आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावरचे ‘वारकरी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे शेकडो तरुण वारीत चालत आहेत. या तरुणाईला वारी नेमके काय देते, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे वारी आपलं स्कॅनिंग करते, असे सांगण्यात आले.

शतकानुशतके आषाढी एकादशीला पंढरपूरला जमणारा लाखो वैष्णवांचा मेळा, हा जगभरातील अनेक अभ्यासक, जिज्ञासूंच्या कुतूहलाचा विषय ठरत आला आहे. तरीही वारीविषयीच प्रत्येक पिढीच्या प्रतिनिधींना इतकी उत्सुकता, कुतूहल का वाटते, हा प्रश्न अद्याप तरी समाधानकारक उत्तराच्या प्रतीक्षेतच आहे. युवा पिढीच्या उत्साहाने सळसळणार्‍या, उसळत्या रक्ताच्या तरुणाईलाही या वारीचे आकर्षण खेचून घेत आहे, याची साक्ष सोशल मीडियावरच्या लाखो पोस्ट्स व ब्लॉगवरचे लेखन देत आहे. गेल्या काही वर्षांपासून तर आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे शेकडो तरुण प्रत्यक्ष वारीत चालत आहेत. या तरुणाईला ही वारी मग नेमके काय देते, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे वारी आपलं स्कॅनिंग करते, असे सार्वत्रिक उत्तर मिळाले. आपण जसे आहोत (म्हणजे बाह्यात्कारी दिसतो ते नव्हे, तर आपले अंतरंग) तसे आपण वारीत आपल्याला भेटत जातो. आपल्यासमोर आपलीच आपल्याला अपरिचित पण वास्तव अशी प्रतिमा लख्खपणे दिसायला लागते, अशी प्रतिक्रिया आयटी दिंडीतल्या युवा प्रतिनिधींनी दिली. वारी सर्वसमावेशक आहे. तिथे सहभागी होणारा प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो सार्‍या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भाषिक भेदांच्या अतीत असतो. वर्षभराचे नियोजन करून सुटी अ‍ॅडजस्ट केलेली ही तरुणाई जेवढ्या सहजतेने वातानुकूलित कार्यालयातल्या एक्झिक्युटिव्ह चेअरवर बसते, तितक्याच सहजतेने ऊन-पावसाचा मारा झेलत मैलोन्मैल वारीत चालते, आसपास चालणार्‍या अडाणी, निरक्षर, नवसाक्षर, खेड्यापाड्यातल्या भाबड्या वारकर्‍यांशी मुक्त संवाद साधते. वारीतले नित्य पाठाचे अभंग, ओव्या आपल्यालाही म्हणता आल्या पाहिजेत, यासाठी दोन महिने आधीपासून आपल्या लॅपटॉप वा स्मार्टफोनवर ते डाऊनलोड करून, त्यांच्या चाली शिकून ते पाठ करते, हे दृश्य अनुभवण्यासारखे असते. सार्‍यांच्या मनात तेव्हा एकच भावना निखळपणे उरते - पायाखाली उलगडत जाणारी वारीची वाट प्रत्यक्ष जगण्यातही माणूसपणाच्या मार्गावर आपल्याला नकळत आणून सोडते.