आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिरकणी’ सुशीलाबाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसर भगिनी विकास संघ या मुंबई येथील कचरावेचक महिलांसाठी काम करणा-या संघटनेच्या अध्यक्षा सुशीला साबळे यांना ‘हिरकणी’ पुरस्कार प्रदान झाला. महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनप्रवासाची ही ओळख.

‘संघटनेत येण्याआधी खांद्याला कच-याची झोळी अडकवून वणवण भटकत होते; आता पर्स अडकवून ऑफिसात जाते, संघटनेचं काम करते. संघटनेनं आम्हाला जगण्याचं बळ दिलं. आमचं आयुष्य बदललं...’ सुशीलाबाई साबळेंनी एका मुलाखतीत मोठ्या अभिमानाने, कृतज्ञतेने सांगितले होते. सुशीलाबाईंना सह्याद्री वाहिनीचा (रविवार, 9 मार्च रोजी सह्याद्री वाहिनीवर सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.) हिरकणी पुरस्कार मिळाला, ही बातमी ऐकून त्यांच्या या वाक्याची आठवण झाली.
1970 च्या दुष्काळात सुशीलाबाई साबळे आपली आई, मावशी, बहिणी यांच्यासह वयाच्या दहाव्या वर्षी मराठवाड्यातून मुंबईत आल्या. शिक्षण नाही, हातात पैसा नाही; मग बिनभांडवलाचा उद्योग म्हणून कचरा गोळा करण्याचे काम त्या मावशी व आईबरोबर करू लागल्या. वणवण भटकून, उकिरडे धुंडाळून पेपर, रद्दी, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पुठ्ठा असा कचरा गोळा करायचा आणि तो विकून कसाबसा दिवस ढकलायचा. दिवसाला पाच-दहा, कधी पंधरा रुपये मिळायचे. कालांतराने हे काम अंगवळणी पडले, त्यातील खाचाखोचा समजल्या. कच-याला थोडा चांगला भाव येऊ लागला; पण काटेवाले फसवायचेच. अडीअडचणीला मग वस्तीतील सावकारांचा काय तो आसरा. हातावर पोट असणा-या कचरावेचक कुटुंबांना वीस-बावीस टक्के चढ्या भावाचे हे कर्ज फेडताना नाकी नऊ यायचे.
सुशीलाबाईंचे आयुष्यही असेच चालले होते; पण 1998 नंतर सुशीलाबाईंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 1998 मध्ये मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटना या स्त्रियांच्या चळवळीतील अग्रगण्य संघटनेने वस्तीपातळीवरील कचरावेचक महिलांना संघटित करण्याचे काम सुरू केले. ‘परिसर विकास’ या प्रकल्पाअंतर्गत संघटित या महिलांना ‘परिसर भगिनी’ ही नवी ओळख मिळाली. वस्तीत बैठका होऊ लागल्या. महिलांना बचत गटांचे महत्त्व समजावून सांगितले जाऊ लागले. सावकाराच्या पाशातून सुटका हवी असेल, तर बचत गटांच्या माध्यमातून अंतर्गत कर्जव्यवहार करा, आर्थिक व्यवहार समजून घ्या, पर्यायी कौशल्ये संपादन करा, असे आवाहन संघटनेने या महिलांना केले. संघटनेने नेतृत्व विकास शिबिर घेतले, सुशीलाबाई घाटकोपरच्या पाइपलाइनलगतच्या परिसरात कचरा वेचायच्या. पुढे बचत गटाची कार्यकारिणी निवडण्यात आली व परिसर भगिनी विकास संघाची रीतसर नोंदणी करताना अध्यक्षपद साहजिकच सुशीला साबळे यांच्याकडे आले. आपल्याला शिक्षणाचा गंध नाही; मग हे काम आपल्याला कसे जमावे, अशी भीती सुशीलाबाईंच्या मनात सुरुवातीला आली; पण त्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्या जिद्दीने लिहिणे-वाचणे शिकल्या. त्यांच्या नेतृत्वावर बायकाही खुश होत्या. कचरावेचकांचे शिक्षण, आरोग्य, अस्थिर उत्पन्न, समाज तसेच महापालिकेकडून उपेक्षा, त्यांच्या कामाचे महत्त्व हे प्रश्न समजून घेऊन ते लोकांपुढे मांडणे त्यांना चांगले जमायला लागले.
आज सुशीलाबाई स्त्रीमुक्ती संघटनाअंतर्गत परिसर भगिनी विकास संघाच्या अध्यक्षा आहेत. या संघटनेमार्फत त्या 180 बचत गटांतील 2000 महिलांचे नेतृत्व करत आहेत. मुंबईमध्ये या संघटनेचे काम चालते. संघटनेतर्फे मोठमोठे उद्योगसमूह, हाउसिंग सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करणे, साफसफाई, नैसर्गिक खताचे पिट्स बांधणे, खत तयार करणे इत्यादी कामांची कंत्राटे घेऊन त्यामार्फत प्रशिक्षित परिसर भगिनींना रोजगार मिळू लागला. त्यांची वणवण थांबली. कचरावेचकांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खास निधी गोळा करून तसेच त्यांच्यासाठी खास वर्ग आयोजित करून पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला. ‘मला नव-याने नाही; मी नव-याला सोडले,’ असे सुशीलाबाई तडफदारपणे सांगतात. कामधंदा न करणा-या व्यसनी नव-याला सोडून लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत पोटात मूल असतानाच, त्या माहेरी आल्या. त्यानंतर खंबीरपणे आणि जिद्दीने त्यांनी आपले व मुलाचे आयुष्य सावरले. मुलाला शिकवले. त्यांच्या मुलाने - अरुणने औरंगाबाद विद्यापीठातून उद्योग व्यवस्थापनाची पदवी घेतली. तो आता एका कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आईबद्दल त्याला खूप अभिमान आहे.
भारतात विविध परिषदा, कार्यक्रम यांमध्ये सुशीलाबाईंनी कचरावेचकांचे प्रश्न मांडलेच; पण त्यांनी परदेशातही चार आंतरराष्‍ट्रीय परिषदांना हजेरी लावली आहे. कोपनहेगन आणि बीजिंग (2010), डर्बन (2011) या हवामान बदलाच्या संदर्भातल्या आणि रिओ-दि-जानेरिओ (2012) येथील पर्यावरण परिषदेत त्यांनी भारतातील कच-याचा पुनर्वापर, कचरा जाळण्याचे दुष्परिणाम आणि कचरावेचकांच्या समस्या याविषयी मांडणी केली.निरक्षर असूनही सुशीलाबाई सुंदर गाणी रचतात, गोड आवाजात गातात. आंबेडकरांची आणि बुद्धाची त्यांनी रचलेली गाणी दाद मिळवणारी आहेत. अख्खं पंचशील त्यांना मुखोद्गत आहे. त्यांचा आत्मविश्वास, मुद्देसूद ठोस मांडणी, अस्सल मराठवाडी बोली, गोड गळा याने त्या सभा जिंकून घेतात. असंघटित क्षेत्रातील स्त्रियाही स्वाभिमानाने जगू शकतात, याचा आदर्श आयुष्य आनंदाने, भरभरून जगणा-या सुशीलाबाईंनी घालून दिला आहे.