आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआयपी ! म्हणून काय झालं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातच नव्हे, तर अनेक देशांमध्ये व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना कायदे धाब्यावर बसवून, नियमांची पायमल्ली करून विशिष्ट वागणूक देण्यात येते. त्याचा त्रास आम आदमीला मोठ्या प्रमाणात होतो. याची उदाहरणे वाचायला, पाहायला मिळत असतात, पण त्याबद्दल विशिष्ट असे धोरण आजपर्यंत कोणत्याच सरकारला किंवा प्रशासनाला आखून देता आलेले नाही.
दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवरून धावणारे मंत्र्यांच्या, व्हीआयपींच्या गाड्यांचे भलेमोठे ताफे हा दिल्लीकरांसाठी त्रासदायक प्रकार असतो. गुरुवारी सकाळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म. गांधी यांच्या राजघाट येथील स्मृतिस्थळाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैदराबाद हाऊस येथे भेट घेणार होते. शी जिनपिंग व त्यांचे सहकारी ज्या मार्गावरून जाणार होते तेथे जागोजागी प्रचंड सुरक्षा यंत्रणा तैनात केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
कॅनॉट प्लेस ते प्रगती मैदान हे साधारण कारने १५ मिनिटांचे अंतर आहे, पण पार करण्यास सुमारे तीन तासांहून अधिक काळ लागत होता. दिल्लीतल्या ज्या ताज पॅलेसमध्ये चीनचे शिष्टमंडळ थांबले होते त्यांचा निषेध करण्यासाठी शेकडो तिबेटी निदर्शकांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला होता. या निदर्शकांना आवरता आवरता वाहतुकीसाठी तैनात केलेले पोिलसही गोंधळून गेले होते. एकंदरीत हा सगळा त्रास सामान्य माणसांना भोगावा लागला. व्हीआयपी संस्कृतीचा ताप हा सर्वसामान्यांना झेलावा लागतो हे चिंताजनक आहे. अशा वेळी आम आदमीकड़ून संतापजनक प्रतिक्रिया येऊ शकते.
पाकिस्तानातही दोन दिवसांपूर्वी रेहमान मलिक या माजी मंत्र्याला िवमानात येण्यासाठी अडीच तास उशीर झाल्याने प्रवाशांच्या संतापाचा सामना करावा लागला. प्रवाशांनी रेहमान मलिक यांना विमानात चढूच दिले नाही. व्हीआयपी, मंत्र्यांची वेळ महत्त्वाची, पण सामान्यांच्या वेळेला महत्त्व नाही, असा काही समज पसरवला गेला आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडताना दिसतात. आपल्या घरातून रोजीरोटीसाठी बाहेर पडणा-या प्रत्येकाच्या वेळेला किंमत आहे हे भान प्रत्येक व्हीआयपी, मंत्र्याने, प्रशासन, पोलिसांनी ठेवायला हवे. त्यांनी आपल्या कार्यक्रमात शिस्त आणली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे या व्हीआयपी संस्कृतीला वेसण घालण्याची गरज आहे.