आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक तेलबुडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतीमालाच्या दरातील मोठे चढ-उतार आपण पाहिले आहेत. मात्र जगाची अर्थव्यवस्था एकत्र बांधणाऱ्या तेलावर ही वेळ आल्याने भारतीय शेअर बाजारासह सारे जग गारठून गेले आहे.
गे ल्या वर्षभरात ३० टक्के परतावा देणारा भारतीय शेअर बाजार जगातील तेलबुडीत आणखी किती बुडतो हे आता पाहावे लागणार आहे. २०१५ च्या पहिल्या पाच-सहा दविसांत ५०० अंशाने तो पडला असून तो आणखी पडणार, असे अंदाज व्यक्त होत आहेत. शेअर बाजारातील असे मोठे चढ-उतार हे भारतीय बाजारासाठी नवे नाहीत. कारण भारतीय बाजार चालतो तो प्रामुख्याने परकीय गुंतवणूकदारांवर! भारतीय गुंतवणूकदारांची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यात भर म्हणजे जागतिक घटनांचे व्यापक परिणाम त्यावर होतात आणि त्या घटना आज काही कोणाच्या हातात राहिलेल्या नाहीत.
त्याचे ताजे उदाहरण म्हणजे कच्च्या तेलाच्या तब्बल ५५ टक्क्यांनी घसरलेल्या किमती. जे तेल एक वर्षापूर्वी ११५ डॉलर प्रतिपिंप होते ते आज ५० डॉलर इतके खाली आले आहे. भारतातील शेतीमालाचे दर अशा प्रमाणात घसरलेले आपण पाहिले आहेत, मात्र जगाची अर्थव्यवस्था एकत्र बांधणाऱ्या तेलावर ही वेळ आल्याने सारे जग गारठून गेले आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारते आहे आणि भारतातील मागणी वाढू लागली आहे, असे म्हटले जात असतानाच ही जगबुडीसारखी तेलबुडी सुरू झाली. त्यापाठोपाठ चीनचा विकासदर घसरणार, यावर जगाचे एकमत झाले. लगेच जपानही मंदीत सापडला आणि आर्थिक संकटात सापडलेला ग्रीस देश युरोपियन युनियनच्या बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली. जग आता आर्थिक व्यवहारांनी इतके करकचून बांधले गेले आहे की त्याच्या या टोकाला झालेल्या घटनांचे परिणाम त्या टोकाला होत आहेत. त्यामुळे भारतातील उत्पादन वाढले असताना भारतीय शेअर बाजारातील कंपन्याचे मूल्य तब्बल दोन-दोन लाख कोटींनी कमी झाले आहे! खरे म्हणजे तेलाचा वापर प्रचंड वाढला असताना तेलाची ही बुडी भारताच्या फायद्याची ठरली पाहिजे. मात्र त्यामुळे जगच संकटात सापडणार असेल तर भारत त्यातून नामानिराळा कसा राहू शकतो? आर्थिक साक्षर झालेल्या भारतीय नागरिकांनी गुंतवणुकीच्या इतर मार्गांसोबत शेअर बाजारातील आपला वाटा वाढवत राहणे हाच त्यावरचा खरा मार्ग आहे.