आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Ramtirthakar About BJP And Congress Relation In Divyamarathi

आघाडी आता हास्यास्पद होतेय ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारण
६ नोव्हेंबरला पूर्वाश्रमीच्या जनता दलाचे नेते भाजप-काँग्रेसविरोधी आघाडी करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते. या मंडळींचे स्वत:मध्ये कधी पटले नाही. आता ते बांधत असलेली मोट किती काळ टिकेल, हा प्रश्न आहे.

प्राचीन महाकाव्य महाभारतामध्ये जरासंधाची एक गोष्ट आहे. अतिशय बलवान आणि अद्भुत वरदान लाभलेला जरासंध कौरवांच्या बाजूने होता. भीमाबरोबर त्याचे मल्लयुद्ध झाले. भीमाने जरासंधाला जमिनीवर पाडून एका मांडीवर पाय ठेवला. दुसरा पाय हातात घेऊन भीमाने जरासंधाला उभा चिरला. त्याच्या शरीराचे दोन तुकडे दोन बाजूला फेकले. युद्ध संपले असे वाटत असतानाच दोन तुकडे आपोआप जवळ येऊन एकमेकास चिकटले. हसत हसत जरासंध पुन्हा उभा ठाकला. असे अनेकदा झाले. भीम थकत चालला. त्याने कृष्णाकडे पाहिले. कृष्णाने जमिनीवरील एक काडी उचलून मोडली. तिचे दोन तुकडे विरुद्ध दिशेला टाकले. भीमाला त्याचा अर्थ कळला. त्याने जरासंधाला पुन्हा चिरले. त्याच्या देहाचे दोन तुकडे केले आणि ते विरुद्ध दिशेस फेकले. मग मात्र ते जुळले नाहीत.

आज ही कथा आठवायचे कारण जनता दलाचे एकत्रीकरण करण्याचा सहा नोव्हेंबरला झालेला प्रयत्न. त्या दिवशी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, जनता दल (सेक्युलर), समाजवादी आणि ओमप्रकाश चौटाला यांचा पक्ष यांची बैठक झाली. जयप्रकाश नारायण यांचे आपण सारे शिष्य, एका छत्राखाली येऊ आणि भाजप, काँग्रेसला समर्थ पर्याय देऊ असे ठरले. शेतकर्‍यांच्या आणि इतर प्रश्नांवर आगामी संसद अधिवेशनात भाजप सरकारला घेरण्याचाही निर्णय झाला. किती विचित्र! जरासंधाचे तुकडे किमान भीम करत होता. जनता दलाचे तुकडे स्वत:च केले. स्वत:च एकत्र आले. पुन्हा फुटले. अगदी गेल्याच महिन्यात मेरठला चरणसिंहपुत्र अजितसिंह यांच्या पुढाकाराने अशीच बैठक झाली. ही मंडळी तेव्हाही एकत्र आली. फक्त मुलायम नव्हते. या बैठकीत अजितसिंह नव्हते. मेरठच्या बैठकीनंतर ही एकी किती दिवस टिकणार असा प्रश्न आला. त्याचे उत्तर महिनाभरात मिळाले. ही मंडळी स्वत:स जेपींचे अनुयायी म्हणवत असली तरी ते जनता दलाचे म्हणजे विश्वनाथ प्रतापसिंह यांचे चेले आहेत. जनता दलाचा जन्म होण्यापूर्वीच १९७८ मध्ये जेपींचे देहावसान झाले. व्ही. पी. सिंह यांनी १९८९ला जनता दल स्थापन केले. त्यात प्रामुख्याने पूर्वीचे समाजवादी एकत्र आले. समाजवाद्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सतत कोणाशी तरी भांडायचे. भांडायला कोणी नसेल तर आपापसात भांडतील. समाजवादी, प्रजासमाजवादी, संयुक्त समाजवादी असे तुकडे आधी पडले. जनता पक्षात ते एकत्र आले. १९८४ नंतर पुन्हा तुकडे केले. व्ही. पी. सिंग यांनी त्यांना एकत्र केले. १९९० नंतर काही वर्षे जनता दलाचा बोलबाला होता. त्यात सारे समाजवादीच होते. साहजिकच भांडाभांडी होऊन एकेक तुकडा वेगळा झाला. खुद्द व्ही. पी. सिंग यांनी १९९९ मध्ये" जनमोर्चा' नावाचा पक्ष काढून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आज एकत्र आलेल्यांनी "जनमोर्चा'च्या उमेदवारांविरुद्ध लढून "जनमोर्चा' संपवला. या लोकांनी जेपींची किंमत ठेवली नाही तशीच व्ही.पीं.चे. एकत्र येणे त्यांच्या स्वभावातच नाही, हे यापूर्वी अनेकदा दिसले आहे.

‘काँग्रेस आणि भाजपविरोधात’ हा त्यांचा दावाही खोटा आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या नऊ जागांच्या पोटनिवडणुकीत लालू-नितीश आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते. लालूंनी काँग्रेससोबत राहून पाची बोटे तुपात बुडवली. स्वत: केंद्रात मंत्री, बायको मुख्यमंत्री असे फायदे उपटल्यावर आता काँग्रेसविरोधाला मूल्य काय? नितीशनी भाजपसोबत किती वर्षे सत्ता उपभोगली. रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री हे स्वत:च्या बळावर शक्य होते का? भाजपशी साथ तुटताच काँग्रेसच्या मदतीनेच नितीशनी मुख्यमंत्रिपद टिकवले. आता त्यांचे ‘भाजप-काँग्रेस विरोधात’ हे म्हणणे कितपत गांभीर्याने घ्यायचे? देवेगौडा असेच. काँग्रेस-भाजप दोघांशी दोस्ती केली. का तर मुलाला मुख्यमंत्री करायचे होते. जनता पक्षात असताना याच देवेगौडांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्याविरुद्ध बंड करून जनता पक्ष फोडला होता. काँग्रेस-भाजपला विरोध हे ठीक, पण हेगडे काय वाईट होते?

मेरठची बैठक उत्तर प्रदेशात असूनही मुलायम तिकडे गेले नाहीत... कारण उघड आहे. मुलगा अखिलेशला उत्तर प्रदेशात अजितच्या रूपाने नवा प्रतिस्पर्धी निर्माण होणे त्यांना नको होते. कुटुंबाच्या हितापलीकडे मुलायमना राजकीय विचारच नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासोबत अब्दुल कलाम यांना पाठिंबा देऊन २४ तास व्हावयाच्या आत मुलायमनी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. अमेरिकेच्या अणुकरारासंदर्भात एका रात्रीतून पलटी मारत काँग्रेसला मदत केली. अविश्वास ठरावाच्या वेळी पैसे वाटून विरोधी खासदार फोडणारे अमरसिंह तेव्हा मुलायम यांचे उजवे हात होते. राजकारणातील सर्वात अविश्वसनीय व्यक्ती म्हणजे मुलायमसिंह. या टोळक्यात ते आज आहेत. उद्या असतीलच असे नाही.
दुष्यंत चौटाला याची दखल घेण्याचेही कारण नाही. वडिलांनी जा म्हटले म्हणून मुलगा आला. पिताश्री ओमप्रकाश चौटाला किती वर्षे भाजपबरोबर होते. आता बाहुबली, गुंड म्हणून भाजपने झिडकारले. पाठोपाठ जनतेनेही झिडकारल्यावर चौटाला या कंपूत आले. यापैकी एकही जण सच्च्या दिलाचा नाही. सौ चूहे खाके बिल्ली चली हज को अशी प्रत्येकाची अवस्था आहे. हे कसला समर्थ पर्याय देणार, या प्रश्नावर विचार करण्यापूर्वी किती दिवस एकत्र राहणार, याचा विचार करावा लागेल. कशात काय फाटक्यात पाय, अशी अवस्था असताना लोकसभेत सरकारला घेरण्याची भाषा करतात. या सर्वांचे मिळून लोकसभेत १५ खासदारही नाहीत. सरकारला घेरायचे तर काँग्रेसची कुमक लागेलच. ती कशी घेणार?

यापूर्वी हीच मंडळी निवडणूक आली की तिसरी आघाडी म्हणून आरोळी ठोकत. मुलायम, ममता, नवीन पटनाईक, जयललिता, बुद्धदेव भट्टाचार्य असे पाच-पाच मुख्यमंत्री असत. आघाडीचा नेता ठरत नसे. आघाडीचा जन्म होत नसे. मुलायम आहेत तर मायावती नाही, डावे आहेत तर ममता नाही अशी तेढ आहेच. तिसऱ्या आघाडीचे सर्व प्रयोग हास्यास्पद ठरल्यावर आता तो शब्द टाळून जनता दलाचे एकत्रीकरण असे नाव घेण्यात आले आहे. तीच पात्रे, तेच पूर्वचारित्र्य यामुळे हा प्रयोगही अल्पजीवी आणि हास्यास्पद ठरल्याशिवाय राहणार नाही.
यापूर्वी हीच मंडळी निवडणूक आली की तिसरी आघाडी म्हणून आरोळी ठोकत. मुलायम, ममता, नवीन पटनाईक, जयललिता, बुद्धदेव भट्टाचार्य असे पाच-पाच मुख्यमंत्री असत. आघाडीचा नेता ठरत नसे. आघाडीचा जन्म होत नसे. मुलायम आहेत तर मायावती नाही, डावे आहेत तर ममता नाही अशी तेढ आहेच. तिसऱ्या आघाडीचे सर्व प्रयोग हास्यास्पद ठरल्यावर आता तो शब्द टाळून जनता दलाचे एकत्रीकरण असे नाव घेण्यात आले आहे.