Home »Editorial »Columns» Article On The Role Of Media On Public Protest

क्रांतीच्या फसव्या दृश्यप्रतिमा

शेखर देशमुख | Jan 04, 2013, 22:34 PM IST

  • क्रांतीच्या फसव्या दृश्यप्रतिमा

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाबद्दल जनतेत प्रचंड कुतूहल असते. सबंध देश अण्णा हजारेंच्या पाठीशी उभा असल्याचा माहोल टीव्हीवर दिसत असतो. डोक्यावर पांढरीशुभ्र गांधीटोपी, पांढराशुभ्र सदरा आणि धोतर नेसलेले अण्णा हजारे ‘लाखो’ अनुयायांसह राजघाटावर येतात. मोक्याची जागा बघून मौनव्रतात जातात. फ्रेमच्या मधोमध ध्यानस्थ अण्णा आणि दोन बाजूला त्यांचे निष्ठावंत अनुयायी. टेलिव्हिजन मीडियाच्या दृष्टीने हे दृश्य दुस-या कुठल्याही दृश्यापेक्षा शतपटींनी ‘एक्सायटिंग’ आणि ‘सेलेबल’ असते... हेच दृश्य मग दिवसभरात पुन:पुन्हा प्रसारित होत राहते. जनमानसाचा अचूक ताबाही घेते. दुस-या एका दृश्यात पंतप्रधानांच्या घरावर चाल करून गेलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांचे आक्रमक अनुयायी दिसत असतात. केजरीवालांच्या डोळ्यांत व्यवस्थेविरोधातली आग एकवटलेली असते. चेहरा संतापाने लालेलाल झालेला असतो. व्यवस्थेची बंधने तोडून पुढे जाऊ पाहणारे केजरीवाल ‘अँग्री यंग मॅन’च्या आवेशात पोलिसांना आव्हान देत असतात. डोळ्यांत अंगार साठलेली केजरीवालांची ही प्रतिमा कुठल्याही दृश्यापेक्षा हजारपटींनी सेन्सेशनल असते... रामलीला मैदानावर सरकारला जाहीर आव्हान दिलेले अण्णा हजारे जनतेच्या दृष्टीने जिंकलेले असतात. त्यांच्या देहबोलीत तो विजयी भाव जाणवत असतो. अशाच एका क्षणी ते आव्हानात्मक नजर देत लोडाला टेकून आडवे पहुडलेले असतात. टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडियासाठी ‘स्लिपिंग बुद्धा’च्या प्रतिमेशी मिळतेजुळते ते दृश्य दुस-या कुठल्याही दृश्यापेक्षा एक्सायटिंग असते...धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांना फाशी व्हावी, या मागणीसाठी दिल्ली रस्त्यावर आलेली असते. सरकारविरोधी नारेबाजी टिपेला पोहोचलेली असते. तेवढ्यात बाबा रामदेव हिंदी सिनेमातल्या सुपरहीरोच्या थाटात वाहनावर स्वार होत ‘जंतरमंतर’वर अवरतात. मीडियाच्या साक्षीने आपल्या उग्र शापवाणीने सरकारला भस्म करू पाहतात. भगव्या वस्त्रांतल्या एका संन्याशाने व्यवस्थेला आव्हान देणारे ते दृश्य दुस-या कुठल्याही दृश्यापेक्षा लाखपटींनी सेन्सेशनल असते. दुर्दैवी तरुणीवर बलात्कार करणा-यांना ताबडतोब फाशी द्या, अशी एकमुखी मागणी घेऊन रात्रीच्या वेळी समस्त देश रस्त्यावर आलेला असतो. अंधा-या फ्रेममध्ये झळकणारी हजारो-लाखो जळत्या मेणबत्त्यांची विविधाकृती आरास बघणा-याच्या मनाचा ताबा घेत असते... अशा प्रकारे एकामागोमाग एक दृश्यप्रतिमा टीव्हीवर, वर्तमानपत्रांत अवतरत जातात. त्यातून नवीनवी प्रतीके लोकांच्या मनावर ठसवली जातात. याच प्रतिमा आणि हीच प्रतीके पुढे क्रांतीचे आभासी जग निर्माण करत राहतात.


प्रेक्षकांत उत्तेजना निर्माण करणा-या सनसनाटी दृश्यप्रतिमा ही टीव्ही मीडियाची पहिली मागणी असते. ‘कुछ भी करो लेकिन सेन्सेशनल व्हिजुअल्स लाओ’ हा बहुसंख्य चॅनलच्या न्यूजरूममधला कडक आदेश असतो. अशी व्हिज्युअल्स मिळेपर्यंतचा धीर सुटला की ती मिळवण्यासाठी संबंधितांना हाताशी धरून बिनदिक्कत सेन्सेशनल व्हिज्युअल निर्माण केली जातात. एकदा हे साधले की यानंतर आपसूकच सनसनाटी दृश्यप्रतिमा मिळण्याची तरतूद झालेली असते. कारण दृश्यप्रतिमांच्या प्रेमात पडलेला हा समाजच पुढे त्यांचा मुख्य पुरवठादार होत जातो. निमित्त आंदोलनाचे असो वा उत्सवाचे, या दृश्यप्रतिमा बघणा-याला जितक्या उत्तेजना देतात, तितक्याच एखाद्या व्यक्ती वा समूहाला त्या दृश्यप्रतिमांचा स्वत: एक भाग होण्यासही उद्युक्त करतात. त्यातून दृश्यप्रतिमांचे आकर्षण वाढीस लागून त्याला विकृतीचे स्वरूप येऊ लागते. अशा वेळी क्षणिक दृश्यप्रतिमांनी संमोहित झालेला समाज क्रांती घडवण्याच्या नव्हे, तर रोजच्या जगण्यात गमावलेले ‘थ्रिल’ मिळवण्यासाठी त्या प्रतिमांचा एक भाग होण्यासाठी रस्त्यावर उतरू लागतो.


अलीकडच्या काळातील जनतेच्या मनातील भ्रष्टाचाराबद्दल असलेली चीड, दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर उसळून आलेला जनक्षोभ हे सगळे अस्सल आहे, असे वरवर भासत असले तरीही प्रत्यक्षात मात्र क्रांतीची भाषा करणा-या या समाजाचा फसव्या दृश्यप्रतिमांनी पूर्ण ताबा घेतलेला आहे. ‘फिल्म-फॅशन-फूड-फन’ अशी जीवनशैली जपत क्रांती घडून येईल, असा या समाजाने स्वत:चा समज करून घेतलेला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो तो दुस-याला ढकलून या दृश्यप्रतिमांचा एक भाग होण्यासाठी धडपडत आहे. एकीकडे दृश्यप्रतिमांच्या प्रभावामुळे उफाळून आलेल्या जनतेतल्या उद्रेकाला विधायक वळण देण्याऐवजी नैतिकतेचा विलक्षण दंभ असलेले अण्णा समाजसुधारकाच्या प्रतिमेच्या प्रेमात अडकले आहेत आणि वैचारिक अधिष्ठान नसलेल्या केजरीवालांना स्वत:ची क्रांतिकारक अशी प्रतिमा जनमानसावर ठसवण्याची प्रचंड घाई झालेली आहे. त्यांच्या आंदोलनाला ना तात्त्विक बैठक आहे; ना वैचारिक अधिष्ठान; ना नेतृत्वाचा नैतिक धाक. म्हणूनच त्यांची आंदोलने वेळोवेळी ‘हायजॅक’ होताना दिसत आहेत. त्यात समाजकंटक धुडगूस घालताना दिसत आहेत. कसाबला विजय चौकात फाशी द्या, बलात्कारी तरुणांच्या शरीराचे तीन तुकडे करा, पंधरा दिवसांत लोकपाल मंजूर करा, अशा भावनिक मागण्यांचा पाठपुरावा करणारे मीडियातले तथाकथित ‘जाणकार’ विचार-विवेकाला फाटा देऊन समूहाला दिशा देण्याऐवजी त्याला चेतवण्याचेच काम अधिक त्वेषाने करत आहेत. टीआरपीची बकासुरी भूक असलेला टीव्ही मीडिया आणि ती भूक भागवण्यासाठी सदा उत्सुक असलेला प्रतिमेच्या प्रेमातला निर्नायकी समाज, हे खरे तर आजचे शोचनीय वास्तव आहे. परंतु असा प्रतिवाद कुणी केला की जनता रस्त्यावर उतरली आहे. तीच आता देशात इजिप्तसदृश ‘जास्मिन रिव्होल्यूशन’ घडवून आणणार आहे, अशी बालिश विधाने केली जाताहेत. मुळात नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या नेतृत्वाविना जगातल्या चळवळी यशस्वी झाल्या आहेत का? गोखले, टिळक, गांधी, नेहरू अशा लोकोत्तर नेतृत्वाविना केवळ जनतेच्या बळावर 15 आॅगस्ट 1947 रोजी देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला असता, हा विचार स्वत:ची घोर फसवणूक करणारा आहे.


31 डिसेंबरच्या रात्री अवघा देश बलात्कारपीडितेच्या आदल्या दिवशीच झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत होता, निदान चॅनलवाल्यांनी तरी तसे दाखवले होते. त्या वेळी भारताचाच एक अविभाज्य घटक असलेल्या मुंबईतील कांदिवली उपनगरात (जेथील एका भागात 10 दिवसांपूर्वीच अपघाती मृत्यू पावलेले अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते.)असलेल्या दारूच्या दुकानांपुढे ‘संवेदनशील’ नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. अभ्यंकरांच्या सोसायटीत राहणारे ‘पापभीरू पांढरपेशे’ डीजेच्या तालावर ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’ वगैरे गाण्यांच्या तालावर डोलत होते. एक्साइज डिपार्टमेंटकडून रीतसर परवाना घेऊन सामिष आहारासह मद्यपानाचा भरपेट आस्वाद घेण्यात दंग होते. ‘सामाजिक जाणिवेपोटी’ दुस-या दिवशी यातल्याच अनेकांनी ‘दामिनी’ला श्रद्धांजली वाहण्यासाठी काढण्यात आलेल्या‘कँडल मार्च’मध्ये भागही घेतला होता. देशातल्या समस्त जाणकारांच्या मते, केंद्रातले विद्यमान सरकार आणि त्यातले राजकारणी भ्रष्टाचारी आणि नपुंसकही आहेत. तसे ते असतीलही; परंतु चंगळवादी जगण्याची घडी बिघडू न देता रस्त्यावर येणा-या अशा दांभिक समाजात क्रांती घडून येते का, हेही दुस-या स्वातंत्र्ययुद्धाचा आभास निर्माण करणा-यांना जाहीरपणे विचारण्याची वेळ आता आली आहे.

Next Article

Recommended