आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखा अस्मितेचा तारा निखळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र गोरखा भूमीवरून 1988 ते 90 या काळात प. बंगालमधील राजकारण घुसळून गेले होते. हिंसाचारात सुमारे 1200 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे हे राज्य भाषिक अस्मितेवरून दुभंगते की काय, अशी परिस्थिती आली होती. भाषिक व सांस्कृतिक अस्मितेच्या नावाखाली पंजाबमधील स्वतंत्र खलिस्तान चळवळीमुळे देशाने एक पंतप्रधान गमावल्याचा इतिहास ताजा असताना स्वतंत्र गोरखा राज्याचा प्रश्न उभा होणे हे देशापुढील आव्हान होते. प. बंगालमधील ज्योती बसू यांच्या सरकारपुढील पर्यायही मर्यादित होते. दार्जिलिंगमध्ये धुमसणा-या नेपाळी भाषिकांच्या स्वतंत्र गोरखा भूमी आंदोलनाला वेगाने पाठिंबा मिळत होता व या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुभाष घिशिंग हे लोकप्रिय नेते झाले होते.
घिशिंग यांनी 1980 मध्येच दार्जिलिंग प्रदेशातील टेकड्यांचे स्वतंत्र राज्य असावे यासाठी गोरखा राष्ट्रीय मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालवले होते. हे आंदोलन पुढे १० वर्षांत दार्जिलिंग परिसरात मूळ धरत गेले व त्यातून सुभाष घिशिंग एकदम राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आले. "ऊपर महाकाल, नीचे सुभाष घिशिंग' ही घोषणा लोकप्रिय होती. भाषिक उन्मादाच्या नावाखाली फुटीर नेतृत्व रोखणे गरजेचे असल्याने राजीव गांधी सरकारने या प्रश्नात हस्तक्षेप केला. या हस्तक्षेपावरून विरोधी पक्षांनी केंद्राचा राज्याच्या प्रश्नातील हस्तक्षेप हा संघराज्य प्रणालीवर हल्ला असल्याचा आरोप केला. पण जेव्हा या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले तेव्हा प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी राजीव गांधी यांच्याशी सल्लामसलत करून स्वतंत्र गोरखा भूमी आंदोलनातील हवा कमी करण्यात यश मिळवले. सुभाष घिशिंग यांच्या स्वतंत्र गोरखा भूमीची मागणी मान्य करण्यापेक्षा दार्जिलिंग परिसरातील टेकड्यांसाठी स्वतंत्र दार्जिलिंग गोरखा हिल्स कौन्सिल स्थापन करण्यात आली. हा तोडगा निमस्वायत्त स्वरूपाचा असल्याने प. बंगाल शांत झाला व घिशिंग यांचे राजकीय समाधानही झाले. या राजकारणाच्या जोरावर घिशिंग यांनी काही काळ दार्जिलिंग प्रदेशात आपले राजकीय वर्चस्व ठेवले; पण नंतर त्यांच्या संघटनेत फूट पडल्याने घिशिंग यांचे राजकीय वजन कमी होत गेले. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संघटनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांच्या निधनाने गोरखा अस्मितेचा एक अध्याय संपला आहे.