आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Weather Forecast By Pravin Gavali, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्या सर्वांसाठी धडा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरमधील पूरपरिस्थितीचे हवाई दृश्य ( संग्रहित छायाचित्र).
डोंगरद-यांनी संपन्न काश्मीर निसर्गाचा एक अद्वितीय नमुना आहे. वाळवंटी व उष्ण भागातून येणा-या प्रत्येकाला काश्मीरचे विलोभनीय रूप भुरळ घालते. इथे येणा-या प्रत्येकालाच स्वर्गात आल्याची अनुभूती होते. काश्मीर खो-याची निर्मिती निसर्गाच्या अनेक अफलातून हालचालींमुळे शक्य झाली आहे. पृथ्वीचे भूपृष्ठ अभिसरण प्रवाहांच्या हिंदोळ्यावरून इकडून तिकडे फि‍रत असते. अशा प्रवासातून अनेक नैसर्गिक प्रक्रिया घडून येतात. ज्याच्यावर स्वार होऊन त्यांना काबूत आणण्याचे काम अजूनही मानवाला जमलेले नाही. वातावरणात अनेक वायू विहरत असतात ज्याची ‘चाल’ सूर्याची ऊर्जा नियंत्रित करत असते.

हिमालयाच्या पर्वतराजी काश्मीरच्याही पुढे-मागे हजारो मैल पसरलेल्या आहेत. या पर्वताची निर्मिती भू-हालचालींशी निगडित आहे. कोणे एके काळी या पर्वताच्या जागी समुद्र (टेथिस) होता जिथे लाखो वर्षे गाळ साचत राहिला. हा गाळ साचत असतानाच भारतीय भू-तुकडा उत्तरेकडे, या समुद्राकडे सरकत होता. कालांतराने भारतीय भू-तुकड्याची गाठभेट समुद्रातील गाळाशी झाली. साहजिकच या गाळावर भारतीय भू-तुकड्याचा दाब वाढत गेला, पण त्याला मागे होता येईना. कारण युरेशियाचा भू-तुकडा आपल्या जागेपासून तसूभरही हलत नव्हता. या गाळाचे सँडविच झाले. पण भारतीय भू-तुकडा आपला प्रवास थांबवायला तयार नव्हता. तो निरंतर या गाळाला मागे रेटत राहिला. त्यामुळे या गाळाला वळया पडून वर आकाशाकडे उचलला गेला व हिमालयाची पर्वतरांग तयार झाली. म्हणून हिमालय हा घडीचा पर्वत आहे.

गाळावर जर योग्य प्रमाणात दाब पडला व योग्य प्रमाणात ऊर्जा मिळाली तर त्यांचे परिवर्तन टणक खडकात घडून येते. उदाहरणार्थ कडापा व विंध्य पर्वतसमूहांचे खडक हेसुद्धा समुद्राच्या पाण्यात गाळाच्या रूपात जमा होत होते, पण प्रमाणशीर ऊर्जा व दाब मिळाल्याने ते स्लेट, सँडस्टोन, डोलोमाइट व लाइमस्टोनसारख्या मजबूत खडकात बदलून गेले, पण असे हिमालयात घडले नाही.

महाराष्ट्रातील फारच कमी लोकांनी हिमालय ‘अनुभव’ला असेल. पर्यटक म्हणून जी अनुभूती आपल्याला लाभते ती फारच वेगळी व क्षणिक असते, पण तिथल्या रहिवाशांना निसर्गाचा जो थरार अनुभवायला मिळतो त्याला तोड नाही. दोन-चारशे मीटर उभ्या सुळक्यांना खाच मारून घर बांधून राहणे हे येरागबाळ्यांचे काम नव्हे. त्यातच रात्रीची कडाक्याची थंडी व दिवसाची गरमी याचा जेवढा मानवाच्या शरीरावर परिणाम होतो तेवढाच किंवा त्याहूनही जास्त तिथल्या माती-खडकावर होतो. हिमालयातील माती-खडक आधीच भुसभुशीत आहे. त्यातच तिथे पाणी, दव व बर्फाचा संचार असतो. पाणी जेव्हा माती व खडकातील भेग व छिद्रात अडकते तेव्हा दैनंदिन तापमान बदलामुळे त्यांचे आकुंचन व प्रसरण होत राहते. ते आणखीनच जास्त कमजोर होत राहतात. डोंगरद-यांवर विसावलेले असे कमजोर घटक भू हालचालींच्या सततच्या माराने अस्थिर बनतात व खाली घरंगळत येतात.

श्रीनगर शहराचा सारा पसारा डोंगरद-यांनी वेढलेल्या एका निमुळत्या पठारावर वसलेला आहे. हे जे छोटेसे सपाट मैदान आहे ते फक्त सहा-साडेसहा मैल व्यासाचे आहे. पश्चिमेला असणा-या विमानतळापासून ते पूर्वेच्या झबरवन डोंगरापर्यंतचाच परिसर फक्त श्रीनगरच्या मर्यादा स्पष्ट करतो. त्यामुळे दक्षिण काश्मीरमधून जे काही पाणी वाहते ते या साडेसहा मैल व्यासाच्या सपाट मैदानातूनच खाली वाहते. या विशिष्ट रचनेमुळेच या शहराला नेहमीच नैसर्गिक आपत्तींचा धोका असतो. एका बाजूला डोंगर, मध्ये सपाट जमीन व दुस-या बाजूला दरी अशी विशिष्ट परिस्थिती असल्या कारणाने इथे काही काळासाठी पाणी स्थिरावते. यातूनच दल तलावासारखे इतर अनेक तलाव निर्माण झालेले आहेत. काश्मीरच्या शासकांनी जेव्हा इथे शहर वसवले तेव्हा इथे फार मोठ्या प्रमाणात दलदलीचे साम्राज्य होते.
ललितादित्यसारख्या राजांनी इथून शहर हलवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. आता तर हे शहर अंदाधुंदपणे वाढतेच आहे.श्रीनगरचे विलक्षण नैसर्गिक वैभव तिच्या अफलातून संरचनेमुळे निर्माण झाले आहे. जो गाळ डोंगरांना कुरतडून नदीनाले या शहरात आणतात तो इथली जमीन सपाट असल्या कारणाने इथेच विसावतात. या शहरातून पाणी जाण्यासाठी अनेक नैसर्गिक वाटा निर्माण झाल्या होत्या, पण वाढती लोकसंख्या व त्यांच्या निवा-याची सोय लावण्यासाठी या नैसर्गिक कालव्यांनाच वाळू-विटांचा भराव टाकून बुजवण्यात आले आहे. इतर अनेक नैसर्गिक छोट्या कालव्यांना रस्त्यांच्या रूपात उपयोगात आणले जात आहे.

काही शतकांपूर्वी दल सरोवराची व्याप्ती आज आहे त्याच्या कैकपट अधिक होती. या तलावात भराव टाकून नवीन जमीन जन्माला घातली जात आहे. या तलावाचे काम एखाद्या स्पंजसारखे होते. स्पंज जसे पाणी शोषून घेते अगदी त्याचप्रकारे हा तलाव अतिरिक्त पाणी आपल्या अंगात ओढून घेत होता, पण आता त्याच्यात ही क्षमता उरलेली नाही.

या शहरात १९०२ व १९१२ मध्ये मोठे पूर आले होते. त्यानंतरही आलेत, पण त्यावेळची या शहराची मानवी वस्ती फारच कमी व सीमित होती. तरीही त्याकाळच्या शासकांनी योग्य ती उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले होते. त्यांनी काही ठिकाणी बांध व बंधारे बांधून तसेच मानवी कालवे खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचे उपाय योजले होते, पण हे सारे प्रयत्न आज अपुरे आहेत याची प्रचिती येते आहे. झेलमसह सर्व महत्त्वाच्या नद्या व त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वाहण्याचे कारण म्हणजे या नद्यांच्या पात्रांवर माणसाने केलेले बेसुमार आक्रमण होते. ब-याचशा नद्या इतक्या आकुंचित झाल्या होत्या की पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. या पुरात सुमारे तीन लाख गावांना तडाखा बसला, हजारो लोक बेघर झाले, आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले, हे कधीतरी होणारच होते. कारण हिमालयाच्या कुशीतल्या राज्यांना ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा बसेल, असा इशारा "इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज' ही संस्थेने अगोदरच दिला होता. या इशा-याकडे गांभीर्याने पाहण्याची तसदी सरकारने घेतली नाही. तसेच सिंधू पाणीवाटप करारानुसार जम्मू व काश्मीरमध्ये मोठी धरणे बांधता येत नाहीत. त्यामुळे हिमालयातून वाहत येणा-या नद्यांचे पाणी अडवता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
अशा धोकादायक डोंगराळ प्रदेशात वाढत्या बांधकामांवर निर्बंध घालणे हे आता क्रमप्राप्त झाले आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक हिल स्टेशनवर येत असतात. आता अनेक हिल स्टेशन्स बाराही महिने गजबजलेली असतात. तिथे पोहोचणे सुकर होण्यासाठी अनेक डोंगरांना खाचा मारण्यात आल्या आहेत. यामुळे डोंगर खिळखिळे झाले आहेत. लोकांना राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड व नदी-नाल्यांचे प्रवाह बदलले गेले आहेत. निसर्गाला न कुरतडता निसर्गाचा आस्वाद घेण्याची वेळ आता आलेली आहे.

मान्सूनचा अभ्यास करणा-या वैज्ञानिकांनी प्रगतीचे अनेक टप्पे गाठलेले आहेत. त्यांनी श्रीनगरला पाऊस फार मोठ्या प्रमाणावर अनेक दिवस पडणार हे आधीच जाहीर केले होते, पण आपण अजूनही जुन्या मानसिकतेत अडकून आहोत. हवामान खात्याचे अंदाज ब-याचदा चुकीचे असतात, असे मानण्याकडे आपला कल आहे. ही मानसिकता आता बदलायला हवी. वादळाची व्याप्ती व प्रखरता वैज्ञानिकांनी आगाऊ कल्पना देऊन सांगितली म्हणूनच ओडिशा व आंध्रात मनुष्यहानी टाळता आली. बदलत्या परिस्थितीत त्यांच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. श्रीनगरवासीयांनी त्यांचे ऐकले असते तर एवढी मोठी मनुष्यहानी टाळता आली असती. हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे.