आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Joshi Article About Congress, Divya Marathi

काँग्रेस : एक बुडते जहाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव समोर दिसत आहे. या वातावरणातून मार्ग काढून पक्षाला सावरण्याची संघटनात्मक आणि वैचारिक ताकद एकाही काँग्रेस नेत्यात नाही. मात्र काँग्रेस पक्ष असा अध:पतनाकडे वाटचाल करत असताना भाजपची ताकद वाढत जाईल या भीतीने हवालदिल झालेल्या काही काँग्रेसच्या आणि समाजवादी विचाराच्या पत्रकारांनी आणि विचारवंतांनी काँग्रेसच्या नेत्यांचे सांत्वन करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तरी तो उसळी मारून वर येईल, अशी खोटी आशा हे लोक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दाखवत आहेत. परंतु स्वातंत्र्यापासूनच्या काँग्रेसच्या वाटचालीचा विचार केला तर असे दिसून येईल की, काँग्रेसचे वर्चस्व क्रमाक्रमाने कमी होत चालले आहे. मात्र या खाली खाली चाललेल्या आलेखामध्ये जेव्हा भावनिक मुद्द्यांच्या आधारावर निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसची सरशी झालेली दिसते. पण ती काँग्रेसच्या कामगिरीमुळे झालेली नव्हती. बांगला देश युद्ध, मोरारजी सरकारमधील गोंधळ, इंदिरा गांधींची हत्या आणि राजीव गांधींची हत्या अशा भावनिक लाटा निर्माण करणार्‍या विषयांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसने उसळी घेतल्यासारखे वाटले. मात्र जेव्हा सामान्य स्थितीत निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस पक्षाची अधोगतीच होत गेली.

काँग्रेस पक्ष पुन्हा उसळी मारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे, परंतु ती निरर्थक आहे. काही राज्यांत भावनिक मुद्द्यावरील निवडणुकीच्या काळातसुद्धा काँग्रेसला उसळी मारता आलेली नाही. 1967 पासून तामिळनाडूमध्ये काँग्रेसला आपली ताकद कधीच दाखवता आली नाही. 1967 पर्यंत तामिळनाडूत काँग्रेसचे राज्य होते आणि 1967 मध्ये कामराज नाडर यांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेसचे सरकार पराभूत झाले. त्यानंतर म्हणजे जवळपास पन्नास वर्षांत काँग्रेसला तामिळनाडूमध्ये सरकारही स्थापन करता आले नाही. अगदी भागीदारीतसुद्धा सत्ता मिळवता आली नाही.

पश्चिम बंगालमध्ये 1972 मध्ये सिद्धार्थ शंकर रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. 1977 मध्ये हे सरकार पराभूत झाले आणि तेव्हापासूनच्या 37 वर्षांत तिथे काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. तिथे डाव्या आघाडीने सलग सात वेळा निवडणुका जिंकल्या. या काळात काँग्रेसला अनुकूल अशा लाटा आल्या, पण तिथे सत्ता मिळवणे काँग्रेसला शक्य झाले नाही. डाव्या आघाडीसारखी सलग निवडणुका जिंकण्याची अशीच परंपरा गुजरातेत भाजपने निर्माण केली. तिथेही 1987 पासून काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2002, 2007 आणि 2012 अशा सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. पण त्यांच्या पूर्वीही भारतीय जनता पार्टीने दोन निवडणुका जिंकल्या होत्या. गुजरातेतला भाजपचा विजय हा तिरंगी लढतीतला, विरोधकांच्या मतांची फाटाफूट झाल्यामुळे मिळालेला असा नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये तिथे सरळ लढती झालेल्या आहेत आणि भाजपने प्रत्येक निवडणूक काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून मिळविलेला आहे. गुजरातेत काँग्रेसला उसळी मारता आलेली नाही.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेस पक्ष सलग तीन निवडणुका हरला आहे. म्हणजे तिथे काँग्रेसला 15 वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. पंजाबमध्ये हीच गोष्ट सलग दोन वेळा घडली आहे. राजस्थानमध्येसुद्धा भाजपला सलग तीन विजय मिळाले असते, पण भाजपतल्या अंतर्गत बंडाळीमध्ये मध्येच एकदा 2008 मध्ये काँग्रेसचा निसटता विजय झाला आणि सहा अपक्ष आमदारांना फोडून काँग्रेसने कशीबशी सत्ता मिळवली. आता मात्र तिथे काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झालेला आहे. विधानसभेच्या 200 पैकी फक्त 28 जागा या पक्षाला मिळवता आल्या आहेत.

उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातल्या दोन मोठ्या राज्यांमध्ये 1980 मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली होती. परंतु 1985मध्ये या दोन्ही राज्यांतली सत्ता काँग्रेसच्या हातातून गेली आणि तेव्हापासून या दोन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला पुन्हा कधीही डोके वर काढता आलेले नाही. आता सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत 400 पैकी 20 जागा काँग्रेसच्या हातात आहेत, तर बिहारमध्ये 320 पैकी 5 जागा काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसने ईशान्य भारतातली सात छोटी राज्ये, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, केरळ अशा छोट्या छोट्या राज्यांमध्ये स्थान टिकवलेले आहे. त्यालाच काँग्रेसचे नेते महत्त्व देत आहेत आणि 13 राज्यांत आपले मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. पण देशातल्या मोठ्या राज्यातून काँग्रेस कित्येक वर्षांपासून अशी पराभूत झालेली आहे की, तिथे पुन्हा काँग्रेसचे पुनर्वसन होणे शक्य नाही.