आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न व मानवतावाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या हा सामाजिकदृष्ट्या घोर चिंतेचा विषय आहे. आत्यंतिक निराश मनोवस्थेतील लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. भारतीय दंड विधान संहितेतील ३०९ व्या कलमान्वये आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा असून त्यासाठी एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे. मात्र, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे, असा दाखला नाही.

आत्महत्येचा प्रयत्न फसल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. खटला होऊन त्यानंतर सुनावली जाणारी शिक्षा भोगल्यानंतर त्या माणसाला आपण गुन्हेगार असल्याची टोचणी आयुष्यभर लागून राहते. या व्यक्तींचे आयुष्य त्यामुळे आणखीनच भरकटते. या विषयावर गेली दोन दशके देशात समाजसेवी गटांकडून अत्यंत विश्लेषक स्वरूपाची चर्चा होत होती. आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा समजण्यात येऊ नये अशीही मागणी केंद्र सरकारकडे केली जात होती. अखेर हे प्रयत्न फळाला आले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरविणारे ३०९ कलम रद्द करण्याची शिफारस विधी आयोगाने केली असून त्यावर केंद्राने आता शिक्कामोर्तब केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांचे पुढील आयुष्य बदनामीच्या भोव-यात न अडकता त्यांना सकारात्मक पद्धतीने ते जगावे म्हणून केंद्राने हे कलम हटविण्याचे ठरविले आहे.

भारतामध्ये सव्वा लाखापेक्षा अधिक लोक दरवर्षी आत्महत्या करतात. दक्षिण भारतातील राज्ये, पूर्वांचलातील राज्ये तसेच पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये आत्महत्या होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशामध्ये २०१२ मध्ये १५ ते २९ वर्षे व ३० ते ४४ वर्षे या वयोगटातील सुमारे ४६ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. अनेक कारणांनी नैराश्य येऊन युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात मोठे आहे. विविध प्रकारचा सोसावा लागणारा छळ व वैयक्तिक आयुष्यातील निराशा ही दोन महत्त्वाची कारणे महिलांच्या आत्महत्यांमागे असतात. आत्महत्येचा प्रयत्न फसलेल्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी उत्तम समुपदेशन व मानसोपचाराची गरज असते. त्यातूनच ही व्यक्ती पुन्हा नीट उभी राहू शकते. त्याला तुरुंगात डांबणे हा काही त्यावरील उपाय नाही. हा मानवतावादी विचार करूनच केंद्राने आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा न ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.