आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक न्यायाचा चमत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादलित मतांच्या शाश्वतीसाठी नितीशकुमारांनी जीतनराम माझींना मुख्यमंत्रिपद देण्याची खेळी नक्कीच खेळली असावी, पण हिंदुत्वाच्या आव्हानाला सामाजिक न्यायाच्या शस्त्राने नामोहरम करता येते, असा संदेशही त्यांना द्यायचा असावा...
प्राचीन भारताप्रमाणेच भारतीय लोकशाहीसुद्धा चमत्कारांचा भलामोठा पेटारा आहे. या लोकशाहीने जसे बहुसंख्याक राष्ट्रवाद आणि विकासाचा पुकारा करणार्‍या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पोहोचवले आहे, तसेच सामाजिक न्यायासाठी झगडणार्‍या बिहारमध्ये जीतनराम माझी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून जादुई शक्तीचा परिचयही करून दिला आहे. दलितांमधील दलित, सामाजिकदृष्ट्या शोषित, दुर्लक्षित मुसहर जातीतले जीतनराम माझी राजकीय अपरिहार्यतेपोटी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले असले, तरीही या घटनेचे महत्त्व कमी होत नाही. यात ही शक्यता अधिक आहे की, राज्याबाहेर नरेंद्र मोदी, भाजप आणि राज्यात लालूप्रसाद आणि शरद यादव यांनी तयार केलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने, नितीशकुमारांनी ही खेळी नक्कीच खेळली असावी; पण हिंदुत्वाच्या आव्हानाला सामाजिक न्यायाच्या शस्त्राने नामोहरम करता येते, असा संदेशही त्यांना द्यायचा असावा.
या राजकीय मर्यादेतही जीतनराम माझी यांचे मुख्यमंत्री बनणे, ही मायावतींनी उ. प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याइतकीच महत्त्वाची घटना आहे. वस्तुत: यापूर्वी रामसुंदर दास हे दलित समाजातील नेते बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ही घटना तब्बल 34 वर्षांपूर्वीची आहे. मधल्या काळात रामविलास पासवानांचा राजकीय उदय बिहार नव्हे, तर देशातील दलित समाजासाठी प्रतिष्ठा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु, जीतनराम यांचे मुख्यमंत्री होणे ज्या मुसहर समाजासाठी गौरवाचा विषय आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळमधला सर्वहारा समाज आहे. या समाजापर्यंत स्वातंत्र्यानंतर राबवल्या गेलेल्या कल्याणकारी योजना पोहोचलेल्या नाहीत. हा समाज किती तरी पिढ्या जमीनदारांच्या शेतांमधले उंदीर पकडणे आणि उंदरांनी बिळामध्ये दडवून ठेवलेले धान्य मिळवणे एवढ्यावरच आपली गुजराण करत आला आहे. यातही शेतातले उंदीर पकडले गेल्याने धान्य सुरक्षित राहून फायदा जमीनदारांचाच होत आला आहे आणि मुसहर जातीचे अप्रत्यक्षपणे शोषणच होत आले आहे.
एका बाजूला माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट होत असताना आजही मुसहर समाजातील साक्षरतेचा दर 3 टक्के आहे. महिलांमध्ये हाच दर नाममात्र एक टक्का इतकाच आहे. आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न अशा तिन्ही पातळ्यांवर संघर्ष करत असलेल्या या समाजात समाविष्ट असलेले जवळपास 85 टक्के लोक कालाजार (जॅपनिज इनसिफिलायटिस), मलेरिया आदी अस्वच्छतेमुळे पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त आहेत. तुलनेने बिहारमध्ये या समाजाच्या कल्याणासाठी नितीशकुमारांनी काही कल्याणकारी योजना आखल्या, त्या योजनांना जीतनराम माझींचा चेहरा मिळवून दिला. समाजकल्याण मंत्री असताना माझींनी महादलितांसाठी अग्रक्रमाने योजना राबवून ‘जदयू’चा जनाधार वाढवण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. सहा वेळा विधानसभेत निवडून गेलेल्या जीतनराम माझींकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यापूर्वी नितीशकुमारांनी प्रतीकात्मकरीत्या मुसहर जातीतल्याच दशरथ माझींना एक दिवसाचे मुख्यमंत्रिपद सन्मानपूर्वक दिले होते, हे राज्याबाहेर अनेकांना ठाऊक नाही. दशरथ माझी हे अशा ध्येयवेड्या माणसाचे नाव आहे, ज्या माणसाने दिवंगत पत्नीप्रेमाची साक्ष म्हणून एकहाती डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. त्याच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षापासून प्रेरणा घेऊन एक हिंदी चित्रपटही आकारास येत आहे.
जात व्यवस्था हे भारतीय समाजजीवनाचे व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे. जात उत्पत्तीच्या अनेक दारुण कथासुद्धा आपल्याकडे प्रचलित आहेत. दशरथ माझींची जीवनगाथा वा शेतकरी मजुराच्या कुटुंबात जन्माला येऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले जीतनराम माझी यांचा आजवरचा प्रवास चित्तवेधक यशोकथा आहेतच, पण पौराणिक कथांचेही आपल्या संस्कृतीत स्वत:चे आगळे स्थान राहिले आहे. एका पुराणकथेनुसार असे मानले जाते की, मुसहर हे राजवंशीय क्षत्रिय कुलातले आहेत. देवाने माणूस जन्माला घातला. त्याला वाहन म्हणून घोडा दिला. त्या वेळी मुसहर जातीतल्या काही लोकांना घोड्यावर मांड कशी ठोकावी आणि घोडेस्वारी कशी करावी हे उमगले. ज्यांना हे उमगले नाही, त्यांनी घोडेस्वारी करताना घोड्याच्या पोटावर मोठे छिद्र करत त्यात आपले दोन्ही पाय ठेवण्यास सुरुवात केली. या प्रकाराने नाराज झालेल्या देवाने समस्त जातीला कायमस्वरूपी दारिद्र्याचा शाप दिला. ही पुराणकथा खरी किती, खोटी किती, हा वादाचा मुद्दा असला तरीही पुराणात शाप म्हणून मिळालेल्या दारिद्र्यापासून मुसहर जातीची अजूनही सुटका झालेली नाही, हे कटू वास्तव आहे. जे कुणालाही नाकारता येणार नाही.
त्यातही बिहारच्या मुसहर जातीतल्या लोकांच्या मागासलेपणाचे आणि विपन्नावस्थेचे अनेक दाखले आहेत, सुबुद्धांना हतबल करू पाहणार्‍या असंख्य वास्तव कहाण्या आहेत. या कहाण्यांमधून अधोरेखित होणारे वास्तव बदलण्यासाठी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांच्या पातळ्यांवर बरे-वाईट प्रयत्नदेखील होत आहेत. 1989 मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर लालूप्रसादांनी घोषणा केली होती की, मुसहर जातीतला जो उमेदवार मॅट्रिक उत्तीर्ण असेल, त्याची थेट कारकूनपदी नियुक्ती करण्यात येईल. परंतु खेदाची बाब म्हणजे, त्या वेळी मॅट्रिक झालेले 200 पेक्षा अधिक मुसहर शासनाला गवसले नव्हते. शिक्षणाच्या बाबतीत असे चिंताजनक मागासलेपण अनुभवणार्‍या मुसहर जातीमध्ये असाही एक समज प्रचलित आहे की, विटा-सिमेंटच्या घरात राहणे ही एक अशुभ बाब आहे. याचमुळे गावागावांमध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे तयार होऊनही मुसहर मात्र त्यात राहण्यास नकार देत आले आहेत. या अनिष्ट परंपरेला चिकटून राहिल्यानेच आजवर अनेकदा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी स्वत:चा बचाव करणे त्यांना अवघड गेले आहे. जग गगनचुंबी इमारतीत ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असताना परंपरागत पद्धतीची माती-चार्‍याची घरेच मुसहर जातीतल्या लोकांच्या जीवनपद्धतीचा भाग होऊन राहिली आहेत. अर्थात, ज्या परंपरेमुळे मुसहर जातीला उपेक्षेचे जीवन नशिबी आले आहे, त्यातल्याच एका परंपरेने मुसहरांना समाजात मानाचे स्थानही दिले आहे. ती परंपरा आहे, उच्चवर्णीय घरच्या मृत्यूनंतर मुसहरांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याची. या परंपरेअंतर्गत मुसहरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. ते नसताना अंत्यसंस्कार केले गेले तर तो परंपरेचा अपमान समजला जातो. धार्मिकदृष्ट्या मुसहर काही आदिवासी देव-देवतांचे पूजक आहेत, पण मुख्यत: हिंदू धर्माला मानणारे आहेत. हनुमान, शंकर आणि काळभैरव ही त्यांची आराध्य दैवते आहेत.
मुसहर जात ही जितकी उंदीर मारणारी जमात म्हणून परिचित आहे, तितकीच उंदीर खाणारी म्हणूनही बदनाम आहे. यासंदर्भात मानववंश अभ्यासक कुमार सुरेश सिंग यांचे म्हणणे असे आहे की, आता केवळ मुंगेर, लखीसराई अशा मोजक्याच जिल्ह्यांत ही प्रथा आढळते. पण उंदरांचे भक्षण करणे ही एक कुणा एका जातीची खाद्यसंस्कृती नाही. छत्तीसगडपासून झारखंडपर्यंतच्या क्षेत्रात विखुरलेल्या आदिवासींच्या अनेक जमातींमध्ये उंदीर खाण्याची प्रथा आढळते. एकीकडे विशिष्ट जीवनपद्धतीमुळे बदनाम झालेले मुसहर डुक्कर पाळण्यापासून दगड फोडण्यापर्यंतची कामे करत असतात. अलीकडच्या काळात शेतमजुरी हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मात्र, अनेकदा मेहताना म्हणून पैसे देण्याऐवजी कांदे, बटाटे वा मूठभर धान्य देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. मुसहरांना शोषणाच्या या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी जे. के. सिन्हांसारखे माजी आयबी अधिकारी ‘शोषित समाधान केंद्र’ नावाची संस्था चालवत आहेत. असेच प्रयत्न ‘प्रेरणा’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत सुधा वर्गीस यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या करत आल्या आहेत. याउपर मुसहर जातीतली काही मुले मोफत शिक्षणाचा लाभ घेत पुढे जाताहेत, तर काही ठिकाणी अनेकांना मिड-डे मिल योजनेचा लाभ घेताना संघर्ष करावा लागत आहे. अविरत संघर्षाच्या या पार्श्वभूमीवर जीतनराम माझी यांच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याने मुसहर जातीतील लोकांसाठी संधीचे दार किलकिले झाले आहे. नितीशकुमारांचे हे राजकारण, कुणाच्या फायद्याचे ठरेल याचे भाकीत वर्तवणे अवघड असले तरीही, बदलाच्या दिशेने नेणारा हा एक मैलाचा दगड आहे.