आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा वाघ आणि सिंहाची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आम्ही शेपूट घातले नाही' असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते एकदम खरे आहे. वाघ कधी शेपूट घालीत नाही. प्राणी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांचे असे प्रामाणिक मत आहे की, जंगलाचा राजा वाघच असतो, सिंहाला हे पद का देण्यात आले? असाही त्यांचा प्रश्न असतो. प्राणी जीवनाच्या अभ्यासकांचे हे मत आपण प्रमाण मानूया. महाराष्ट्राचा विचार करता, महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी-कमी होत चाललेली दिसते. तिच्यात वाढ करण्याचे भरपूर प्रयत्नही होताना दिसतात. महाराष्ट्रात वाघांचेच राज्य असायला पाहिजे, पण हे सिंह कुठून राज्यावर येऊन बसले कळत नाही. लोक उगीचच सिंह आणि वाघाची तुलना करतात. जगप्रसिद्ध शिकारी कॉर्बेट याची वाघावरची फार सुंदर पुस्तके आहेत. तो वाघाविषयी म्हणतो की, वाघ हा अतिशय सभ्य प्राणी आहे. त्याला क्रूर म्हणणे किंवा हिंसक म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते.

असा वाघ कधी शेपूट घालत नाही आणि विनाकारण कधी कुणावर हल्लाही करत नाही. त्याचे पोट भरले की तो शांत असतो. त्याला शांतता प्रिय असते, म्हणून तो घनदाट जंगलात निवास करून असतो. त्याची शांतता कुणी भंग केल्यास त्याला ते आवडत नाही, परंतु काही कारण नसताना उगीचच एखाद्याची उणीदुणी काढणे, हा वाघाचा स्वभाव नाही.

वाघ आपणहून कोणती मागणी करत नाही. आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या, ते जमत नसेल तर उपमुख्यमंत्रिपद द्या आणि तेही जमत नसेल तर महत्त्वाची खाती द्या आणि जर दिली नाहीत तर डरकाळ्या फोडत राहणार. महाराष्ट्रातील या वाघाला त्याने मागितलेले काही मिळाले नाही. यामुळे काही जण कुत्सितपणे म्हणू लागले की, वाघाने शेपूट घातले. काही जण असेही म्हणू लागले की, वाघ शरण गेला आणि बहुधा हेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झोंबत असावे. म्हणून त्यांनी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वाघाने शेपूट घातली नाही, अशी डरकाळी फोडली.

ती आवश्यकच होती, कारण स्वत:च्याच मुखातून स्वत:चे मोठेपण राजकारणी लोकांना व्यक्त करावेच लागते. हा त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न असतो. आपण नेता आहोत आणि ताठ आहोत, कुणापुढे झुकत नाही, कोणापुढे झुकणार नाही, अशी प्रतिमा राजकारणी माणसाला बनवावी लागते. सार्वजनिक प्रतिमा तरी तशी असावी लागते. उद्धव ठाकरे यांना याक्षणी या प्रतिमेची फार मोठी गरज आहे. आम्ही सत्तेत सहभागी झालो तरी लाचार नाही, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत, याचा अर्थ लाटेवर तरंगणारे ओंडके झालो आहोत असा नाही, अशी घणाघाती भाषा वापरावी लागते, त्याशिवाय कार्यकर्त्यांत बळ संचारत नाही. सामान्य कार्यकर्त्यांना पडद्यामागचे राजकारण कसे चालते याची काहीच कल्पना नसते, त्यामुळे त्यांना आपल्या नेत्याचे बोलणे खरेच वाटते.

कुणी तरी असा खोचक प्रश्न करू शकतो की, सत्तेत सहभागी होणे हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे की शिवसेनेच्या अस्तित्व रक्षणासाठी आहे? जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला नाकारून भाजप आणि शिवसेना यांना भरभरून मते दिली. जनतेची पहिली पसंती भाजपची आहे. दुसरी पसंती शिवसेनेची आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी सारखीच आहे. त्यांची पंचवीस वर्षे युती होती. बरोबरीने काम करण्याची त्यांना सवय आहे. यासाठी जनतेने निर्णय केला की, सत्ता दोन्ही पक्षांच्या हातात असावी. सत्तेत सहभागी न होता, बाहेर बसणे म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे होते. सुजाण जनतेने या अपराधाला क्षमा केली नसती.

आता एकत्र आला आहात तर गुण्यागोविंदाने नांदा आणि नीट राज्य करा, अशी जनतेची माफक इच्छा आहे. वाघाने शेपूट घातली की डरकाळी फोडली हे जनता विचारत नाही. जनता विचारणार की, सत्तेवर येऊन आता तीन महिने होतील, या तीन महिन्यांत तुम्ही काय केले? टोलधाड कमी केली का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या का? पूर्वी ज्यानी भरमसाट घोटाळे केले त्यांची चौकशी सुरू केली आहे का? विकासाचा आराखडा तयार केला आहे का? झोपडपट्टीवाल्यांचे जीवन सुधारण्याच्या काही योजना केल्या आहेत का? असे असंख्य प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील जनतेला त्याची उत्तरे द्यावी लागतील.

काश्मिरी पंडितांची घरवापसी केव्हा होणार? मुले चार असावीत की पाच असावीत? असे प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारणार नाही. काश्मिरी पंडित आज ना उद्या काश्मीरमध्ये जातील, पण महाराष्ट्राचा विचार करता दुष्काळ, बेरोजगारी, विकासाचा असमतोल, यामुळे ज्यांना आपली घरेदारे सोडून शहरात धाव घ्यावी लागते आणि आपल्याच प्रदेशात ते विस्थापित होतात त्यांच्या घरवापसीचा प्रश्न आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या धरणांखाली ज्यांच्या जमिनी गेल्या, गावे गेली त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. तो कसा सोडवणार हा प्रश्न आहे. आपल्या घरात खायला अन्न नाही, याची चिंता न करता जगात किती भूकबळी होतात यावर रडण्यात काय अर्थ आहे.

काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे आणि तो हिंदू समाजाच्या बाहुबलाने सुटणार आहे. आपल्या प्रदेशात राहणाऱ्या हिंदूंवर हात लावला तर त्याचे पडसाद एकाच वेळी सर्व हिंदू समाजात ज्याक्षणी उमटायला सुरुवात होईल त्याक्षणी घरवापसीचा प्रश्न उपस्थित होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेची हीच इच्छा आहे. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवशाहीचे राज्य निर्माण झाले पाहिजे. असे राज्य निर्माण करण्याचे काम शिवसेना आणि भाजपला जनतेने दिलेले आहे. हे काम करण्याऐवजी बंदिस्त सभागृहात नुसत्या डरकाळ्या फोडण्यात काय अर्थ आहे?

राजकारण नेहमीच प्रवाही असते. एकच स्थिती कायम राहत नाही. राजकीय पक्षांच्या बलाबलात बदल होत जातो. सर्व लोकशाही देशात याच प्रक्रिया घडतात. भारत त्याला अपवाद नाही. सध्या भारतभर भाजपची लाट आहे. ही लाट लवकर ओसरण्याची चिन्हे नाहीत. ही लाट थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य असलेला समर्थ नेता देशपातळीवर नाही. महाराष्ट्रातदेखील भाजप वाढतच जाणार त्याची वाढ रोखण्याचे सामर्थ्य कोणात नाही. ज्याप्रकारे देशाचे राजकारण काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष करीत आहेत त्याचा उलटा परिणाम हिंदू राजकीयदृष्ट्या संघटित आणि आग्रही बनण्यातच होणार आहे. आज सर्वसामान्य हिंदूंची भावना अशी आहे की, भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला भाजपच्या मागेच उभे राहिले पाहिजे.

भाजप आता सिंहाच्या भूमिकेत आलेला आहे आणि प्राणीमित्र काहीही म्हणोत; परंतु सर्व समाजाची अशी मान्यता आहे की, सिंहच जंगलाचा राजा असतो. हा सिंह म्हणजे हिंदू समाज आहे. तोच या देशाचा राजा आणि मालक आहे. हे कुणाला आवडो अथवा न आवडो, त्याची चिंता करण्याचे कारण नाही. इतकी वर्षे झोपलेला सिंह आता जागा होत आहे. बकरी आणि मेंढ्यांचा कळप सोडून तो आता स्वत:चे आत्मदर्शन घेत आहे. ही वास्तवकिता वाघाने आता लक्षात घ्यायला पाहिजे. वाघाने वाघच राहिले पाहिजे, परंतु जंगलाचा राजा सिंह आहे हे वाघाने कधी विसरता कामा नये.