आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Various Agendas Of Political Parties In Maharashtra, Divya Marathi

महाराष्ट्र विकासाचा खरा पथदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची १५ ऑक्टोबर ही तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे निवडणूक रिंगणात असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांना या राज्याच्या विकासाची जोरदार उबळ येऊ लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यांत महाराष्ट्राचा विकास कसा करावा याचीच उजळणी आहे. शिवसेना तर जन्मापासून महाराष्ट्राच्या अस्मितेची राखणदार. त्यांची व्हिजन डॉक्युमेंट अगोदर प्रसिद्ध झाली आहे, तर शिवसेनेपासून फुटून निघून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करणारे राज ठाकरे यांनी सुमारे आठ वर्षांच्या विलंबानंतर जारी केलेली ब्ल्यू् प्रिंटही महाराष्ट्राच्या विकासाची रूपरेखा सांगणारी आहे. एकंदरीत या निवडणुकांत विकासाचे गाजर दाखवून मतदाराला भुलवले जात आहेच.

पण लोकमानसातही महाराष्ट्र नव्याने उभा करण्याच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यामध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांचा समावेश आहे. या दोघांनी बुधवारी महाराष्ट्राच्या विकासाचा पुढील पाच वर्षांचा जो आराखडा प्रसिद्ध केला तो म्हणजे वाळवंटात हिरवळ तयार करता येऊ शकते, अशाच तोडीचा आहे. आर्थिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा आगामी पाच वर्षांत नियोजनबद्ध रीतीने कसा विकास करता येईल, याचा राजमार्गच या दोघांनी ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ या पथदर्शिकेत दाखविला आहे. या पथदर्शिकेचे सादरीकरण पूर्वी नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीपूर्वी झाले होते व पुढे ते अन्य राजकीय पक्षांपुढे मांडले जाणार आहे. पाणी वापर व नगर नियोजनावर लक्ष केंद्रित करणे, राज्यातील सर्व मुला-मुलींना दहावीपर्यंत सक्तीच्या व दर्जेदार शिक्षणाची हमी देणे, नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाच्या वार्षिक वाढीचा वेग दोन अंकी राखणे, ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागांत सौरऊर्जा मोहीम सुरू करणे अशा अनेक उपयुक्त सूचना या पथदर्शिकेत करण्यात आल्या आहेत. विकास प्रक्रिया ही निरंतर चालत असते हे समजून घेतल्यास ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा घुमवणा-या या पथदर्शिकेला सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.