आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांच्यापुढील संकटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या लहान मुलाने टेपरेकॉर्डरच्या जुन्यापुराण्या फुटक्या कॅसेटमधली रिळं हवेत भिरकावून द्यावी आणि वर हवेत जाताना त्यातून ती काळी चमकदार फीत बाहेर पडतच राहावी, तसे काहीसे सध्या शिवसेनेचे झालेले दिसते आहे. कुणी तरी संकटांचे भेंडोळे शिवसेनेसमोर भिरकावून दिलेय आणि त्यातून संकटांची शृंखलाच बाहेर पडावी, तशी संकटे शिवसेनेसमोर, किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभी ठाकली आहेत आणि त्यांना सामोरे जाण्याऐवजी कोणताही निर्णय न घेता उद्धव ठाकरे ही संकटे टाळू पाहत आहेत. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी त्यातून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे पक्षाचे नुकसान होते आहे.

साधारणत: दोन आठवड्यांपूर्वी शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी आपल्याच पक्षाचा एक उपनेता आम्हाला त्रास देतो आहे, असा गंभीर आरोप केला आहे आणि या त्रासाचे स्वरूप राजकीय नसून ते व्यक्तिगत बदनामी करणारे आहे, असेही या दोघींचे म्हणणे आहे. लगोलग या दोघींनी आपली तक्रार पक्षनेतृत्वाच्या कानी घालण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्नही केला; पण मातोश्रीवर ताटकळत बसलेल्या या दोघींची उद्धव यांच्याशी भेट होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात हा वाद चर्चेत राहिला आणि त्यामुळे पक्षाची चुकीची प्रतिमा जनमानसात जाते आहे, असे दिसताच मग सुरू झाले डॅमेज कंट्रोल...उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आणि त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी या नगरसेविकांची भेट घेऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा पहिला आरोप होताच त्याची गंभार दखल घेऊन उद्धवना हा वाद मिटवता येणे सहज शक्य होते.

दुसरीकडे सेनेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्येही अस्वस्थता आहे. आणि त्याचे कारण आहे लोकसभा निवडणूक प्रक्रियेपासून आपल्याला दूर ठेवले जात असल्याची भावना...बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव यांच्या एकछत्री नेतृत्वाखाली आता पक्ष सांधा बदलतोय आणि त्या प्रक्रियेत आपण कुठेच नाही, या जाणिवेचीही त्यात भर पडली असल्याने हे जुनेजाणते अस्वस्थ आहेत. विशेषत: मित्रपक्षांबरोबर जागावाटपाची चर्चा आणि मतदारसंघनिहाय आढावा बैठकांमध्ये आपल्यापेक्षा कमी राजकीय कर्तृत्व असलेल्या नेत्यांना सामावून घेतले जात असल्याचा हा सल आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुका पाहिल्या तर शिवसेना आमदारांच्या संख्येत साधारण दहा ते बारा टक्क्यांची घट दिसते. अगोदर 1999, मग 2004, आणि मग 2009च्या निवडणुका... दर वेळी पक्षाच्या आमदारांची संख्या सात-आठने घटत गेली. त्याचीच पुनरावृत्ती जर या वेळीही झाली तर मग ही संख्या 35 ते 40च्या दरम्यान कुठेतरी स्थिरावेल. आता यापैकी 1999ची निवडणूक वगळता इतर दोन निवडणुका उद्धव यांच्या हाती पक्षाची पूर्ण सूत्रे आल्यानंतर म्हणजे 2003नंतर झाल्या आहेत आणि त्या वेळी बाळासाहेबही हयात होते. मग त्या वेळी जे जमले नाही ते आता जमवून आणावे, यासाठी ज्याला ‘एडी चोटी का जोर’ म्हणतात; तो उद्धव ठाकरे लावत आहेत, असे कुठेच दिसत नाही. उलट आपले पुत्र आदित्य ठाकरेंना पुन:पुन्हा राजकीय क्षितिजावर आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आदित्यच्या माध्यमातून तरुणांना आपल्या पक्षाकडे वळवण्याच्या प्रयत्नात मुख्य संघटनेकडे दुर्लक्ष होते आहे का, याचा विचार होताना दिसत नाही. राज्यातला सर्वात मोठा विरोधी पक्ष हे बिरुद शिवसेनेने केव्हाच गमावले आहे; पण आगामी काळात सत्तेची स्वप्नंपाहताना विधानसभेत पक्षाच्या आक्रसत चाललेल्या आकाराचे योग्य ते भान उद्धव ठाकरे यांना ठेवावेच लागेल.

राजकीय अडचणी अशा समोर आ वासून उभ्या असताना गृहकलहाचाही उद्धव ठाकरेंना सामना करावा लागतो आहे. मोठे बंधू जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मृत्युपत्राच्या खरेपणावरच प्रश्नचिन्ह उभे करून उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. हा वाद जरी दोन भावांमधला आणि कायद्याच्या चौकटीत लढवला जाणार असला तरी त्यातून होणार्‍या मानसिक त्रासामुळे उद्धव ठाकरे यांचे लक्ष राजकीय उद्दिष्टांवरून ढळू शकते आणि विशेषत: निवडणुकीच्या वातावरणात दोन्ही आघाड्यांवर लढणे उद्धव यांची दमछाक करणारे ठरू शकते. त्यातच उद्धव ठाकरेंना स्वत:च्या तब्येतीबाबतच्या कुरबुरींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय धामधुमीत त्यांना आपल्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंसाठी आगामी काही काळ हा खूपच कसोटीचा असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी मेळावा घेऊन शिवबंधनाचा धागा प्रत्येक शिवसैनिकाच्या मनगटाला बांधण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना एकनिष्ठतेची प्रतिज्ञा घ्यायला लावली. मात्र, अशा प्रयत्नांनी शिवसेनेतील दुही टाळता येईल, या भ्रामक कल्पनेत उद्धव ठाकरे यांनी राहून चालणार नाही.