आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रॅफिक जाम’मुळे कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात दिल्ली-गुडगाव मार्ग व कर्नाटकातील बंगळुरू ही शहरे अभूतपूर्व ट्रॅफिक जाममुळे सोशल मीडिया व टीव्हीच्या बातम्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली होती. ट्रॅफिकमुळे रस्त्यांवर दिवसभर ताटकळत राहावे लागल्याने हजारो वाहनधारकांचा संताप अनावर झाला होता. ज्या रुग्णांना उपचाराची तातडीची गरज होती त्या रुग्णांच्या हालाला पारावार उरला नाही. बंगळुरूमध्ये तर रेस्क्यू बोटींच्या मदतीने सखल भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बंगळुरूमध्ये स्थानिक बससेवेचा संप असूनही तिथे वाहने चार ते पाच तास अडकून पडली होती. आपात्कालीन व्यवस्थेने नेहमीप्रमाणे धोका दिला. जनता व प्रशासन यांच्यातील संबंध तुटून गेला. गुडगावमध्ये मिलेनियम सिटी भागात भारती एअरटेल, मेक माय ट्रीप, कोका कोला, जेनपॅक्ट, इरिक्सन, पीडब्ल्यूसी इंडिया अशा बड्या कंपन्यांची कार्यालये असल्याने येथे जाणारा हजारोंचा कर्मचारी वर्ग ट्रॅफिक जाममध्ये अडकला. या व्हाइट कॉलर वर्गाचे सोशल मीडियात वर्चस्व असल्याने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांच्या माध्यमातून या मंडळींनी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली. खड्डे, रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित नसणे, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा नादुरुस्त होणे, गाड्या रस्त्यावरच बंद पडल्यामुळे त्या उचलणारी टोइंगची व्यवस्था अपुरी असणे अशा प्रश्नांवर चर्चा लगेच सुरू झाली. आपल्याकडील वाहतूक व्यवस्थेत बऱ्याच उणिवा आहेत, अनेक मूलभूत प्रश्न आहेत हे मान्य करूनही नागरिक म्हणून आपले सामाजिक समस्यांसंदर्भात भान प्रगल्भ झालेले नाही. वाढते नागरीकरण, शहरीकरण हे काही राजकीय पक्षांकडून होत नाही तर तो सामाजिक व आर्थिक परिणाम असतो. आपण सर्वच जण वाहन घेतले की सरकारने मोकळे व चकचकीत रस्ते दिले पाहिजेत, अशा अपेक्षा बाळगून असतो. ते शक्य नसते.
व्यवस्थेच्याही म्हणून काही मर्यादा असतात. दुसरीकडे ट्रॅफिक जाम ही काही भारतातली समस्या नाही, तर ती जगभरातल्या मोठ्या शहरांमधली दैनंदिन समस्या आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये ट्रॅफिक जामवर उतारा म्हणून अनेक प्रयोग केले गेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक बससेवा, लोकल किंवा ट्यूब रेलचे जाळे मुंबईसारखे आहे व त्यातून लाखो प्रवासी रोज प्रवास करत असतात. लंडनमध्येही वेगळी परिस्थिती नाही. बीजिंग, तेहरान, कैरो, टोकयो, मनिला, नैरोबी, ढाका ही शहरे तर ट्रॅफिक जामवर अजूनही तोडगा काढू शकलेले नाहीत. “Numbeo’ या कंपनीने जगातल्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून एक आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या आकडेवारीत नजर टाकल्यास लक्षात येते की जगातल्या पहिल्या १० ट्रॅफिक जाम असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश नाही. या यादीत पहिले स्थान इजिप्तचे असून त्याखालोखाल इराण, जॉर्डन, इंडोनेशिया व नवव्या-दहाव्या स्थानावर रशिया व फिलिपाइन्स हे देश आहेत, तर भारतामधील कोलकाता, मुंबई, गुडगाव व नवी दिल्ली ही चार शहरे सर्वाधिक ट्रॅफिक जाम असणाऱ्या जगातील १० शहरांच्या यादीत मात्र आहेत.

ट्रॅफिक जामचा रोजचा सामना करणे व एखाद्या वेळीच सर्वात अधिक काळ ट्रॅफिकमध्ये अडकणे यामध्ये फरक आहे. आपल्याकडील बहुतांश ट्रॅफिक जाम हा अगदी मोजक्याच वेळा लांबलेला आहे. गुडगावमध्ये सहा-सात तास वाहने एकाच जागेवर होती असे बातम्यांमधून दिसते. कारण पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहनांची गती मंदावत गेली व त्याचा एकत्रित परिणाम दिसून आला.

पण गुडगावपेक्षा मोठा ट्रॅफिक जाम बीजिंगच्या नावावर जातो. बीजिंग-तिबेट महामार्गावर ऑगस्ट १९९० मध्ये ६२ मैल वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व ही कोंडी फुटण्यास तब्बल १२ दिवस लागले होते. ऑगस्ट १९६९ मध्ये न्यूयॉर्कनजीक बेथेल येथील वुडस्टॉक म्युझिक अँड आर्ट््स फेस्टिव्हलला पोहोचण्यासाठी वाहनांच्या रांगा २० मैलांपर्यंत होत्या. एप्रिल १९९० मध्ये बर्लिनची भिंत कोसळली तेव्हा हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी सुमारे १८ लाख वाहने एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने अभूतपूर्व कोंडी झाली. एकंदरीत ट्रॅफिक जाम ही सार्वत्रिक समस्या आहे. त्याचा मुकाबला केवळ सरकारच्या माथी खापर फोडून होणार नाही. ती सोडवण्याची आपलीही जबाबदारी आहे.

(उपवृत्तसंपादक, मुंबई ब्युरो)
बातम्या आणखी आहेत...