आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खमका संशोधक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही व्यवस्थेत गुणांची पाठराखण करताना दोषांकडे डोळेझाक होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी शासन-प्रशासनाला योग्य दिशादर्शन करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेले अभ्यासक-संशोधक प्रस्थापितांच्या दबावापुढे न झुकणारे, स्पष्टवक्ते आणि वृत्तीने खमके असतील, तरच प्रगतीच्या वाटा सहज खुल्या होत जातात. राज्यांच्या अधोगतीची दिशा स्पष्ट करणारी ‘बिमारू’ ही संज्ञा रुजवणारे आशिष बोस हे अशाच काही मोजक्या संशोधकांपैकी होते. सर्वेक्षणावर आधारलेली आकडेवारी-अहवालांना मानवी चेहरा देण्याचे श्रेय सर्वार्थाने बोस यांचेच होते. ‘डेमोग्राफर’ अर्थात लोकसंख्याशास्त्रतज्ज्ञ ही संज्ञा आपल्याकडे पुरेशी रुळलेली नव्हती तेव्हापासून, म्हणजेच 50च्या दशकाच्या मध्यापासून बोस यांनी एक संशोधक म्हणून आपला प्रभाव टाकण्यास प्रारंभ केला होता. तोवर शासनाची मदत घेऊन संशोधनात गुंतलेले अनेक जण ‘पोलिटिकली करेक्ट’ राहून आपल्यामुळे कुणी दुखावणार नाही याचीच प्राधान्याने काळजी वाहत होते.
परंतु बोस त्यालाही अपवाद होते.

80च्या दशकात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढ्यात शासन-प्रशासन व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करत बिहार-मध्य प्रदेश-राजस्थान-उत्तर प्रदेश ही चार राज्ये (कालांतराने यात ओडिशाचा समावेश करण्यात आला.) लोकसंख्येच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असल्याचे बेधडकपणे परंतु अभ्यासपूर्ण विधान केले होते. भारताला लोकसंख्या विस्फोट रोखायचा असेल तर देशाची 40 टक्के लोकसंख्या सामावलेल्या या राज्यांमध्ये त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी राजकीय नेत्यांची नाराजीही ओढवून घेतली होती. परंतु त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळेच पुढील काळात या चार राज्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे धोरण आखणे राज्यकर्त्यांना भाग पडले होते. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या गेलेल्या अन् महत्त्वाचे म्हणजे जन्माने कोल्हापूरशी नाते सांगणार्‍या आणि वयाच्या 83 व्या वर्षी निधन पावलेल्या बोस यांनी 25 ग्रंथांचे संपादन लेखन करून लोकसंख्याशास्त्रात स्वत:चा ठसा उमवटला होता.