आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलंगडी अाणि कुरघाेडी! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर भ्रष्टाचाराच्या वादग्रस्त ध्वनिफीतप्रकरणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार यांची उचलबांगडी केल्याची तसेच विकासकाच्या हिताची जपणूक करू पाहणारे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चाैकशीची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. मात्र, पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारचे यामुळे धिंडवडे निघाले.  झाेपडपट्टी पुनर्विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, म्हाडाच्या इमारती, समूह (क्लस्टर) विकास अशा गृहनिर्माण विभागाच्या याेजना नेहमीच वादग्रस्त ठरतात. भलेही सरकार काेणत्याही पक्षाचे असाे, कंत्राटदार तेच असतात. राज्यकर्ते, कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या संगनमताने याेजनेचा सारा बट्ट्याबाेळ हाेताे, हे नवे नाही. तथापि, मेहतांच्या चाैकशीविषयी विराेधी पक्षनेते, अन्य गटनेत्यांना विचारात घेतले जाणार असल्याने त्यांच्यासाठी हा सूचक इशाराच ठरावा. उल्लेखनीय म्हणजे भगवानगडाच्या पायथ्यावरून ‘जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री’ असा दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा चिक्की घाेटाळा, विनाेद तावडे यांचे बनावट पदवी प्रकरण असाे की बबनराव लाेणीकर, संभाजी पाटील-निलंगेकर, जयकुमार रावळ, रणजित पाटील या मंत्र्यांवरील अाराेप असाेत, मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना अभय दिले हाेते. मात्र, दिल्लीत गाॅडफादर अाणि त्या दरबारातील उच्चपदस्थांशी जवळीक असलेल्या प्रकाश मेहता यांची चाैकशी हाेऊ जात अाहे, यामागे भाजपांतर्गत कुरघाेडीची शक्यता असू शकते. तसेच भाजपत काेणी डाेईजड ठरत असेल तर त्याच्या कुलंगडी बाहेर येतात, असे गृहीत धरायला वाव अाहे. कारण, यापूर्वी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनाेद तावडे यांच्याबाबतीत असेच घडलेले दिसते. भाजपाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र माेदी हे दाेघेही ‘केंद्रातील अाणि विविध राज्यांतील भाजप सरकारे पारदर्शक कारभार करत अाहेत, काेणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा अाेरखडा उठलेला नाही’, असा दावा करतात. मात्र, महाराष्ट्र सरकार त्यास अपवाद ठरू जात अाहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
 
एकंदरीत अाॅगस्ट महिना मेहता यांना त्रासदायक असल्याचे दुसऱ्यांदा जाणवले. गतवर्षी सावित्री नदीवरील पूल काेसळला तेव्हा राज्यभरातील पत्रकारांच्या क्षाेभाला त्यांना सामाेरे जावे लागले. अाता ताडदेवमधील जुन्या चाळी, झाेपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित एका फाइलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा परस्परच मारून त्यांच्यावर कुरघाेडी करण्याचे प्रकरण अंगलट अाले. कदाचित अवगत करून देण्याच्या प्रक्रियेवरून मेहतांचा संभ्रम झालेला असू शकताे. मात्र, या अवगत प्रकरणाची चाैकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला; त्याचे स्वागत करायला हवे. मेहतांच्या चाैकशीतून काय निष्पन्न हाेणार याचा अंदाज बांधणे अवघड नसले तरी त्यांना काय अवगत करून दिले जाते, याविषयी महाराष्ट्राला अधिक उत्सुकता अाहे. मुळात प्रकाश मेहता म्हणजे एकनाथ खडसे नव्हेत, की ज्यांचा कुणी गाॅडफादर नाही किंवा मुख्यमंत्री फडणवीसांना ते स्पर्धक वाटावेत. एकूणच या पार्श्वभूमीवर प्रकाश मेहता क्लीन चिट मिळवतात की खातेबदल स्वीकारायला भाग पाडून मुख्यमंत्री फडणवीस बाजी मारतात तेच अाता पाहावयाचे. मेहता यांच्या चाैकशीची घाेषणा हाेताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राधेश्याम माेपलवार यांच्या ३६ वादग्रस्त ध्वनिफिती बाहेर अाल्या. यापाठाेपाठ राधाकृष्ण विखे यांनी मेहतांशी संबंधित अाणखी एक प्रकरण बाहेर काढले. तेव्हा साहजिकच भाजपतील पक्षांतर्गत राजकारणाच्या चर्चेला ऊत अाला. मेहता, माेपलवार यांच्याविरुद्ध कारवाईसाठी विराेधक अाक्रमक असतानाच प्रकाश मेहतांच्या निर्णयाचे समर्थन करणारे अाणि मेहता यांच्या खात्यावर डाेळा असणाऱ्या भाजपतील काही नेत्यांनी हे कुभांड रचल्याच्या ई-मेलचा मुद्दा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. मेहतांनी सारवासारव केली असली तरी त्यांच्या वतीने कुणा एकाने हा मेल पाठवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विराेधी पक्षनेते अाक्रमक असले तरी यापूर्वीही भाजप मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे विधिमंडळात त्यांनी चर्चेला अाणली नंतर साेडून दिली. विराेधकांच्या या साेपस्काराच्या भूमिकेमुळे भाजप मजबूत हाेत अाहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्नता अाणि शिवसेना संभ्रमात दिसते अाहे. मराठा अारक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार अडचणीत अाले हाेते, परंतु मुख्यमंत्री फडणवीसांनी संयम अाणि मुत्सद्दीपणाने हा विषय हाताळला. परिणामी फायदा भाजपचाच झाला. त्यामुळे १९९५ प्रमाणे विराेधकांनी रान उठवून कुरघाेडी करण्याचा प्रयत्न केला तरी भाजपवर अाेरखडा उठेल, अशी परिस्थिती नाही, हे तितकेच खरे!
बातम्या आणखी आहेत...