आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चांगली काँग्रेस’च देईल संघाला आव्हान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघ परिवाराच्या विरोधात जनता परिवार एकत्र येण्याच्या तयारीत असतानाच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या तीन भागांतील आत्मचरित्राचा पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तो आणीबाणीच्या कालखंडाचा. याच आणीबाणीमुळे त्या वेळच्या इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्यातूनच जनता पक्ष उदयाला आला. सत्तेवर आला आणि लगेच १८ महिन्यांत या पक्षात पहिली फूट पडली. नंतर या पक्षाची शकलं पडतच राहिली. आज हीच सारी शकलं एकत्र येत आहेत, ती मोदी व त्यांच्या भाजपच्या विरोधात. याच भाजपचा जुना अवतार असलेला जनसंघ या जनता पक्षात होताच. पण ‘जनता’ या नावाची जादू अशी होती की जनता पक्षातून फुटून बाहेर पडल्यावर हिंदुत्ववाद्यांनी पुन्हा ‘जनसंघ’ हे नाव घेतलं नाही. त्यांनी ‘भारतीय जनता पार्टी’ काढली.
जनता पक्ष काढण्यामागे जयप्रकाश नारायण यांची प्रेरणा होती. मात्र हा पक्ष का हवा, याबाबत जयप्रकाशजी यांचा दृष्टिकोन आणि त्यात सामील झालेल्या विविध नेत्यांची मतं यात मूलभूत फरक होता. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा हा एक भाग जनता पक्ष फुटण्यास कारणीभूत होताच. पण मुळातच जनता पक्ष का हवा, याबाबतची त्यात सामील झालेल्या नेत्यांची विविध मतं आणि जयप्रकाशजींची त्यामागची भूमिका यात असलेला जो फरक होता, तोच या पक्षाच्या ऱ्हासास अंतिमतः कारणीभूत ठरला. जर असे मतभेद नसते, तर व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेचा अतिरेक होऊनही हा पक्ष टिकणे अशक्य नव्हते.
आणीबाणीला ४० वर्षे पुरी होण्याच्या बेतात असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातील मजकुरानं त्या काळातील घटनापट पुन्हा एकदा तत्कालीन संदर्भांसह मांडला जात आहे.
""...आणि त्यानं या काळातील एका घटनेची प्रकर्षानं आठवण झाली. ही घटना होती, जयप्रकाश नारायण यांच्याशी झालेल्या चर्चेची. त्या काळात जयप्रकाशजी इस्पितळातील उपचारानंतर मुंबईत वास्तव्याला होते. आम्ही काही राजकीय कार्यकर्ते दर १५ दिवसांनी त्यांना भेटायला जात असू. असेच एकदा गेलो होतो, तेव्हा सर्व पक्षांना एकत्र आणून एक नवा पक्ष काढण्याची चर्चा व्यापक स्वरूपात सुरू होती. आमच्यापैकीच एकानं त्यासंबंधी जयपकाशजींना विचारलं की, ‘या बदनाम नेत्यांना बरोबर घेऊन तुम्ही नवा पक्ष काढून काय करणार, अशानं काय संपूर्ण क्रांती घडून येणार आहे काय?’ हा प्रश्न ऐकून जयप्रकाशजी काही क्षण स्तब्ध झाले आणि मग त्यांनी अत्यंत परखडपणं आपली भूमिका मांडली.
ही भूमिका अशी होती : माझा मुख्य उद्देश हा या देशात काँग्रेससारखा दुसरा मध्यममार्गी पक्ष उभा करणं हा आहे. या खंडप्राय देशातील सामाजिक बहुसांस्कृतिकता टिकवून लोकशाही राज्यव्यवस्था राबवायची असल्यास सर्वसमावेशक असा पक्ष सत्तेवर असणं आवश्यक आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे. पण इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत या पक्षाचं स्वरूप बदलत गेलं आहे. त्यामुळे हा पक्ष लोकशाही मूल्यांपासून दूर जात चालला आहे. काँग्रेसच्या कारभारात सुधारणा व्हावी, म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. या संदर्भात त्यांना पत्रंही लिहिली. (ती पुढे जयप्रकाशजींतर्फे काढण्यात आलेल्या ‘एव्हरीमन्स’ या नियतकालिकात प्रसिद्धही झाली) पण काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर मला आंदोलनाचं पाऊल उचलायला लागलं. आज आता आणीबाणी लादण्यात आल्यावर नवा राजकीय पर्याय उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे. मला मान्य आहे की, जे नेते व त्यांचे पक्ष एकत्र येत आहेत, त्यांच्यापैकी काहींची प्रतिमा चांगली नाही. मात्र तुमच्यासारख्या तरुणांवर माझा खरा भरवसा आहे. तुम्ही जर जनहिताचे प्रश्न घेऊन जनसंघटन व चळवळ चालू ठेवलीत आणि हा पक्ष उदयाला आला तर त्यावर दबाव राहील आणि त्यातूनच या पक्षाच्या स्वरूपात गुणात्मक फरक पडत जाईल, असं मला वाटतं. चळवळीतून तावून सुलाखून उदयाला आलेला पक्ष निवडणूक लढवून सत्तेत येणं, हा आदर्श प्रकार झाला. पण आपण वास्तवही डोळ्यांआड करता कामा नये. त्यामुळं वास्तव व आदर्श यांची सांगड घालायचा प्रयत्न केला पाहिजे. तेच मी करीत आहे.''
जयप्रकाशजींची भूमिका ही अशी होती. उलट या पक्षात सामील झालेले स्वतंत्र पक्ष, संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष व जनसंघ या चार घटकांपैकी पहिले तीन ‘काँग्रेसविरोधी’ होते. या देशाची वाट काँग्रेसनं लावली, असं आज मोदी म्हणत आहेत. खरं तर समाजवादी पक्ष व स्वतंत्र पक्ष त्या काळात हेच म्हणत होते. त्यांचा राजकीय पिंडच ‘काँग्रेस विरोधा’वर पोसलेला होता. जनसंघ तर बोलून चालून हिंदुत्ववादाचाच पाईक. त्याच्या दृष्टीनं देशाला हिंदुत्वाच्या दिशेनं नेण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर काँग्रेस हाच होता. आज चार दशकांनंतर मोदी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा देऊन सत्ता मिळवतात, त्यांची मुळं अशी त्या काळात आहेत. राहिला संघटना काँग्रेस हा जनता पक्षातील घटक. या गटाचे नेते फक्त इंदिरा गांधी यांच्या विरोधात होते, म्हणून वेगळे झाले होते. ते ‘इंदिराविरोधी’ होते, पण ‘काँग्रेसविरोधी’ नव्हते.
थोडक्यात, जयप्रकाशजींना काँग्रेसला पर्याय म्हणून ‘चांगली काँग्रेस’ उभी करायची होती. उलट जनता पक्षात सामील झालेल्यांना ‘काँग्रेस’ या शब्दाचंच वावडं होतं. सारा घोळ झाला तो त्यामुळं. त्यात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेची भर पडली एवढंच. आज पुन्हा चार दशकांनी हा जनता परिवार एकत्र येऊ पाहत आहे. पण या प्रक्रियेसंबंधात जे काही बोललं जात आहे, ऐकू येत आहे वा जाहीर केलं जात आहे, ते बघता चार दशकांपूर्वीचीच चूक केली जाणार की काय, ही शंका यावी, अशी परिस्थिती आहे. ...आणि आजही जयप्रकाशजींच्या त्या मतप्रदर्शनातील मथितार्थ तेवढाच मोलाचा आहे. संघ परिवाराला प्रखर विरोध करायचा असल्यास जनता परिवाराला आपली पावलं ‘चांगली काँग्रेस’ उभी करण्याच्या दिशेनंच टाकावी लागतील. ही ‘चांगली काँग्रेस’ २१व्या शतकातील आधुनिकोत्तर समाजाशी सुसंगत असायला हवी. भारत जागतिकीकरणाच्या पर्वातील जगात वावरत आहे, हे या ‘चांगल्या काँग्रेस’नं कधीच डोळ्याआड होऊ देता कामा नये. ‘विकास’ हे या ‘चांगल्या काँग्रस’चं मुख्य उद्दिष्ट असायला हवं. हा ‘विकास’ सामाजिक सलोखा व सर्वसमावेशकता या दोन तत्त्वांवर आधारलेला असायला हवा. या विकासाच्या प्रतिमानात (मॉडेल) पारदर्शी व कार्यक्षम राज्यकारभार हा कळीचा मुद्दा असायला हवा.
इंदिरा गांधी यांची काँग्रेस चार दशकांपूर्वी त्या काळाच्या संदर्भात असं काही करू शकली नाही, म्हणून असंतोषाचा विस्फोट झाला. त्याची परिणती आणीबाणीत झाली. आज चार दशकांनंतर २१व्या शतकात सोनिया गांधी यांच्या काँग्रेसनं तीच चूक केली अणि ती संधी संघ परिवारानं साधली. त्यामुळं पूर्वी काँग्रेसच्या विरोधात एकत्र आलेले जनता परिवारातील विविध घटक आज पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात तसेच एकवटत आहेत. पण असं का एकत्र यायचं, याबाबत त्यांच्यात एकमत आहे, असं दिसत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे अजेंडे आहेत आणि आपापली राजकीय संस्थानं टिकविण्यासाठी ते एकत्र येत आहेत, असं चित्रं उभं राहत आहे. अशा एकजुटीनं फारसं काही साध्य होण्याची शक्यता नाही. उलट या जनता परिवाराची चार दशकांत घसरत गेलेली विश्वासार्हता पूर्ण लयाला जाण्याचा धोका आहे.
जनता परिवाराला ही उमज पडल्यासच संघ परिवाराला ख-या अर्थानं आव्हान उभं राहील.