आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजिकिस्तानातील तळाचे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य आशियाई देशांशी विविध पातळ्यांवर सहकार्य वाढवून त्या क्षेत्रातील आपले सामरिक हितसंबंध जपण्याचा भारताचा कायम प्रयत्न राहिला आहे. अलीकडील काळात या सहकार्याला अधिक व्यापक स्वरूप येऊ लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने ताजिकिस्तानबरोबरचे लष्करी सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच भारत ताजिकिस्तानला पुरवणार असलेल्या हेलिकॉप्टरचे हस्तांतर आणि भारताने ताजिक सैनिकांसाठी उभारलेल्या रुग्णालयाचेही उद्घाटन होण्याची शक्यता आहे. भारत तेथे आपला हवाई तळ सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी नाटोच्या फौजा अफगाणिस्तानातून माघारी गेल्यावर ताजिकिस्तानबरोबरच्या वाढत्या सामरिक सहकार्याला महत्त्व येणार आहे.

सुमारे पावणेसहा कोटी लोकसंख्या आणि सुमारे 40 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मध्य आशियाचे स्थान भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या मध्य आशियातील देशांशी संबंध विकसित करण्यात भारताप्रमाणेच अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे. वेगाने आर्थिक विकास करणा-या भारतासाठी ऊर्जा सुरक्षेच्या तसेच आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक दृष्टीनेही मध्य आशियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण या देशांमध्ये ताजिकिस्तानचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन त्याच्याशी लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्या सामरिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 2003 मधील ताजिकिस्तानचा दौरा त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला होता. त्या वेळी ताजिकिस्तानची अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा आणि पाकव्याप्त काश्मीरशी असलेली जवळीक लक्षात घेऊन त्याच्याशी भारताने संरक्षण सहकार्य करार केला होता. तसेच तेथे भारताचा परकीय भूमीवरील पहिलावहिला हवाई तळ स्थापन करण्यासाठी भारत-ताजिकिस्तान-रशिया असा त्रिपक्षीय करार झाला होता. त्या करारानुसार ताजिकिस्तानातील ऐनी येथील हवाई तळाचे पुनरुज्जीवन करून तेथे आपली लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यासाठी भारत इच्छुक आहे. या तळाचे काम पूर्ण झालेले असले तरी ताजिक सरकारने भारताच्या त्या योजनेबाबत अजून सकारात्मक भूमिका घेतलेली नाही.

भारतासाठी ऐनीचा हवाई तळ सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असला तरी त्यासाठी दुशान्बेची मान्यता मिळेपर्यंत भारताला प्रयत्न करत राहण्याशिवाय पर्याय नाही. मात्र त्यामुळे परस्परांतील सामरिक सहकार्यावर परिणाम होऊ न देता दोन्ही देश अन्य मार्गांचा अवलंब करून लष्करी संबंध विकसित करत आहेत. सध्या ऐनीच्या तळावर भारताचे शंभर लष्करी अधिकारी आणि जवान तैनात असले तरी ते प्रामुख्याने ताजिकिस्तानच्या लष्करी दलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. तसेच ताजिकिस्तानच्या दक्षिणेला अफगाणिस्तानच्या सीमेवर वसलेल्या फारखोर येथे भारताने इंडिया-ताजिकिस्तान फ्रेंडशिप हॉस्पिटल उभारले आहे. त्याद्वारे ताजिक लष्कर आणि आसपासच्या परिसरातील सामान्य जनतेला आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे. ताजिकिस्तानच्या विनंतीवरून त्याला दोन एमआय-17 हेलिकॉप्टरही पुरवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांच्या लवकरच होऊ घातलेल्या ताजिकिस्तान दौ-यात या हेलिकॉप्टरचे हस्तांतर आणि त्या फील्ड हॉस्पिटलचे उद््घाटन होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर त्याविरोधात लढणा-या अहमद शाह मसूदच्या नॉर्दर्न अलायन्सला भारताने ताजिकिस्तानातील फारखोरच्या तळावरूनच वैद्यकीय मदत पोहोचवली होती. त्या वेळी भारताने तेथे उभारलेल्या रुग्णालयात नॉर्दर्न अलायन्सच्या जखमी सैनिकांवर उपचार केले जात होते. तेथे आता भारताने अत्याधुनिक रुग्णालय उभारले आहे.

मध्य आशिया चीनसाठीही सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो तेथे आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. त्याचबरोबर नाटोच्या फौजा माघारी गेल्यावर अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढवून तेथे पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन करण्याचा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ऐनीच्या हवाई तळाचा वापर पाकिस्तानवर दबाव ठेवण्यासाठीही होणार असल्याने पाकिस्तानने भारताच्या तत्संबंधीच्या हालचालींबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ताजिक राजधानी दुशान्बेच्या उत्तरेस असलेल्या ऐनी येथील हवाई तळाची भारताने 2007 मध्ये पुनउभारणी पूर्ण केलेली आहे. भारताच्या सीमा रस्ते संघटनेने (बीओआर) या तळावर विमानांच्या देखभालीसाठीचे हँगर बांधले आहेत. तेथे लढाऊ विमाने ठेवण्याची परवानगी मिळाल्यास भारत आपली मिग-29 ही स्वनातीत (सुपरसॉनिक) बहुउपयोगी विमाने आणि काही हेलिकॉप्टर तैनात करण्याची शक्यता आहे. म्हणूनच भारताचा हा तळ नजीकच्या काळात सुरू झाल्यास अफगाणिस्तानमधील तालिबानी शक्ती आणि पाकवर दबाव ठेवत भारताच्या सामरिक हितांचे रक्षण करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.