आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रवाह : अखेर न्याय मिळाला…

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिघळलेली असतानाही भारतीय लष्करातील काही जवानांना बनावट चकमकीप्रकरणी शिक्षा होणे हे आपल्या न्यायव्यवस्थेचे यश आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील जनता व तेथे तैनात असलेले भारतीय लष्कर यांच्यातील संघर्ष अधिक वाढावा व त्याला खतपाणी घालण्याचे प्रयत्न होत असतात. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात असे प्रयत्न झाले होते. लष्कराकडून होणा-या बनावट चकमकी हा वादाचा मुद्दा राहिला आहे, पण गुरुवारी लष्करी न्यायालयाने दिलेला एक निकाल धगधगत्या काश्मीरमधील परिस्थिती निवळेल असा आहे. चार वर्षांपूर्वी काश्मीरमधील मछिल सेक्टरमध्ये भारतीय लष्करातील राजपुताना रेजिमेंटने तीन काश्मिरी तरुणांची बनावट चकमकीत हत्या केली होती. हे तरुण पाकिस्तानी घुसखोर असल्याचे दर्शवण्यासाठी त्यांची चकमकीत हत्या केल्याचा दावा प्रथम लष्कराने केला होता. लष्कराने हे तरुण पाकिस्तानातून आले असल्याचा एक पुरावा म्हणून या त्यांचे मृतदेह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकही पुरले होते. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीर खोरे पेटून उठले होते. या प्रकरणाच्या पोलिस तपासात अनेक धागेदोरे उलगडत गेले. लष्कराचा खब-या असलेल्या बशीर अहमद लोन व त्याचा पोलिस दलातील भाऊ कय्युम यांनी लष्करातील अधिका-यांकडून दीड लाख रुपये घेऊन तीन तरुणांचे एन्काउंटर घडवून आणले होते. या कटात राजपुताना रेजिमेंटचे त्या वेळचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. पठाणिया, कॅ. उपेंद्र सिंग, हवालदार देविंदर, लान्स नाईक लक्ष्मी व लान्स नाईक अरुण कुमार हे सामील झाले होते. पोलिसांनी तपासात पुरावे गोळा केल्यामुळे हे प्रकरण स्थानिक न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या प्रकरणात गुंतलेल्या लष्करी जवानांवर ठपका ठेवून या जवानांचे कोर्ट मार्शल करावे किंवा त्यांच्यावर नागरी खटला चालवावा, असे पर्याय लष्करापुढे ठेवले होते. या बनावट चकमकीचा मूळ हेतू लष्करातील शौर्यपदके व लक्षावधी रुपये मिळवण्याचा होता. गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये बनावट चकमकींना बळ मिळाले होते. अशा चकमकीच्या आडून अमली पदार्थांचा, शस्त्रास्त्रांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात केला जात होता. अलीकडेच मोटारीतून जाणा-या दोन काश्मिरी युवकांना लष्कराने दहशतवादी समजून चुकीने ठार मारल्याची कबुली दिली होती. आता मछिल घटनांमुळे लष्कराची प्रतिमा बरीच काळवंडली असली तरी पीडितांना अजून न्याय मिळू शकतो हे महत्त्वाचे आहे. भारतीय न्याययंत्रणेचे हे यश आहे.