आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेसचे फुसके बार, अरेरे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळीमेळी - अखेर कांगारूही पाटा खेळपट्ट्यांपुरते दादा!

विश्वचषकानंतर इंग्लंडला विंडीजमध्ये व त्यानंतर मायदेशी न्यूझीलंडसमोर १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते. अॅलिस्टर कुकचा तो संघ अॅशेस इतक्या सहजासहजी जिंकण्याचे स्वप्नही बघत नव्हता; पण त्याच्या हातून केवढी अभूतपूर्व कामगिरी होऊन गेलीय. कारण एवढे सदोष तंत्र होते कांगारू फलंदाजांचे!

कांगारू हरले - तेही चांगलेच झाले. कारण ते जरा माजलेच होते. इंग्लंड अॅशेस जिंकून गेले. अगदी आनंदी आनंदच! कारण पाचच महिन्यांपूर्वी विश्वचषकात त्यांची हालत केविलवाणी होती. अशा रीतीने आनंदीआनंद जिकडे-तिकडे चोहीकडे असेल तर प्रॉब्लेम काय आहे?
क्रिकेटच्या म्हणजे असली क्रिकेटच्या, म्हणजेच कसोटी क्रिकेटच्या शौकिनांपुढील प्रॉब्लेम, त्यांची व्यथा वेगळीच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये क्रिकेटचा अर्क आणि कसोटी क्रिकेटमध्ये, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ‘अॅशेस’ लढतींभोवती अखंड परंपरेचे वलय. कसोटी क्रिकेटचा कस व आगळेवेगळेपण आकर्षकपणे दुनियेसमोर सादर करण्याची ही संधी. प्रेक्षक व त्यातही महिला प्रेक्षक स्टेडियमकडे सलग पाच दिवस, सलग आठ-आठ तास खेचण्याची ही संधी. पण अरेरे, अॅशेसचे बार फुसकेच निघाले. चारही सामने झाले चुरसहीन व एकतर्फी. अलीकडच्या काळात बोथम व फ्लिंटॉफ, स्टीव्ह वॉ अन् पाँटिंग, मॅकग्रा व वॉर्न, त्याआधी बेनॉ व डेव्हिडसन, तसेच टायसन व स्टेथम यांनी गाजवलेल्या बहुसंख्य मालिकांच्या तुलनेत, यंदाचे अॅशेस क्रिकेट होते अळणी व मिळमिळीत.

ऑस्ट्रेलियाचा एकमेव विजय (अबब!) ४०५ धावांचा. इंग्लंडचा पहिला जय १६९ धावांचा. दुसरा आठ गडी राखून व तिसरा तर एक डाव व ७८ धावांचा. कसोटी सामना असतो एकंदरीत पाच दिवसांतील किमान साडेचारशे षटकांचा. पण पहिले दोन सामने सव्वातीनशे षटकांच्या खेळात आटपले गेले. म्हणजे चौथ्या दिवशी सुमारे चहापानापर्यंतच वेळ पुरेसा ठरला. तिसरी कसोटी झटपट १८३ षटकांत उरकली गेली, तर चौथ्या कसोटीत १७७ षटकांतच खेळ खल्लास! सामने निकाली होतात, ही बाब स्वागतार्ह; पण कसोटी क्रिकेट हे जणू दोन डावांच्या झटपट क्रिकेटचं रूप घ्यावं, ही बाब काळजीची. मोठी खेळी, मोठी भागी दुर्मिळ बनवणाऱ्या या गोंधळास अधिक जबाबदार आहेत ते कांगारूच. गल्लाभरू आयपीएलची बाधा त्यांना अधिक झालीय!
चेंडू स्विंग व सीम होण्यास अनुकूल असलेल्या वातावरणात, अपवाद होता लॉर्ड््सचा. तिथे चेंडू उसळतात. ईशांत शर्माने तिथंच, म्हणजे लॉर्ड््सला, धोनीच्या संघाला कुकच्या इंग्लंडविरुद्ध यशस्वी केलं होतं, ते आठवतं? या वेळी हेझलवूड व जॉनसन यांच्यासमोर इंग्लंड कोसळले तेही लॉर्ड््सवरच. स्विंग हे ज्याचे मुख्य अस्त्र तो जिमी अँडरसन वांझोटा ठरला, तोही लॉर्ड््सवरच. १९५६ मध्ये लेकर-लॉक यांच्या फिरकीला इतर चारही कसोटींत शरण जाणाऱ्या कांगारूंना, इंग्लंडला नामोहरम करणं जमलं होतं ते लॉर्ड््सवरच. पाठदुखीकडे दुर्लक्ष करून भेदक, उसळता मारा करणाऱ्या किथ मिलरची ती कमाल; पण लॉर्ड््सवरचे मिलर, मिच जॉनसन (व ईशांत शर्मा) यांचे ते विजय अपवादात्मकच ठरले. एजबॅस्टन (बर्मिंगहॅम) आणि ट्रेंट ब्रिज (नॉटिंगहॅम) येथे ऑस्ट्रेलियन संघ एकहाती कापून काढणारी, चार वेगवेगळ्या ब्रिटिश गोलंदाजांची कामगिरी तर बघा.
एजबॅस्टनला जेम्स अँडरसन १४.४-२-४७-६ अन् दुसऱ्या डावात स्टीव्हन फिन २१-३-७९-६. आणि ट्रेंट ब्रिजवर क्रिस ब्रॉड ९.३-५-१५-८ अन् दुसऱ्या डावात बेन स्टोक्स २१-८-३६-६. त्या ओघात अवघ्या १११ चेंडूंत सर्वबाद ६० अशी मानहानी!
अशा वातावरणात, जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथची या दोन खेळपट्ट्यांवरची तारांबळ बघा. ७ व ८,अन् ६ व ५. त्याच्या गौरवशाली कारकीर्दीतील हा लज्जास्पद नीचांक. अन् मायकेल क्लार्कची दुर्दशा बघा. १० व ३ अन् १० व १३.
एकेकाळी (व सचिन-द्रविडच्या निवृत्तीनंतर आजही) भारतात म्हटले जायचे व जातेय, फ्लॅट-ट्रॅक बुलीज. म्हणजेच पाटा खेळपट्ट्यांवरचे दादा. आता इंग्लंडमध्ये लागोपाठच्या दौऱ्यात ०-३ व १-३ आणि फिरकीला हात देणाऱ्या भारतीय खेळपट्ट्यांवर ०-४ व दुबईत पाकविरुद्ध ०-२ असे मोठमोठे मार खाणाऱ्या कांगारूंना काय म्हणावे? पाटा खेळपट्ट्यांपुरते दादा - दुसरे काय?आश्चर्य वाटते ऑस्ट्रेलियन मंडळाच्या धुरीणांच्या सुस्तीचे. इयान व ग्रेग चॅपल बंधूंचे, स्टीव्ह वॉ व अॅलन बॉर्डर व रिकी पाँटिंग यांचे इंग्लिश कौंटी स्पर्धांत प्रयत्नपूर्वक खेळाडू उतरवण्याचा प्रयत्न न करण्याचं तसेच ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी भरतखंडासारख्या ‘लो व स्लो’ खेळपट्ट्या मुद्दाम बनवण्याचे उपक्रम हाती न घेण्याचं.
विश्वचषकानंतर याच इंग्लंडला विंडीजमध्ये व त्यानंतर मायदेशी न्यूझीलंडसमोर १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले . अॅलिस्टर कुकचा तो संघ अॅशेस इतक्या सहजासहजी जिंकण्याचे स्वप्नही बघत नव्हता; पण त्याच्या हातून केवढी अभूतपूर्व कामगिरी होऊन गेलीय. कारण सदोष तंत्र होते कांगारू फलंदाजांचे! अशा घसरगुंडीतून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाला, त्यांच्या वैभवशाली इतिहासातील काही छोट्या-मोठ्या नायकांचा कित्ता गिरवावा लागेल. कसोटीत ६०० बळी घेणारा अन् इंग्लंडही गाजवणारा मॅकग्रा सांगतो. पूर्वतयारी मोलाची. सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी जिम (व्यायामशाळा) व नेट्स यात उतरणं अत्यावश्यक. तुमचा वेग ताशी ९०-१०० मैलांचा नसेना का, गुड लेंग्थ चेंडू ताशी १३०-१३५ वेगात उसळावा. अशा चेंडूंना सामोरं जाणं कठीण, असं सचिन व लारा सांगतात.
संघातील साऱ्या खेळाडूंत मिसळणे साऱ्याच संघनायकांच्या रक्तात कुठे असते? वाडेकर व मन्सूर अली पटौदी यांच्यात आढ्यता नव्हती. आता निवृत्त होत असलेल्या क्लार्कबाबत हा आक्षेप, तेव्हाचा कर्णधार रिकी पाँटिंगने उघड घेतला होता. आजही माजी कर्णधार अॅलन बॉर्डर तीच भाषा वापरत आहे. याबाबत सांगावासा वाटतो ग्रेग चॅपल-इयान चॅपलचा एक किस्सा. चहापानाला पाच मिनिटे बाकी असताना ग्रेग चॅपल बाद झाला; पण नव्याने येणाऱ्या डग वॉस्टर्सला त्याने काय सांगावे? शेवटच्या दोन तासांत शतक काढण्याची तडफ केवळ तुझ्यातच आहे, म्हणून मी बाद झालोय! या विश्वासाला पात्र ठरण्यास उत्सुक असलेल्या वॉल्टर्सने दिवसातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून शतक साजरे केले; पण पॅव्हेलियनमध्ये इयान चॅपलने त्याची फिरकी घेतली : शेवटच्या चेंडूवर, सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने तुझा झेल पकडला. किती बेजबाबदार खेळलास! वॉल्टर्सने काय उत्तर द्यावे? बिअरच्या बाटलीचे छोटे झाकण त्याने खोलले व म्हणाला, उशीर केलास तर रिकामी बाटली हाती धरावी लागेल!... असे खास ऑस्ट्रेलियन वातावरण व त्याला साजेसा खेळाचा डोलारा कांगारूंनी उभारला पाहिजे. कसोटी क्रिकेटला ताकद दिली पाहिजे!
वि. वि. करमरकर
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक