैसे सहारा समूह उभा करू शकलेला नाही. त्यात अॅम्बी व्हॅलीचा लिलाव हा महत्त्वाचा टप्पा आहे. सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास व कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केल्यास कितीही प्रभावशाली उद्योजक असो, त्याच्यामागे कितीही बडे राजकीय नेते वा वकिली यंत्रणा असो, त्याला कायद्यापुढे नमावेच लागते याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सुब्रतो रॉय प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.  
 
केवळ न्यायालय नव्हे, तर रॉय यांचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणण्यात सेबीनेही बजावलेली भूमिका कौतुकास्पद अशी आहे. साडेसहा वर्षांपूर्वी सेबीकडे आलेल्या एका तक्रारीत सहारा समूहाने तीन कंपन्यांच्या मार्फत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून अवैध मार्गाने सुमारे २४ हजार कोटी रु. उभे केल्याचे नमूद केले होते. या तक्रारीचा खोलवर तपास करताना सेबीला सहारा समूहाच्या एकूण आर्थिक कारभाराचा उलगडा होत गेला. रॉय यांना अटक झाली तेव्हा देशात भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे, केजरीवाल यांचे आंदोलन सुरू होते. लोकपाल आणण्यावरून सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. अशा वातावरणात क्रोनी कॅपिटॅलिझमचा एक भांडवलदार सहज गजाआड झाला होता. ज्या सामान्य माणसाने आपल्या कमाईचा एक रुपया विश्वासाने रॉय यांच्याकडे सुपूर्द केला होता त्या रुपयाची परतफेड करण्याची ताकद आज रॉय यांच्याकडे नाही, हे वास्तव न्यायालयाने अप्रत्यक्षरीत्या आदेशातून दाखवून दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...