आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा राम...आसाराम!(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ‘थोर’ आध्यात्मिक ‘सत्पुरुष’ आसारामबापू यांना शनिवारी रात्री जोधपूर पोलिसांनी अटक केली. त्यावरून आध्यात्मिक परंपरेने डोळे दिपवून टाकणा-या भारतवर्षातील बोलभांड चॅनल्सनी चर्चेचा भलामोठा धुरळा उडवून दिला. ‘पुरुषोत्तम’ असा शब्द आसारामबापूंच्या चरित्राची ओळख करून देणा-या एका ग्रंथात त्यांच्यासाठी योजला आहे. पाच हजार वर्षांची सांस्कृतिक परंपरा (!) लाभलेल्या भारतामध्ये पुरुषार्थाचा नेहमीच सन्मान केला जातो, असे काही संस्कृतिरक्षक सांगत असतात. मात्र आसारामबापू यांनी ज्या प्रकारचा ‘पुरुषार्थ’ आपल्या कृत्यांतून दाखवला (असा आरोप होत आहे!) त्याचा निषेध करायला एकही संस्कृतिरक्षक पुढे येऊ नये, याचे सामान्य माणसाला निश्चितच आश्चर्य वाटत आहे. नावात नुसता राम आहे म्हणजे त्या व्यक्तीत प्रभू रामचंद्राचे सगळे सद्गुण अंगी बाणलेले आहेत, असे कधी होत नाही. प्रभू रामचंद्राचा ‘मर्यादापुरुषोत्तम’ असा लौकिक होता. त्यामुळे प्रभू रामचंद्राला देवत्व प्राप्त झाले होते. पण आसा‘राम’ यांनी मात्र कोणतीच मर्यादा पाळायची नाही असे ठरवले असावे. धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या मुंबईतील गिरगाव भागात राहणा-या एका सामान्य कारकुनाचे आत्मचरित्र पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु. ल. देशपांडे यांनी ‘असा मी असामी’ या पुस्तकात रेखाटले आहे.

आसारामबापूंचे सारे जीवनच असामान्य आहे. त्यामुळे आसाराम यांनी आपल्या पुरुषार्थी जीवनाचे चित्र रेखाटणारे आत्मचरित्र भविष्यात लिहिलेच तर त्याला ‘असा राम आसाराम’ असे नाव नक्कीच देता येईल! आम्हाला खात्री आहे की, आचार्य अत्रे यांनी लिहिलेले ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक आसाराम यांनी निश्चितच पाहिलेले नसणार...त्यांना या नाटकाची ऐकीव माहितीही नसणार...पण अंतर्ज्ञानी असलेल्या साधुसंतांचा जीवनप्रवास अशा ऐहिक अडथळ्यांनी कधीच थांबत नाही...नाटक न बघताही नाटक करता येणे याला मोठी सिद्धी प्राप्त असावी लागते. ती आजकालच्या बापू, बुवांकडे प्रचंड तपोबलामुळे आपोआप आलेली असते. पुराणातील वांगी पुराणातच ठेवली तर चांगले असते. तरीही आजकालची उदाहरणे बघता पुराणकथा याही सांगोवांगीच्या कथा म्हणून दुर्लक्षिता येत नाहीत. कारण त्यातून मानवी काम, क्रोध, लोभाचे सर्व अंगाने दर्शन घडत असते. गौतम ऋषींची पत्नी अहल्येची देवांचा राजा इंद्र याने गौतम ऋषींचे रूप धारण करून फसवणूक केली व आपली कामेच्छा पूर्ण केली.

इंद्राच्या तडाख्यातून विश्वामित्र ऋषीही सुटले नाहीत. विश्वामित्र ऋषींच्या उग्र तपश्चर्येने इंद्रासन डोलू लागले. या आसनाच्या प्राप्तीसाठीच विश्वामित्र तपश्चर्या करीत आहे, असा संशय इंद्राच्या मनात बळावला. इंद्राने सर्व अप्सरांमध्ये अत्याधिक सुंदर असलेल्या मेनकेला विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. मेनकेने आपली कामगिरी चोख बजावली.

थोडक्यात, पुराणकाळापासून जिथे भल्याभल्या तपस्वींची नीतिमत्ता ढळली, ती असांस्कृतिक परंपरा त्यांचे आजचे आध्यात्मिक वारसदार अशी सहजासहजी थोडीच विसरणार आहेत? आध्यात्मिक बुवा बनून जे कामेच्छा पूर्ण करण्याच्या ऐहिक मार्गावर चालतात, त्या बुवा-बापूंनी खरे तर इंद्र हेच आमचे कुलदैवत आहे, असे प्रवचनांत सांगायला हवे! पूर्वी केडगाव येथे नारायणबुवा यांनी आपल्या कृत्यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांचे पुरुषार्थी जीवन पाहून आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक लिहिले. हे नाटक इतके गाजले की त्यातील संवादाचा दाखला आजही बुवा, बापू, बाबा यांच्या रंगढंगाचा पर्दाफाश करण्यासाठी दिला जातो. आपले लिखाण इतके भविष्यवेधी निघेल, याचा दस्तुरखुद्द आचार्य अत्र्यांनाही अंदाज आला नसावा! ‘बुवा तेथे बाया’ नाटकामधील बुवा हा चावट व बाया या चहाटळ दाखवलेल्या आहेत. मात्र यापेक्षा आसारामबापू यांचे प्रकरण निश्चितच निराळे आहे. आसारामबापू हे बिलंदर व त्यांच्या महिला भक्त या भोळ्याभाबड्या आहेत.

बुवा, बापू अंधश्रद्धा वाढवणा-या गोष्टी सांगत राहतात व भोळे भक्त, महिलावर्ग हे त्यांच्या भजनी लागतात. त्यातूनच महिलावर्गाचे धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली शोषण बापू, बुवांकडून केले जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये तेथील धर्मगुरू व त्यांच्या शिष्यांबाबत तेथील लोकांत चघळले जाणारे किस्से, विनोद यांची संख्या अपरंपार आहे. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जरा जास्तच मुक्त संस्कृती असल्याने तेथील विनोदांचा दर्जाही अधिक मोकळा असतो. भाविक महिलांवर बलात्कार व लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित संत गुलझार अहमद भट याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी गेल्या 23 मे रोजी बडगाम जिल्ह्यातून अटक केली होती. चंद्रास्वामी हा तांत्रिक बाबा त्या मानाने ‘सभ्य’ होता, असे म्हणावे लागेल! कारण त्याच्यावर फक्त आर्थिक गैरप्रकार केल्याचाच आरोप होता. स्वामी अमृतचैतन्य या नावाचे कातडे पांघरणारा व मूळचा केरळचा रहिवासी असलेला संतोष महादेवन हादेखील इंद्राचा एक परमभक्त. या अमृतचैतन्यने अल्पवयीन मुलींबरोबर केलेल्या लैंगिक चाळ्यांचे दर्शन घडवणा-या व्हिडिओ क्लिपिंग्ज सा-या चॅनल्सनी झळकवल्या होत्या.

दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने या अमृतचैतन्यला 16 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा 20 मे 2009 रोजी सुनावण्यात आली. आता याच वाटेवर गेल्या शनिवारपासून अजून एक आध्यात्मिक पुरुष निघाले आहेत (अशी चर्चा आहे). अधर्म करणारे अनेक बापू, बुवा हे उपोषण करणा-यांच्या आंदोलनातही सामील होऊन शुचिर्भूत होतात. अण्णागिरी करणा-यांना या बापू, बुवांच्या अधर्मावर काहीही बोलावेसे वाटत नाही, हीदेखील एक प्रकारची धर्मभ्रष्टताच नाही का?