आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अशोकपर्वा’चा पुनरोदय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला भरण्यास राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सीबीआयला परवानगी नाकारल्यापाठोपाठ राज्य मंत्रिमंडळाने न्या. जे. ए. पाटील समितीचा ‘आदर्श’ अहवालही फेटाळून लावल्यामुळे काँग्रेस आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी कशा पद्धतीने करू लागली आहे याचे स्पष्ट संकेत मिळतात. आदर्श प्रकरणात नाव येताच अशोकरावांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा विरोधकांना हे आपलेच यश असल्याचा फुकटचा अभिमान वाटला आणि त्याच अभिमानाने त्यांची छाती फुगून आली होती. त्याच वेळी आता अशोकरावांचे काँग्रेस आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणातील महत्त्व संपले, अशी चर्चाही काही जण करत होते. परंतु अशोकरावांनंतर राज्यातील एकाही ज्येष्ठ नेत्याला संधी न देता राष्ट्रीय राजकारणात रमलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना थेट दिल्लीहून राज्याच्या राजकारणात पाठवून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्याचे मुख्यमंत्रिपद अशोकरावांसाठीच राखून ठेवलेले असावे, अशी शंका तेव्हा कोणालाही आली नाही. तशी ती आताही येत नाही. पण आदर्श प्रकरणाच्या निमित्ताने या आठवडाभरात जो घटनाक्रम घडला आहे, तो पाहता अशी शंका घेण्यास बराच वाव आहे.
काँग्रेसकडे नेते नाहीत असे मुळीच नाही, पण ज्येष्ठ-श्रेष्ठ म्हणवले जाणारे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. मग ते पतंगराव कदम असो की नारायण राणे. या नेत्यांनी एका विशिष्ट परिघापलीकडे कधीच पाहिले नाही. आपला सुभा सांभाळून पक्ष आणि सरकारमधील आपली खुर्ची पक्की कशी राहील यातच त्यांचे नेतृत्व संकुचित झाले. परिणामी राज्यपातळीवर सर्वांची मोट बांधू शकेल आणि सर्वांना मान्य होऊ शकेल अशा नेत्यांची संख्या काँग्रेसमध्ये अगदीच नगण्यवर आली. त्या ‘नगण्य’मध्ये वरच्या क्रमांकावर नाव येते ते अशोक चव्हाणांचे. राजकारणातील ‘हेडमास्तर’ शंकरराव चव्हाणांच्या राजकीय वारशात वाढलेल्या अशोकरावांनी प्रारंभापासूनच राज्य हाच आपल्या राजकारणाचा परीघ ठेवला, मुख्यमंत्रिपदी आल्यावर त्यांनी कृतीतून त्याच परिघावर कामही करून दाखवले आहे. परिणामी ज्येष्ठ-श्रेष्ठतेचा वाद आणि नेत्यांच्या गटबाजीचे अमाप पीक फुललेल्या काँग्रेसच्या कोणत्याच गटाने वा ज्येष्ठाने अशोकरावांना कधी विरोध केला नाही. त्यामुळेच दिल्ली दरबारात ‘सर्वमान्य’ नेतृत्व अशी छाप उमटवण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले होते. त्याचमुळे त्यांच्या मागे लागलेले ‘आदर्श’चे किटाळ ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद्धतशीरपणे झटकून टाकण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात काँग्रेसला शिवसेना-भाजप या विरोधी पक्षापेक्षाही जास्त धोका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटू लागला आहे. सत्ताही उपभोगायची अन् सरकारलाच अडचणीत आणण्याची एकही संधी सोडायची नाही, असाच राष्ट्रवादी काँग्रेसचा पवित्रा राहिलेला आहे. त्यातच पवारांचे राजकारण हे कायमच बेभरवशाचे असते, हे आधीपासूनच काँग्रेसला चांगलेच माहीतही आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत सुंदोपसुंदी सुरू झालेली आहे. बाळासाहेबांसारखा करिष्मा दखवणारा दुसरा नेता त्या पक्षाकडे राहिलेला नाही आणि शिवसेनेचेच बोट धरून महाराष्ट्रात बाळसे धरलेल्या भाजपमध्येही गोपीनाथ मुंडे-नितीन गडकरी अशी दुफळी असल्यामुळे या परिस्थितीचा जास्तीत जास्त राजकीय लाभ उचलण्याचे पद्धतशीर नियोजन काँग्रेसकडून केले जात आहे. त्यामुळेच पक्ष आणि पक्षाच्या नेत्यामागे लागलेले एकेक किटाळ दूर झटकण्यात येत आहे. हे नियोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अशोक चव्हाणांसारखा दुसरा नेता सध्या तरी काँग्रेसकडे नाही.
पृथ्वीराज चव्हाण हे हायकमांडचे प्रतिनिधी असले तरी राज्यात त्यांना ‘मास बेस’नाही आणि केवळ हायकमांडचे आशीर्वाद असलेला नेता निवडणुका जिंकून देऊ शकत नाही, हे ओळखूनच अशोकरावांना तयार केले जात आहे. निवडणुकीच्या राजकारणात पडद्यावर जे काही घडते त्यापेक्षा कितीतरी जास्त उचापती पडद्याआड कराव्या लागतात. त्या करण्यासाठी राज्याच्या राजकारणाचे खडान्खडा ज्ञान आणि भानही असावे लागते. विलासराव देशमुखांनंतर असे भान असलेला एकमेव नेता म्हणून अशोकरावांकडे पाहिले जाते. म्हणूनच त्यांच्याच खांद्यावर धुरा सोपवून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा काँग्रेसचा मनोदय दिसतो आहे.
आदर्शप्रकरणी अशोकरावांविरुद्ध खटला भरण्याची परवानगी सरकारने नाकारली असती तर त्यांच्याच सरकारने त्यांच्याच नेत्याला सोडले, अशी हाकाटी पिटण्याची संधी विरोधकांना मिळाली असती. परंतु राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांनी दबावापोटी निर्णय घेतला, असा आरोप करण्याची सोय आता विरोधकांकडे उरलेली नाही. त्यामुळे आदर्श प्रकरण विरोधकांनी कितीही ताणण्याचा प्रयत्न केला तरी त्यात आता म्हणावा तसा दम उरणार नाही आणि ‘आदर्श’ प्रकरण सोडले तर चव्हाणांच्या ‘अशोकपर्वा’ला बदनामीचा दुसरा मोठा डागही नाही. हीच बाब लक्षात घेता ‘अशोकपर्वाचा’ पुनरोदय होऊ घातला आहे. अन्यथा इतक्या झटपट ‘आदर्श’चे किटाळ झटकण्याची अजिबात घाई केली गेली नसती, हेही तितकेच खरे!