आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरबारी गणेशाेत्सव टिळकांनीच केला सार्वजनिक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांतारामाच्या चाळीत गणेशाेत्सवानिमित्त झालेली लाे. टिळकांची सभा. - Divya Marathi
शांतारामाच्या चाळीत गणेशाेत्सवानिमित्त झालेली लाे. टिळकांची सभा.
लोकमान्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला, त्याला यंदा १२५ वर्षे होत आहेत. पुण्यातील भाऊसाहेब रंगारी यांच्या मंडळाने हे वर्ष १२६ असल्याचा दावा केला आहे. कळीचा मुद्दा हा की, या मंडळाला गणेशोत्सवाला सार्वजनिक करून शंभर वर्षे किंवा ७५ वर्षे झाली तेव्हा ही कल्पना सुचली नाही. तेव्हा कोणीही हा वाद उभा केलेला नव्हता. मग आताच का? या खेपेच्या गणेशोत्सवावर पुणे महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातात प्रथमच ही महापालिका आलेली आहे. लोकमान्य टिळकांच्या पणतसून मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर आहेत आणि त्यांच्या पक्षातल्यांसह अनेकांचा त्या पदावर डोळा आहे. अर्थातच हे काही त्याचे एकमेव कारण नाही. पुण्यातले आणि पर्यायाने महाराष्ट्रातले वातावरण दूषित करण्याचा विडाच ज्यांनी उचललेला आहे त्यांना असले विषय नेहमीच सुचतात, पण त्यातलाच हा एक म्हणून तो सोडून देण्यात अर्थ नाही. हा विषय समजून घेण्यासाठी तो काळ काय होता आणि लोकमान्यांना तरी तेव्हा हा गणेशोत्सव सार्वजनिक का करायला हवा, असे वाटले त्याचा विचार करायला हवा.

‘गणेशोत्सवाची साठ वर्षे’ हे पुस्तक केसरी संस्थेने  या आधी प्रसिद्ध केले होते. त्याचाच पुढला भाग म्हणूया हवे तर केसरीचे माजी संपादक चंद्रकांत घोरपडे यांच्या संपादनाखाली केसरीनेच ‘गणेशोत्सवाची शंभर वर्षे’ हे पुस्तक १९९२ मध्ये नव्याने प्रसिद्ध केले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे चौथे वर्ष १८९६ मध्ये चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर ‘श्रीगजाननाचा राष्ट्रीय महोत्सव’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात (२२ सप्टेंबर १८९६) लोकमान्यांनी पुणे शहर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कसे गजबजून गेले होते त्याचे वर्णन करून ते म्हणतात, ‘शहरातील सर्व जातींचे व धंद्यांचे लहानथोर मनुष्य अशा रीतीने एका कार्याकरिता झटत असल्याचे उदाहरण क्वचितच सापडेल. गेल्या दहा दिवसांत सर्व शहरातील लोकांच्या मनोवृत्ती उचंबळल्याच होत्या की काय, असा परोपरी भास होत होता.’ लोकमान्यांना हेच घडवून आणायचे होते, असे सांगून घोरपडे लिहितात, ‘वेगवेगळ्या जाती-जमातींची माणसे एकत्र येतील यासाठी असे एखादे दैवत लोकमान्यांना हवे होते ही गोष्ट शिवजयंतीचा उत्सव सुरू करण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीच्या वेळीसुद्धा दिसून आली.

घोरपडे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव’ या उपशीर्षकाखाली जी माहिती दिली आहे त्यात या उत्सवाची स्थापना १८९२ मध्ये झाल्याचा उल्लेख आहे, पण पुढे जे लिहिले आहे ते या वादावर अधिक प्रकाश टाकणारे आहे. त्यात म्हटले आहे, ‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव गणपतीचे उगमस्थान म्हणून भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपतीची नोंद करावी लागेल. इ.सन १८९३ (शके १८१५) मध्ये पुण्यातील काही निवडक मंडळींची बैठक वैद्य भाऊसाहेब रंगारी यांचे निवासस्थानी भरली होती. त्या बैठकीत गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा करावा, असे ठरले आणि घरातील आदिदैवत श्रीगणेशाला सार्वजनिक मांडवात आणण्याचा इतिहास घडला. या सर्व लिखाणावरून एक निष्कर्ष नक्कीच काढता येऊ शकतो की, १८९२ मध्ये स्थापना झालेला या मंडळाचा गणपती तेव्हा सार्वजनिक नव्हता. तो टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेतून १८९३ मध्येच सार्वजनिक झाला. या ऐतिहासिक गोष्टीला तेव्हाचे ते मंडळ साक्ष होते. आज त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे भाऊसाहेब रंगारी हेच एकमेव जनक आहेत, असे वाटू लागले आहे हे आश्चर्याचे आहे.
 
१८८५ नंतरच्या कालखंडात मोहरमच्या ताबुतांपुढे हिंदू समाज नाचत असे. टिळकांना हे मान्य नव्हते. याचा अर्थ ताबुतांपुढे ‘धुल्ला धुल्ला’ करत कोणीच वेडेवाकडे नाचू नये, असाही होतो. टिळकांनी १७ जुलै १८९४ रोजी ‘मोहरम व हिंदूंची वृत्ती’ हा अग्रलेख लिहिला. त्यात ते लिहितात, ‘सारांश यंदाचा डोल्यांचा उत्सव त्याच्या मूळ पीठिकेप्रमाणे बहुतेक शोकोत्सवाप्रमाणेच झाला.’ थोडक्यात मुसलमानांचा असणारा हा कार्यक्रमही त्याला मिळत असलेल्या त्या काळच्या उत्सवी स्वरूपातून बाहेर काढून टिळकांनीच त्यास त्याचे मूळ रूप मिळवून दिले. हाच अग्रलेख लिहिला त्या वर्षी म्हणजे १८ सप्टेंबर १८९४ रोजी त्यांनी ‘गणपतीचा उत्सव’ हा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात त्यांनी प्रारंभीच त्या आधीच्या वर्षी (१८९३ मध्ये) साजऱ्या झालेल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उल्लेख केला आहे. या अग्रलेखात त्यांनी शेवटी जे म्हटले आहे ते आजही तितकेच लागू पडणारे आहे. ते लिहितात, ‘पुण्यास गडबड झाल्यापासून काही हिंदू धर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणविद्वेषी लोकांनी मराठे आणि ब्राह्मण यांत फूट पाडून सर्व हिंदू समाजाचे अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली आहे. करितां आपण सर्वत्रांनी या वेळी सावध असले पाहिजे.
 
आज दोन हजार वर्षेंपर्यंत ज्या मराठे ब्राह्मणांची सांगड सुटली नाही, जे मराठे आणि ब्राह्मण मुसलमानांच्या ऐन भरभराटीत म्हणजे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात एकमेकांच्या खांद्यास मदत देऊन हिंदू लोकांची महती वाढण्यासाठी झटत होते; औरंगजेबासारख्या कडकडीत इमामांच्या हातूनही जे जू फुटले नाही, ज्या उभयतांनी शेवटपर्यंत राज्यधुरेचा परित्याग केला नाही, जे युरोपियन भटांच्या आपमतलबी वाग्जालाला भुलले नाहीत, त्या मराठे व ब्राह्मणांमध्ये बिघाड पाडण्याचे काम अळणी लोकांकडून कसले सिद्धीस जाते म्हणा, पण नीच लोक आपल्या प्रयत्नांत चुकत नाहीत एवढे खरे आहे. आता हे लक्षात ठेवले पाहिजे की, हिंदू समाजाच्या या दोन आधारस्तंभांनी उभयतास हितकर होईल असे वर्तन ज्याप्रमाणे आजपर्यंत ठेवले तसेच पुढेही ठेवले पाहिजे. संकटसमयी एकमेकांस उपदेशाची, पैशाची, सल्लामसलतीची मदत करणे, एकमेकांस सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणे, इत्यादि प्रेमसूचक गोष्टींनी आपले युग्म संलग्न होत जाणार आहे. तेव्हा ज्या ज्या योगाने आपला निकट संबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.’ या सर्व विचारांवरून टिळकांनी जी भीती तेव्हा व्यक्त केली होती तीच आजही पुन्हा एकदा डोके वर काढत आहे, असेच म्हणावे लागते. अन्यथा आताच हा उत्सव कोणी सुरू केला हा एवढा प्रतिष्ठेचा विषय केला जाण्याचे कारण नव्हते.  
 
टिळकांनी त्या वेळच्या स्थितीत इंग्रजांना हिंदू अाणि मुस्लिम समाजांची झुलवाझुलवी बंद करण्याचा इशाराही दिलेला होता. यासंदर्भात डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या ‘कर्मयोगी लोकमान्य’ या ग्रंथात अतिशय समर्पक कारणांचा मागोवा घेतला आहे. अंजेलो गुबरनातिस हा संस्कृतचा प्राध्यापक मूळचा इटलीचा.  त्याच्या मते छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या काळातही गणेशोत्सव साजरा होत असे. ती प्रथा पुढे बंद पडली. ग्वाल्हेरच्या राजपत्रात १८८६ च्या तिथल्या गणेशोत्सवाचा उल्लेख आहे. मुंबईच्या उत्सवाचीही नोंद गुबेरनातिसने घेतलेली आहे. सांगली संस्थानचा गणपती १८३३ च्या सुमारास बसवला गेल्याची नोंद आहे. याचा अर्थ लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी ही प्रथा काही संस्थानांमध्ये अस्तित्वात होती, तशी ती पेशवे दरबारातही होती. मात्र, टिळकांनी त्याला या दरबारांमधून बाहेर काढून रस्त्यावर आणून बसवले यात शंका बाळगायचे कारण नाही.
 
भाऊसाहेब रंगारी हे तेव्हा टिळकांबरोबर होते. भाऊ रंगारी आणि टिळक यांच्यात कोठेही वाद नव्हता आणि दावा तर मुळीच नव्हता. उलट जेव्हा विसर्जन मिरवणुकीत रंगारी यांच्या गणपतीचे स्थान कोणते असा वाद निर्माण झाला तेव्हा टिळकांनीच शेवटून तिसरा हा क्रमांक त्यास दिला आणि तो वाद मिटला. अाता काहीही म्हटले तरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक ही बिरुदावली टिळकांकडेच जाते यात शंका बाळगायचे कारण नाही.  
 
arvindgokhale@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...