आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालचा बुलंद आवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने पद्मभूषण पुरस्काराच्या प्रक्रियेविषयी उपस्थित केलेले प्रश्न क्रीडा मंत्रालयाने झिडकारले असले तरी हे पुरस्कार देताना दुजाभाव केला जातो हे वास्तव लपलेले नाही.
सायनाची गेल्या काही वर्षांतली आंतरराष्ट्रीय पातळीवरची चमकदार कामगिरी पाहता तिला पद्मभूषण पुरस्कार मिळणार अशा चर्चा मीडियात सुरू होत्या. पण वास्तव असे होते की, तिच्या नावाची शिफारस खुद्द भारतीय बॅडमिंटन संघटनेने केली नव्हती व तसा पत्रव्यवहारही या संघटनेने क्रीडा मंत्रालयाशी केला नव्हता. हा पत्रव्यवहार किंवा शिफारस का केली नाही, असा सायनाचा रास्त सवाल आहे. क्रीडा मंत्रालयाने नियमाचा आधार घेत असे स्पष्टीकरण दिले की, सर्व खेळांच्या केंद्रीय संघटनांनी पाठवलेल्या शिफारशींवर अभ्यास करून पद्म पुरस्कारासाठी खेळाडूची शिफारस केली जाते व २०१३ सालच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी कुस्तीपटू सुशीलकुमार याची त्याचे एकंदरीत यश पाहून निवड करण्यात आली. याचा अर्थ असा की, सायनाची गेल्या काही वर्षांतली कामगिरी उत्कृष्ट असूनही पद्मभूषण पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस भारतीय बॅडमिंटन संघटनेने जाणूनबुजून केली नव्हती. पण मीडियाला सायनाच्या मूलभूत हक्कांचा विसर पडला व सायनाच पुरस्कारासाठी हपापलेली आहे, असे चित्र चार दिवस रंगवण्यात आले.
वस्तुस्थिती बाहेर आली आहे. आपली कामगिरी उत्तम असून जर बॅडमिंटन संघटना आपले नाव क्रीडा मंत्रालयाकडे पुरस्कारासाठी शिफारस म्हणून पाठवत नसेल तर त्यामागच्या अडचणी काय आहेत, याचे तिला उत्तर हवे होते. अर्थात हे उत्तर बॅडमिंटन संघटनेकडून मिळालेले नाही व आता सायनानेच या विषयाला तोंड फोडल्याने संघटनेचे पितळ उघडे पडले. भारताच्या बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दिवस आल्यानंतर संघटनेतील राजकारणाला ऊत आला होता. या खेळात गटातटाचे राजकारण शिरू लागले. सायनाने उपस्थित केलेल्या रास्त सवालांमुळेच आता तिच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी झाली आहे. तिला हा पुरस्कार मिळाला नाही तरी वाईट वाटणार नाही हे तिच्या खिलाडूवृत्तीतून दिसून येते; पण व्यवस्थेविरोधात तिने उठवलेला आवाज निश्चितच कौतुकास्पद आहे.