आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसा इथे मी तुझे गीत गावे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आंबेडकरी चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले उभे आयुष्य वेचणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे 15 मे 2004 रोजी निधन झाले. वामनदादांची पहाडी आवाजातील लोकगीते हजारोंचा जनसमुदाय ऐकताना दिसतो, ही किमया केवळ त्यांच्या आवाजाची नव्हे तर आशयाची आहे. दादांची गीते लोकजीवनाचा वेध घेणारी आहेत. त्यामुळे त्यात वक्तृत्वही आले आहे. पण हे वक्तृत्व उसने नाही. ते लोकमनाला थेट भिडणारे आहे. शाळेची पायरी न चढणार्‍या वामनदादांची ही लोकगीतातील शब्दांची सुसंस्कारित जडणघडण आहे.

लोकगीत हे मराठीचे सौंदर्य मानले जाते तर शाहिरी काव्यामुळे किंवा लोकगीतांमुळे मराठी कवितेचा उष:काल झाला, असे पेशवेकालीन शाहिरांना डोळ्यांपुढे ठेवून समीक्षकांनी गौरविले आहे. पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता आणि वेठबिगारी वाढली होती. स्त्रियांना त्या काळात कोणत्याच प्रकारचे सामाजिक स्थान नव्हते. केवळ चूल आणि मूल एवढाच तिचा दर्जा होता. युद्धावर अनेक दिवस बाहेर काढणार्‍या सैनिकांसाठी पेशवाईतील शाहिरांनी स्त्रियांच्या शृंगाराचे भडक वर्णन करणार्‍या चवचाल लावण्या लिहिल्या. शृंगारिक लावण्या लिहिण्यात अनेक शाहीर अडकले, तर सामाजिक चळवळीचा वेध घेऊन लोकगीतकारही याच वेळी समोर आले. त्यात शाहीर अमरशेख, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदींचा समावेश होता. महाराष्ट्रातील लोककवींना समाजमनाची चिंता होती लोकगीतांच्या 60 वर्षांच्या कालखंडात परिवर्तनवादी भूमिका लोकगीतांतून व्यक्त झाल्या. लोकगीतांमधून प्रामुख्याने कष्टकरी, कामगार, शेतकरी, मार्क्सवादी, स्त्रीवादी, दलितांची चळवळ, स्वातंत्र्याची आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राष्ट्रवादाचा पुरस्कार आणि प्रामुख्याने माणसांचा आणि माणुसकीचा धर्म वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले. लोकगीतांतून घडणार्‍या समाजाचा मूलाधार प्रबोधन हा आहे. समाजातील विषमतेवर कोरडे ओढत वामनदादा लोकगीतातून दाहक वेदना मांडतात.

तुम्हाला चीड यावी तिची ठिणगी उडावी
भुकेल्या माणसाची भूक जाळीत जावी
कविता हीच आता जगाचे गीत व्हावी
वयाच्या 20 व्या वर्षापासून आपल्या साध्यासोप्या शब्दातून, लोकभाषेतून शाहिरी रचना, कवने, गीते याद्वारे लोककवी वामनदादांनी जनजागृती केली. वामनदादांची बहुतांश गीते ही लोकगीते आहेत. त्यांच्या गीतांवर महाराष्ट्रातील अनेक कविमने पोसली आहेत. वामनदादांची गीते म्हणजे कोंडलेल्या मनाचा हुंकार आहे. अनेक गीतांमधील लोकजीवनाच्या प्रतिमा कर्डकांच्या साधनेची साक्ष देतात. वामनदादांच्या काव्यनिर्मितीचा केंद्रबिंदू हा मानव होता. म्हणूनच वामनदादा म्हणतात,

माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे, तुझे गीत व्हावे

मानवता, क्षमता, बंधुभाव, शील, करुणा, मैत्री या तत्त्वांवर दादांची लोकगीते आधारित आहेत. आंबेडकरी भक्ती, दलित, शोषित, स्त्रीमुक्ती, जातिव्यवस्था, मनोरंजनातून प्रबोधन या विषयावरही दादांची लोकगीते आजही प्रभावी वाटतात. चळवळीच्या अशा असंख्या गाण्यांबरोबरच दादांनी पर्यावरण, हुंडाबंदी, ऊसतोड कामगार, दुष्काळ अशा भिन्न विषयांवर मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगरचनेचे मूळ प्रेरणास्थान जसे विठ्ठल होते, त्याचप्रमाणे लोककवी वामनदादा यांया गीतरचनेचे मूळ प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रचंड शक्तीने समाजतळ ढवळून निघाला, रूढीचा सहारा करून व आत्मतेजाची पखरण करून समाजरथ पुढे जाऊ लागला. तेव्हा दादा उद्गारले,

मिळेल तितुके बलुते घेऊ
आणि खरकटे उरले खाऊ
काय म्हणुनी जीवन असले
जगशी रे आता ?

वामनदादांची गीते चित्रपटातूनही गाजली. ‘चल गं हरिणी तुरू तुरू’, ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला’ यासारखी गाणी आजही ओठावर ताल धरतात. वामनदादा 1934 मध्ये मुंबईला गेले. तेथे त्यांना चांगली नोकरीही मिळाली. पण तिथे त्यांचे मन रमले नाही. अनेक नोकर्‍यांत धरसोड केली. त्या काळी मुंबईत डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचे दिवस होते. वामनदादा डॉ.आंबेडकरांच्या सभा मन लावून ऐकत. या स्फूर्तीतूनच दादा पुढे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते झाले आणि त्यांनी भीमकार्यात स्वत:ला वाहून घेतले. दादांनी आपल्या असंख्य अवीट लोकगीतांनी समाजमनाला भुरळ घातली. म्हणूनच वा.म. कुलकर्णी यांनी दादांना ‘लोककवी’ तर जनतेने त्यांना ‘वामनदादा’ ही पदवी बहाल केली. वामनदादांच्या धारदार व पहाडी आवाजाची डॉ. आंबेडकरांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केली. लोककवी वामनदादा हजारो वर्षे या देशात आपल्या झंझावाती काव्यशक्ती आणि प्रतिभेने अजरामर आहेत. या महान विभूतीस विनम्र अभिवादन !