आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा विनम्र चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवण- एपीजे यांनी भारतापुढे महासत्ता होण्याचे स्वप्न ठेवले.

‘भारताचा मिसाइल मॅन' अशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ओळख बहुतेकांनी करून दिलेली आहे. भारताची सर्व प्रकारची क्षेपणास्त्र यंत्रणा उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, यात काहीही संशय नाही; परंतु तेवढ्या कारणाने कोणीही लोकांच्या हृदयात जाऊन बसत नाही.
प्रिन्स बिस्मार्क यांना जर्मनीचा लोहपुरुष असे म्हणण्यात येते. अब्राहम लिंकन यांना अमेरिकेचा दयाघन चेहरा असे म्हटले जाते. पीटर दी ग्रेट यांना आधुनिक रशियाचा निर्माता म्हटले जाते. नुकतेच दिवंगत झालेले एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचा विनम्र चेहरा, असे म्हणता येईल. ते २७ जुलै रोजी वारले. त्यांचे निधन अकाली झाले, असे म्हणता येत नाही. तरीही त्यांच्या निधनाने सगळ्या देशात शोककळा पसरली. याचे कारण असे की, भारताच्या सर्व लोकांच्या मनात त्यांनी स्वत:साठी एक जागा निर्माण केली होती.

ही जागा त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता, कोणत्याही विचारधारेचा प्रचार न करता, कोणत्याही धर्माचा आधार न घेता, कोणतीही वादग्रस्त भूमिका न घेता मिळवली होती. स्वातंत्र्यानंतर भारतात निर्माण झालेल्या नेतृत्वात कलाम यांचे नेतृत्व सगळ्यांपेक्षा अत्यंत वेगळे ठरले. ते इस्रोमध्ये काम करत असताना किंवा डीआरडीओमध्ये काम करत असताना, पंतप्रधानांचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार म्हणून काम करत असताना, राष्ट्रपती म्हणून काम करत असताना सदैव नम्र असत. यश कधीही त्यांच्या डोक्यात गेले नाही. या सर्व ठिकाणी काम करत असताना निरंतर कष्ट, सहकाऱ्यांविषयी आपुलकी, शीलाविषयी आग्रह त्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे ते सदैव सर्वांना हवेहवेसे वाटत राहिले. उद्धट आणि घमेंडखोर नेता लोकांच्या हृदयात जाऊन बसत नाही आणि निर्दयी सत्ताधीश जनतेच्या आदरास कधीही पात्र होत नाही. एपीजे या सर्व दोषांपासून शेकडो मैल दूर होते. म्हणून ते भारतातील आबालवृद्धांना आपले वाटत. ते गेल्यानंतर आपल्या घरातील कोणी तरी गेला अशी भावना सर्वांची झाली.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणगान करणारे अनेक लेख प्रकाशित झाले. ‘भारताचा मिसाइल मॅन' अशी त्यांची ओळख बहुतेकांनी करून दिलेली आहे. भारताची सर्व प्रकारची क्षेपणास्त्र यंत्रणा उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, यात काहीही संशय नाही; परंतु तेवढ्या कारणाने कोणीही लोकांच्या हृदयात जाऊन बसत नाही. साखारोव्ह यांना रशियाच्या हायड्रोजन बाॅम्बचे जनक मानण्यात येते; परंतु ते रशियाचे एपीजे झाले नाहीत. माणसाचा माणूस म्हणून विचार करणे हे एपीजे यांच्या स्वभावाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. शेवटचा प्रवास त्यांचा शिलाँगला झाला. या प्रवासात त्यांच्या संरक्षण ताफ्यात एक जीप होती. त्या जीपवर एक जवान हातात बंदूक घेऊन उभा होता. प्रवास दोन तासांचा होता. एपीजेंनी त्या जवानाला बसण्याच्या सूचना पाठवल्या; परंतु त्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. सुरक्षा अधिकाऱ्यांना तसे करणे योग्य वाटले नाही. दोन तासांनंतर प्रवास संपला, एपीजे यांनी त्या जवानाला जवळ बोलावले आणि म्हटले की, माझ्यासाठी तुला दोन तास उभे राहावे लागले. जवानाने उत्तर दिले, ‘साहेब, आपल्यासाठी दोन तास काय, सहा तास उभे राहण्याची माझी तयारी आहे.' सामान्य शिपायाविषयी एपीजेंची आपुलकी आणि शिपायाचा त्यांच्यावरील भक्तिभाव, सगळेच अद्भुत आहे, असे असंख्य किस्से त्यांच्याविषयीचे आहेत. माणूस महान होतो, तो केवळ ज्ञानाने नाही, शौर्याने नाही, उत्तम प्रशासक झाल्यामुळे नाही, तर या सर्व भूमिका पार पाडत असताना त्याचे मानवीय संबंध कसे असतात यावरून त्याचे मोठेपण ठरते.

एपीजे यांची दुसरी महानता म्हणजे त्यांनी भारतापुढे एक स्वप्न ठेवले. हे स्वप्न भारताला महासत्ता बनवण्याचे होते. ते म्हणत असत की, ‘भारत ताठ उभा राहिल्याशिवाय जगात कुणीही आपल्याला किंमत देणार नाही, या जगात भयाला काही स्थान नाही. सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करते.' भारत केवळ अस्त्र आणि शस्त्रांच्या बाबतीत सामर्थ्यसंपन्न होऊन चालणार नाही, तर भारताला आर्थिकदृष्ट्यादेखील सामर्थ्यसंपन्न झाले पाहिजे. भारत खेड्यांचा देश आहे. आपली खेडी कशी उत्तम होतील याची चिंता त्यांना होती. खेड्यांचा विकास कसा करावा याच्या त्यांनी काही संकल्पना मांडलेल्या आहेत. शहरांना ज्या सुखसुविधा दिल्या जातात त्या खेड्यांनादेखील मिळाव्यात, यासाठी त्यांचा शब्दप्रयोग होता ‘प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरिया’ (ग्रामीण भागाला शहरी सुखसुविधा मिळवून देणे). प्रत्येक खेडे चांगल्या रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे, प्रत्येक खेड्यात वीज, पाणी, प्राथमिक आरोग्यसेवा आणि शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे. अशा प्रकारे भारताचा विकास झाला तरच भारत जगातील एक महासत्ता होईल.

स्वप्न मांडायला काही जात नाही; परंतु एपीजे जेव्हा स्वप्न मांडत तेव्हा त्यामागे त्यांचे चारित्र्यबल, कर्तृत्वबल उभे राहत असे. स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी अगोदर स्वप्न बघायला शिका. आपल्या पूर्ण अंत:करणानिशी जो काम करीत नाही त्याला फारसे यश मिळत नाही. अनंत आकाशात पाहा, तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही एकाकी नाहीत. सारे विश्व तुमचे मित्र आहेत. तुम्ही स्वप्ने पाहिलीत की ती साकार करण्यासाठी कष्ट घेतलेत तर हे विश्व तुम्हाला भरभरून देण्यास तयार आहे,' या सर्वांमागे त्याचे कृतिरूप जीवन असे. ही स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्या मदतीला कोणी देवदूत येणार नाही किंवा विदेशातून कुणी येणार नाही, ती आपली आपल्यालाच साकार करायची आहेत. एपीजेंचे सांगणे असे रोखठोक असे. नकारात्मक विचार करण्याची सवय सोडून द्यायला पहिजे, असे त्यांचे देशाला सांगणे होते.
१२ मार्च २०१४ रोजी त्यांनी देशवासीयांना सकारात्मक विचार करण्यासंबंधी पत्र लिहिले होते. सकारात्मक विचार कसा, तर आपण जगातील दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहोत, रिमोर्ट सेन्सिंग सॅटेलाइट क्षेत्रात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. गहू उत्पादनात जगात आपला दुसरा क्रमांक आहे. तांदूळ उत्पादनातही दुसरा क्रमांक आहे. आपल्या सभोवती अनंत यशोगाथा आहेत; परंतु आपण या यशोगाथांचा विचार करण्याऐवजी भ्रष्टाचार, अनाचार, व्यवस्थेतील अनेक दोष याचीच चर्चा करत राहतो. आदर्श म्हणून आपण विदेशाची उदाहरणे ठेवतो - सिंगापूर, दुबई, शांघाय, टोकियो इथल्या व्यवस्थांची प्रशंसा करतो; परंतु अशा व्यवस्था आपल्या देशात उत्पन्न करण्यास मी काय करू शकतो याचा चुकूनही विचार करत नाही. या पत्राचा शेवट एपीजे अब्दुल कलाम यांनी जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकन लोकांना जो संदेश दिला त्या वाक्याने केला आहे. केनेडींच्या वाक्यात थोडा बदल करून एपीजे म्हणतात, आम्ही भारतासाठी काय करू शकतो याचा विचार करा.'
ramesh.patange@gmail.com
बातम्या आणखी आहेत...