आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vasant Gite And Raj Thackeray Politics By Jaiprakash Pawar

राजसैनिकांचे नवनिर्माण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दशकभरापूर्वी उदयाला आलेल्या मनसेच्या नवनिर्माणाचे काम गोदातीरावरच्या राजगडातील सैनिकांनी हाती घेतले आहे. अशा कार्यासाठी मुहूर्त शोधला तोही लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीचा. मराठी बाण्याच्या शिवसेनेची अन् तिच्या दिवंगत प्रमुखांची हुबेहूब नक्कल करत पहिल्याच जोरदार चढाईत गोदातीर पादाक्रांत करणा-या मनसेप्रमुखांना भोळ्याभाबड्या नाशिककर रयतेने लोकप्रतिनिधी निवडीच्या प्रक्रियेपासूनच नाकारले असे नाही, तर अक्षरश: चार हात लांब ढकलले. अनुकरणीय शिवसेनेला हिंदुत्वाचा अपवाद वगळला तर वर्ण वा वर्गवर्चस्वाचा सामना आजवर फारसा करावा लागला नाही.
पण मनसेच्या तंबूत मात्र हा रोग सहजगत्या फैलावला अन् तो इतका खोलवर रुजला की त्याच मुद्द्याच्या आधारे पक्षांतर्गत अकालीच छोटे-मोठे उठाव वा बंड घडू लागले. राजसैनिकांच्या नवनिर्माण संकल्पाला पराभवाची किनार आणि साहेबांच्या पोकळ वाशाची पार्श्वभूमी लाभल्याने ज्या भूमीत अगदी थोड्या काळात मनसेने उभारी धरली तेथूनच ती मुळासकट उपटली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दिवंगत बाळासाहेबांच्या कृपाशीर्वादामुळे नाशिक अन् राज यांचा संबंध शिवसेनेपासूनचा. लहानपणी सुटी घालवण्यासाठी गावाकडे जाणा-या माणसाची स्थानिक पातळीवर ओळखपाळख वाढावी, त्यातूनच मग दोन-चार सवंगडी मिळावेत अन् मग हेच सवंगडी पुढे शिलेदार व्हावेत, अशी एकूण नाशिकमध्ये राजसेनेची वाटचाल. कारण बाळासाहेबांनी राजकडे कधीकाळी नाशिकचे पालकत्व सोपवले होते. ठाकरे घराण्यातील माणसाकडे साक्षात नाशिकसारख्या तीर्थक्षेत्राचे पालकत्व म्हटल्यावर राज्यभरातील जनतेच्या नजरा इकडे स्थिरावलेल्या, तर दस्तुरखुद्द नाशिककरांच्या अपेक्षा प्रचंड उंचावलेल्या. त्यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत एकहाती तीन आमदार व महापालिकेच्या निवडणुकीतही चाळीस नगरसेवकांचे दान जनतेने राजसाहेबांच्या पदरात टाकले.
एवढे सारे भरभरून दिल्यानंतरही साहेबांच्या दाव्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात नाशिकला ज्या काही जखमा झाल्या होत्या, ठिकठिकाणी फ्रॅक्चर झाले होते, त्या भळभळत्या जखमांवर औषधोपचार करणे वा प्लास्टर लावणे तर दूरच आहे, त्या जखमा खोलवर गेल्या. त्याच्या वेदना असह्य झाल्याने मग नाशिककरांनीच डॉक्टर बदलण्याचा निकाल घेतला आणि तो अमलातही आणून टाकला. म्हणजे काय झाले, लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पेशाने डॉक्टर असलेल्या गड्याची अनामत रक्कम जप्त झाली. त्यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीत तीनही आमदारांचे पानिपत झाले. पक्षाचे सरचिटणीस असलेल्या वसंत गिते यांच्यासारख्या खंद्या शिलेदारालाही लोकांनी झिडकारले.

मनसेला नाशिकमध्ये सत्तेची कवाडं सताड उघडी मिळताहेत म्हटल्यावर साहेब निर्धास्त झाले. पक्षसंघटनेत छुप्या रीतीने कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे व तो पक्षाला किती खोलवर जखमा करतो आहे याकडे निष्काळजीपणे बघितले गेले. गोदापार्क हा ड्रीम प्रोजेक्ट व त्याच्या पूर्णत्वासाठी लक्ष्मीपुत्र मुकेश अंबानी हातभार लावताहेत हीच काय तेवढी पुण्याईची बाजू. नाशिकच्या भूमीला मराठा विरुद्ध मराठेतर या वादाची परंपरा आहे याची थोडीशीही भनक नाशिकच्या पालकाला लागली नाही. अगदी सुरुवातीपासून तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा असा सूर आळवत वाढलेल्या मनसेला मराठा विरुद्ध मराठेतर वा स्पष्टच सांगायचे, तर मराठा विरुद्ध माळी अशा वादाने केव्हा मगरमिठी मारली हेही कुणाला कळले नाही.
हिंदुत्वाचा अपवाद सोडला तर शिवसेनेला वर्ण वा वर्गवर्चस्वाच्या वादाला फारसे तोंड द्यावे लागले नाही; पण त्याच शिवसेनेचे अनुकरण करणा-या राज ठाकरे वा त्यांच्या नेतृत्वाखालील मनसेला याच वादाने पोखरल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ मनसेचीही वाटचाल जातीयवादाच्या बांधावरून सुरू झाली अन् ज्या पद्धतीने सध्या पक्षीय पातळीवर धुसफूस सुरू आहे ती पाहता हाच प्रश्न काळ म्हणून राज यांच्यासमोर उभा राहू शकतो. एवढेच नाही तर नजीकच्या काळात त्याच मुद्द्यावरून पक्ष उभा फुटला तर आश्चर्य वाटायला नको.

मनसेमध्ये आजवर जेवढे बंड वा उठाव झाले त्याचा केंद्रबिंदू नाशिकच राहिला आहे. विशेषत: गेल्या वर्षभरात बंडाच्या ठिणग्या अधूनमधून पडत होत्या त्याही नाशिकमध्येच. स्वत: राज ठाकरे अपघातग्रस्त कन्येच्या शुश्रूषेमध्ये व्यग्र असताना राजीनामा अस्त्राचा वापर व्हावा, यातच पक्षातील असंतोषाचा लाव्हारस किती खोलवर मूळ धरत गेला आहे, हेच वास्तव त्यातून दिसते. नियती सूड उगवते असे म्हणतात, राजदेखील याला अपवाद ठरू शकलेले नाहीत. बाळासाहेबांची उतारवयात साथ सोडून मनसेच्या रूपाने मराठी प्रांतातच सवतासुभा उभा करण्याचे काम राज यांच्याकरवी केले गेले. त्याच्या यातना बाळासाहेबांना शेवटपर्यंत सोसाव्या लागल्या असणार. कारण ज्या राज यांनी हे महत्कार्य केले ते लहानाचे मोठे होईपर्यंत त्यांच्याच छत्रछायेखाली वाढले वा मोठे झाले. एवढेच काय तर व्यंगचित्रकार म्हणूनही अगदी सुरुवातीला धडे गिरवण्याची नामी संधीदेखील "मातोश्री'मध्येच मिळाली. ठाकरी शैलीतील भाषणाची देण हीदेखील बाळासाहेबांचीच; पण म्हणतात ना, अस्सल ते अस्सलच.
शिवसेनेच्या पायाभरणीपासून नावारूपाला येईपावेतो बाळासाहेबांनी अनेक चढ-उतार पाहिले, अनुभवले अन् अशक्य तेथे भोगलेही. मुंबई पालिकेची सत्ता यापलीकडे अनेक दशके शिवसेना जाऊ शकली नाही. लाखालाखाच्या सभा व्हायच्या. बाळासाहेबांच्या शब्दाखातर शिवसैनिक प्राणाची पर्वा करत नव्हते. वीस टक्के राजकारण अन् ऐंशी टक्के समाजकारण हा त्यांचा फॉर्म्युला राहिल्यामुळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले वा त्यांच्या जाण्यानंतरही उद्धव यांच्यामागे उभे आहेत. त्यामुळे एकट्याच्या बलबुत्यावर उद्धव यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, ठाकरी शैलीचा वारसा त्यांच्या भाषणात दिसला नाही. त्याउपरही शिवसेनेला ६३ जागा काबीज करता आल्या. याउलट आज जे जे शिवसेनेकडे तेच मनसेकडेही आहे, त्याउपरही राज यांना अवघ्या दशकभरानंतरच पक्षांतर्गत सैनिकांतील बंड, उठाव, फंदफितुरी, रुसवेफुगवे आणि हकालपट्टी यासारख्या बाबींचा वापर करण्याची वेळ आली आहे. लाखाच्या सभा झाल्या, लोकांनी टाळ्या-शिट्या वाजवून प्रतिसाद दिला म्हणजे तो जशाच्या तसा मतपेटीत व्यक्त होईलच याची खात्री नसते.
बाळासाहेबांना हे उमजल्यानंतरही चारहून अधिक दशकं मराठी अस्मितेच्या निश्चयापासून तसूभरही ढळले नाहीत. सब्र का फल मीठा होता है, त्यानुसार शिवसेनेला आता कुठे बरे दिवस यायला लागले आहेत. राज यांच्याही सभेला ब-यापैकी गर्दी येत असली तरी ती मतांच्या पेटीत चार वर्षांपूर्वी ज्या रीतीने व्यक्त झाली, ती यंदा झालीच नाही. त्यामुळे राज यांच्यावर नजीकच्या काळात राजकीय विजनवासाला सामोरे जाण्याची वेळ आली तरी आश्चर्य वाटायला नको.
मनसेमधील या गोंधळलेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नाराज पदाधिका-यांचे राजीनामे एकदाचे स्वीकारल्याचे मनसेप्रमुखांनी जाहीर करून टाकतानाच आपल्या वाईट दिवसांत आपल्यासोबत कोण कोण आहेत हे दिसल्याचीही खंत व्यक्त केली. एका बाजूला राज ठाकरे परिस्थितीने अगतिक, तर दुस-या बाजूला नाराज वसंत गिते यांचा अक्षरश: फुटबॉल चालला आहे. भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांना घरी जाऊन भेटत आहेत. प्रत्येक जण दावा करतो आहे की, तमुक तमुक आमच्या संपर्कात आहे. वास्तवात काय चालले आहे, या गोंधळात कोण कोणाचा राजकीय गेम करतो आहे हे गुलदस्त्यात आहे. एक मात्र खरे की, शिकार गट्टम करण्याआधी मांजर जसे आपल्या तावडीतील सावजाला खेळवून खेळवून दमवते अन् नंतर काही कळायच्या आत... अगदी तशीच स्थिती सध्या नाशिकच्या राजकीय पटलावर आहे. त्यामुळेच नवनिर्माणाचे काम राज ठाकरे यांनी नाराज पदाधिका-यांचे राजीनामे तडकाफडकी स्वीकारून केले, असे वरकरणी दिसत असले तरी वास्तवात त्यांच्या नेतृत्वाखालील मनसैनिकांनी याची पायाभरणी फार अगोदरच करून ठेवली असून त्याची चुणूक बंडाच्या निमित्ताने दिसत आहे.