आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vote Bank Politics Of BJP By Sudhakar Jadhav, Divya Marathi

महाराष्ट्र भाजपमधील संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना–भाजप युती आपल्या अटीवर टिकवून ठेवण्यासाठी राजकीय तमाशाचे जे फड रंगले (ही बाब आघाडीलादेखील तितकीच लागू आहे.) त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या नागडेपणाचे दर्शन समस्त जनतेला झाले. यात भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले. तरी पक्ष म्हणून भाजपचा एक फायदा झाला आहे. युती तुटल्याने भाजपचा कितपत फायदा होईल, हे आज सांगता येत नसले तरी या राजकीय वगनाट्याचा फायदा भाजपअंतर्गत उफाळून आलेला नेतृत्वाचा संघर्ष झाकोळला गेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून आपला चेहरा पुढे आणण्याची स्पर्धा भाजप नेतृत्वात सुरू झाली होती. कानाफुसीचे संघतंत्र ‘केंद्रात नरेंद्र-राज्यात देवेंद्र’ असा कानमंत्र देऊ लागले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या दुस-या दावेदारांनी आपापला दावा पुढे करायला सुरुवात केली होती.
एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्राचे कार्ड समोर केले होते. उत्तर महाराष्ट्राने सातत्याने भाजपला साथ दिली असल्याने मुख्यमंत्री त्याच भागातील झाला पाहिजे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी बहुजनांचा चेहरा म्हणून ज्या विनोद तावडे यांना पुढे आणले, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात तावडेंना फारसे स्थान नसल्याने फडणवीस–नाथाभाऊ यांच्या संघर्षात आपला टिकाव लागणार नाही, हे हेरून त्यांनी या जोडगोळीला शह देण्यासाठी वेगळीच खेळी केली होती. त्यांनी स्वत:ऐवजी पंकजा मुंडे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले! पंकजा मुंडे यांनी स्वत:हून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी भाजपअंतर्गत आणि भाजपबाहेरच्या वर्तुळातदेखील त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’कडे मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीच्या रूपात पाहिले गेले आहे.

पंकजा मुंडे यांनी तर दुहेरी आव्हान भाजप नेतृत्वापुढे उभे केले आहे. त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’ने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आणले आहेच, शिवाय गोपीनाथ मुंडे यांची पक्षावर होती तशी पकड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजप नेतृत्वाने गोपीनाथ मुंडेंचे पंख छाटण्याचे, त्यांना अडगळीत टाकण्याचे आणि प्रसंगी त्यांचा अपमान करण्याचे जे प्रयत्न केले; ते पंकजा मुंडेंनी अगदी जवळून पाहिले आहेत. आज पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर गोपीनाथ मुंडेंना स्थान मिळाले असले तरी मृत्यूच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना सुखासुखी स्थान मिळाले नव्हते. त्या घडामोडी कन्या म्हणून पंकजांनी जवळून पाहिल्या आहेत.
जनसमर्थनाच्या बळावर पक्षांतर्गत विरोधकांनी दिलेली आव्हाने आपल्या पित्याने परतवून लावली हे त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे अशा भाजप नेतृत्वापुढे आपला टिकाव लागायचा असेल तर गोपीनाथ मुंडेंच्या मागे असलेले जनसमर्थन आपल्या मागे टिकून राहिले पाहिजे हे त्यांनी हेरले. त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याचा घाट होता. महाराष्ट्रापासून आणि मुंडेंच्या अफाट लोकप्रियतेपासून दूर नेण्याचा पक्षश्रेष्ठींचा डाव पंकजांनी उधळून लावला. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. या यात्रेसाठी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे परवानगी मागितली नव्हती. पक्षनेतृत्वाला फरपटत त्यात सामील व्हावे लागले होते. महाराष्ट्र भाजपमध्ये पुढे काय घडणार याची ही चुणूक समजली पाहिजे. भाजपमध्ये मुंडेंना जी वागणूक मिळाली त्याबद्दलचा मुंडे समर्थकांचा रोष अद्यापही कमी झालेला नाही. याची झलक या यात्रेच्या समारोपप्रसंगी पाहायला मिळाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाषणासाठी उभे राहताच पंकजा मुंडे यांनी समर्थकांना शहा यांच्या भाषणात घोषणाबाजी न करण्याचे आदेशवजा आवाहन केले. ही बाब बहुतेक राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटली असली तरी महत्त्वाची आहे.

चव्हाट्यावर येत असलेला भाजपचा अंतर्गत संघर्ष मागे पडला. शिवसेनेशी जागावाटपावरून झालेल्या तणातणीमुळे तो झाकलाही गेला. शिवसेनेसी संघर्ष चालला होता तेव्हा एकमेकांचे पाय ओढणारे भाजप नेते हातात हात घेत असल्याचे चित्र पुढे आले. युती तुटल्यामुळे भाजपकडे उमेदवार नाहीत इतक्या जागा हाती आल्या. भाजप नेतृत्वात जागावाटपावरून वाद होण्याचे टळले. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना एकसंघ भाजप असे चित्र निर्माण झाले. असे चित्र निर्माण झाले नसते तर याचा भाजपला फटका बसू शकला असता. अर्थात, महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाची क्षमता लक्षात घेता त्यांच्या पदरी किती पडतील हे आताच सांगता येत नाही. यामुळे भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. इथेच शिवसेनेशी झालेल्या संघर्षाचा आज दिसत असलेला फायदा उद्या मोठ्या तोट्यात परिवर्तित होऊ शकतो.

निवडणुकीनंतर शिवसेनेशी पुन्हा वाटाघाटी करण्याचा प्रसंग येईल तेव्हा भाजप नेतृत्व एकसंघ असणार नाही. झाकला गेलेला नेतृत्व संघर्ष पुन्हा डोके वर काढील. त्या वेळी पुन्हा प्रत्येक जण आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला ते पद मिळणार नसेल तर आपल्या सहका-यांपैकी कोणालाही मिळू नये, असेही प्रयत्न होतील. याचा शिवसेनेलाच अधिक फायदा होईल. उद्या भाजप-शिवसेना मिळून सत्ता हस्तगत करण्यासारखी परिस्थिती आली आणि शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तरी भाजप नेतृत्वाच्या संघर्षामुळे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची अधिक संधी असणार आहे. किमान आधीच्या वाटाघाटीत ज्यांनी अतिउत्साहाने उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला, त्यांचा पत्ता तरी उद्धव ठाकरे कापतील. उद्धव बाळासाहेबांसारखे किंगमेकरच्या भूमिकेत येतील. अशा वेळी संघ आणि भाजप नेतृत्वाला जे नको तेच घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी संघर्ष करण्यापासून चार हात दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा भाग्योदय होऊ शकतो. युती तुटली तरी शिवसेनेने मुंडे भगिनींविरुद्ध उमेदवार उभे केले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको!

भाजपतील मुख्यमंत्रिपदासाठीच्या संघर्षाचा आणखी एका व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी! या सगळ्या काळात गडकरी यांनी मुत्सद्दीपणे पाळलेले मौन त्यांच्या पथ्यावर पडू शकते. गडकरींनी भाजपत चाललेल्या सत्तासंघर्षाला खतपाणी घातले नसले तरी कानाडोळा नक्कीच केला आहे. शिवसेनेशी झालेल्या वाटाघाटीत कोणतीच भूमिका न घेता स्वत:ला अलिप्त ठेवले आहे. या वेळी राज ठाकरेंनाही त्यांनी खुणावले नाही. त्यामुळे शिवसेनेचा गडकरींवर राग असण्याचे कारण नाही. त्यामुळे सर्वसंमत उमेदवार म्हणून पुढे येऊ शकणारे एकमेव नाव गडकरी यांचे असणार आहे. महाराष्ट्रातील भाजपची स्थिती लक्षात घेतली तर त्या पक्षाचे स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. असे असले तरी ‘मोदी प्रभावा’कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नसतील इतक्या सभा मोदींच्या होणार आहेत. याचा फायदा होऊन भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला तर भविष्यात मोदींना आव्हान देऊ शकणा-या गडकरींची महाराष्ट्रात रवानगी होऊ शकते. मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष करणा-या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या हाती धुपाटणे येण्याचीच शक्यता सर्वात जास्त आहे!
* लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ssudhakarjadhav@gmail.com