आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Two Ideology By Aruna Burte, Divya Marathi

त्या दोघी आणि लोकसभा निवडणुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, अशी हवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तयार केली आहे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी दावे आणि प्रतिदावे करत आहे. वेगवेगळ्या युती होत आहेत. वर्षभरापूर्वी त्याला दोन पर्याय होते, काँग्रेस किंवा मोदी (वास्तविक, भारतीय जनता पक्ष. मोदींच्या कोणत्याही प्रचारतंत्रात पक्षापेक्षा स्वत:चे नाव महत्त्वाचे असते, ही बाब नजरेआड करता येत नाही.) आज तिसरा पर्याय ‘आप’मुळे तयार होताना दिसतो. या सांप्रत गलबल्यात फारसे बातमीमूल्य नसणा-या त्या दोघींची चर्चा करणे आवश्यक आहे. त्या दोघी दोन वृत्ती, विचारसरणी यांचे प्रतिनिधित्व करणा-या आहेत. भारतीय संसदीय लोकशाही टिकवून ठेवायची असेल, तर या दोन वृत्ती, विचारसरणी यांमधील फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या दशकात जन्मलेल्या त्या दोघी व्यावसायिक आणि उच्चविद्याविभूषित आहेत. पैकी एक आहेत प्रसूतितज्ज्ञ डॉ. माया कोडनानी. सिंध प्रांतातील फाळणीच्या दु:खद आठवणी मागे सारून त्यांच्या वडलांनी गुजरातमध्ये स्थायिक होत शाळा चालवली. कोडनानींचे शिक्षण त्याच शाळेत झाले. वैद्यकीय व्यवसायाबरोबर त्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सक्रिय असल्याने गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारात 2007 मध्ये मंत्री झाल्या. दुस-या आहेत, डॉ. ज्योत्स्ना याज्ञिक. त्या वकिली व्यवसायाबरोबर मानवी हक्क संरक्षणाचे कामही करतात. निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ असल्याने अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी सोपवली जाते.
आरोपी आणि न्यायाधीश म्हणून दोघी समोरासमोर आल्या, त्याची पार्श्वभूमी अशी : 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जळाल्याने (?) 57 कारसेवक मृत्युमुखी पडले. त्यानंतर गुजरातमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली पेटवल्या. शासनाने जीवितहानी थांबवली नाही. हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली अत्यंत क्रूर पद्धतीने मुस्लिम समाजावर हिंसा, खून, जाळपोळ, बलात्कार करत दहशत पसरवली. काही लाख नागरिक मदत छावण्यांत लोटले गेले. अनेक समित्या, चौकशी अहवाल, निष्कर्ष, निर्णय गेल्या 12 वर्षांत येत राहिले. दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय विस्मृतीत गेला.


‘आम्ही पाच आणि आमचे पंचवीस’ असल्याने छावण्या भरल्या आहेत आणि ‘क्रियेला प्रतिक्रिया असतेच’ या मुख्यमंत्र्यांच्या मतांशी माया सहमत होत्या, असे वाटते. बाळ जन्मताना मातेला मदत करणारे त्यांचे कुशल हात आपली व्यावसायिक नैतिकता विसरले. त्यांच्या मतदारसंघातील नरोडा पाटिया या भागात झालेल्या अत्यंत क्रूर हल्ल्यात 97 जणांची हत्या झाली. मुस्लिमांना धडा शिकवणे ही जणू उच्चप्रतीची देशसेवा आहे, असे वाटल्याने माया जमावाला प्रोत्साहन देत शस्त्रे पुरवत होत्या, अशी साक्ष देण्याचे धैर्य जिवाला धोका पत्करून काही सामान्य स्त्री-पुरुषांनी दाखवले. मानवी हक्क संरक्षणासाठी काम करणा-या अनेक संवेदनक्षम व्यक्ती आणि संस्थांनी अन्यायग्रस्तांना मदत केली. त्यामुळे उशिरा का होईना, नरोडा पाटिया हत्याकांडाची केस उभी राहिली.


त्यामुळे माया आणि ज्योत्स्ना 2009 ते 2012 या तीन वर्षे चाललेल्या सुनावणीत समोरासमोर आल्या. ज्योत्स्ना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. त्यांनी परिश्रमपूर्वक दोन्ही बाजूंच्या साक्षी, जबान्या तपासल्या. क्रौर्याची आणि इतर अनेकांबरोबर माया यांच्या सहभागाची न्यायाधीशांना स्पष्टता आल्यावर ऑगस्ट 2012 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार माया यांना 26 वर्षे कारावासाची शिक्षा झाली. क्रौर्य असूनही फाशीची शिक्षा न देण्याचे कारण देताना ज्योत्स्ना म्हणाल्या, ‘जगभरात फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जनमत तयार होत आहे. फाशी मानवी हक्काचा अवमान करते.’ त्या म्हणतात, ‘कोडनानी दंगलीच्या म्होरक्या होत्या. संविधानाच्या इतिहासातील हे सर्वात वाईट प्रकरण आहे. यामध्ये 20 दिवसांचे नवजात बाळसुद्धा बळी पडले. जरी प्रतिक्रिया असल्याचा भास तयार केला असला, तरी हा हल्ला पूर्वनियोजित होता.’ आज माया यांच्या प्रकृतीचे कारण देत राम जेठमलानी जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. माया यांना निराशेने ग्रासल्याने शॉक ट्रीटमेंट देण्यात आली आहे. निकाल आला त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘मी राजकारणाची बळी आहे.’ 2009 मध्ये झालेल्या अटकेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. निकालानंतर गुजरात राज्य सरकारचे प्रवक्ते म्हणाले, ‘हत्याकांड झाले तेव्हा कोडनानी मंत्री नव्हत्या, त्या फक्त आमदार होत्या. त्यांची व्यक्तिगत कृती ही कॅबिनेटची जबाबदारी होत नाही.’ ज्या राजकीय पक्षाच्या धोरणांना अनुसरून दंगलीचे नेतृत्व केले, त्या पक्षाने वेळ आल्यावर असे हात झटकले, याचे खूप खोलवर दु:ख माया यांना होत असणार. कदाचित, क्रौर्याचे समर्थन केल्याच्या पश्चात्तापाने त्या निराश होतही असतील. या अर्थाने त्या राजकारणाच्या नक्कीच बळी आहेत.


‘द्वेषावर’ आधारलेल्या राजकीय विचारसरणीच्या त्या व्यापक अर्थाने वाहक आणि बळी आहेत. या विचारसरणीचे समर्थन करणा-या वृत्तीच्या माया या प्रतिनिधी आहेत. द्वेषाधारित विचारसरणीतून स्फुरलेले क्रौर्य व्यक्ती, समाज, लोकशाही, स्त्रीहक्क-सन्मान, संविधान, प्रजासत्ताक आणि माणुसकी या सर्वांच्या विरोधी आहे. उदा. या विचारसरणीने रूपकंवरला सती जाण्यास भाग पाडणा-यांचे समर्थन केले; भंवरीदेवीवर बलात्कार करणा-यांचे जाहीर सत्कार केले; तळागाळातील माणसाला जागवणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडून देशात मुस्लिमविरोधी दंगली केल्या आणि 2002 मध्ये गुजरातमध्ये ‘हिंदुराष्‍ट्र बांधणीचा’ क्रूर प्रयोग केला. आजही मुझफ्फरनगर दंगलीतील संशयितांचा जाहीर सत्कार केला जातो. आगामी निवडणुकांतील डावपेचांचा भाग म्हणून गुजरातच्या विकासाचे आदर्श देशासाठी समोर ठेवले जात आहेत.


पण हा विकास किती पोकळ, भकास, मानवी हक्कांचा भंग करणारा, स्त्रियांवरील अमानुष हिंसेचे समर्थन करणारा आहे, हे ज्योत्स्ना यांच्या निकालातून स्पष्ट होते. भारतासारख्या खंडप्राय देशात सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा यांना सामावून घेणारी, घटनादत्त अधिकारांची बूज राखणारी विचारसरणीच तळागाळातील 80 टक्के नागरिकांसाठी विकासाचे मार्ग खुले करू शकेल, याची जाणीव असणा-या वृत्तीचे ज्योत्स्ना प्रतिनिधित्व करतात.


लवकरच आपण मतदानाचा हक्क बजावणार आहोत. माया आणि ज्योत्स्ना या दोन विचारसरणी, विकासाचे दोन वेगळे मार्ग दाखवतात. एक मार्ग मुस्लिम, दलित, आदिवासी, बहुजन यांच्या जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. दुसरा मार्ग या दुर्लक्षित स्तराला घटनेतील तरतुदीनुसार सन्मानाने जगण्याचा हक्क बजावण्यासाठी मदत करतो. एक स्त्रीहक्कविरोधी विचार, संस्था, कृती याचे समर्थन करत हिंसेतून दहशत पसरवतो. दुसरा सहकार्य, संवाद आणि समावेशकतेतून निर्भय बनवतो. एक संविधानाला पायदळी तुडवण्या-या क्रौर्याचा; तर दुसरा आहे, संविधानानुसार न्याय देण्याच्या धैर्याचा. एक विघटनाचा, दुसरा एकमेकांना जोडण्याचा. येणा-या निवडणुकीत अंतर्मुख होऊन या दोन्हींमधील एकाची निवड करायची आहे.


aruna.burte@gmail.com