आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय स्वार्थापोटी झालेली युती दुर्दैवी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणात काहीही स्थिर नसते, असे म्हटले जाते. भारतीय राजकारणात तर ही अस्थिरता नेहमीच पाहायला मिळते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आणखी अधोरेखित होत आहे. सेक्युलर पक्षांकडून महायुतीच्या घोषणा होत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर युतीची संकल्पना कमकुवत पडल्याचे दिसून येत होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राजकीय पक्ष युतीच नव्हे, तर महायुती करून निवडणुका एकांगी पद्धतीने जिंकण्याचे मनसुबे रचत आहेत.

केवळ सत्तेच्या लालसेपोटी दोन विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येणे हे भारतीय राजकारणाचे मोठे उपहासात्मक चित्र आहे. बंगालमध्ये काँग्रेस- कम्युनिस्ट पार्टी असो वा बिहारमध्ये जदयू-राजदचे उदाहरण घ्या. आता उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेस एकत्र येण्याचा घाट घालत आहेत. या आघाडीत अनेक तात्त्विक पेच प्रश्न आहेत. काँग्रेसने ‘२७ साल, यूपी बेहाल’ असा नारा दिला आहे, त्यात सपाचीही सत्ता होती. मग काँग्रेस हा नारा माघारी घेणार का? शीला दीक्षितांची उमेदवारीही मागे घेणार का? अतिमागासांच्या आरक्षणास काँग्रेसचा पाठिंबा आहे, तर सपाचा विरोध आहे, मग या मुद्द्यावरून काँग्रेस नेहमीच मौन बाळगणार का?

युती किंवा आघाडी हे राजकारणाचे वैशिष्ट्य असले तरी वर्तमानात ही केवळ एक खेळी म्हणून वापरली जात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांची प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री अशी आहे. लालू यादव यांच्यासोबतची त्यांची आघाडी ही संधिसाधूपणाच होती. आता उत्तर प्रदेशातही तोच प्रकार घडू पाहतोय. राज्याची प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी पक्ष एकत्रित आल्यास हरकत नाही, मात्र केवळ काही जागांच्या स्पर्धेसाठी, खुर्ची वाचवण्यासाठी केलेले हे प्रयत्न लोकशाहीच्या दृष्टीने चांगले संकेत नाहीत.
रिझवान अंसारी, २५
अॅलुमनाई, जामिया मिलिया
इस्लामिया, नवी दिल्ली
m.facebook.com/rizwan.anwar.31542
बातम्या आणखी आहेत...