Home | Editorial | Agralekh | attack on fourth pillar of democracy

चौथ्या स्तंभावर हल्ला!

divya marathi | Update - Jun 14, 2011, 12:54 AM IST

‘मिड डे’सारख्या एका मोठ्या दैनिकाच्या पत्रकाराची हत्या लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या भारतासाठी मात्र धक्कादायकच ठरते.

  • attack on fourth pillar of democracy

    ज्योतिर्मय डे यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीदेखील आपल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिल्याने आता राज्य पोलिसांवर या खुनाची उकल लवकरात लवकर करण्याचे दडपण आहे. अशा प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले आणि पत्रकारांच्या निर्घृण हत्या लोकशाहीची बीजे न रुजलेल्या पाकिस्तानात वरचेवर होत असतात. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार डॅनियल पर्ल यांची गळा चिरून झालेली हत्या असो वा सलीम शहजाद यांची शारीरिक यातना देऊन झालेली हत्या असो. पाकिस्तानात घडलेल्या अशा घटनांमुळे चीड आली तरी धक्का बसत नाही. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी म्हणविणा-या आणि २४ तास जागे असणा-या शहरात ‘मिड डे’सारख्या एका मोठ्या दैनिकाच्या पत्रकाराची हत्या लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या भारतासाठी मात्र धक्कादायकच ठरते. भारतात अनेक जातीय दंगे, बाबरी मशिदीचा विध्वंस, गुजरातमधील कत्तली, अशा हिंस्र गोष्टी घडलेल्या असल्या तरी स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या देशात संसदीय लोकशाहीची बीजे खूपच चांगल्या पद्धतीने रुजली आहेत. संसदीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविणाºया पत्रकारितेबाबत या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे. किंबहुना लोकशाहीच्या सर्वच स्तंभांना कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराची कीड लागलेली असताना सामान्य जनतेच्या या चौथ्या स्तंभाकडूनच प्रचंड अपेक्षा आहेत. दृक्श्राव्य माध्यमांच्या वा वर्तमानपत्रांच्या पत्रकारांना भारतीय समाजात मिळणाºया सन्मानामागील हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळेच जे. डे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराची दिवसाढवळ्या इतक्या निर्घृण पद्धतीने हत्या होणे हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
    पाकिस्तानात झालेल्या डॅनियल पर्ल किंवा सलीम शहजाद यांच्या हत्यांमागील कारणाचा तर्क तत्काळ बांधणे सोपे होते. आयएसआय आणि अल कायदा किंवा तत्सम संघटना यांच्या हितसंबंधांचे पुरावेच या दोघांच्याही हाती असल्यामुळे आणि त्यांनी ते जगासमोर आणण्याचा धाडसी प्रयत्न न सोडल्यामुळेच या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला होता. भारतीय भूमीत घडविल्या जाणाºया दहशतवादाला पाकिस्तानी लष्कराकडून कशी मदत मिळते याची माहिती मिळालेल्या डॅनियल पर्ल यांच्या हत्येनंतर तर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी एका मुलाखतीत शहाजोगपणे म्हटले होते की, अनावश्यक गोष्टींमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम हे असेच होतात. सय्यद सलीम शहजाद या पत्रकाराने कराचीमधील नेव्हल एअर बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नौदलामध्येच अल कायदाने आपली माणसे कशी घुसवली आहेत, हे जगासमोर आणले होते. त्यानंतर त्याला आयएसआयच्या अधिकाºयांनी धमकावलेदेखील होते. अखेर त्याचा खून करण्यात आला. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये खरे तर हा मूलभूत फरक होता की, पाकिस्तानात रुजू न शकणारी लोकशाही मूल्ये या देशात व्यवस्थित रुजली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो त्यांच्या मित्रमंडळींमध्ये म्हणत असत की, लोकशाही ही संकल्पनाच मुळात थंड प्रदेशातली आहे. उष्ण कटिबंधात ती रुजू शकत नाही. मात्र, भारतातल्या अगदी राजस्थानच्या वाळवंटापासून ते धो धो पावसाच्या आसामपर्यंत आणि बर्फाच्छादित काश्मीरपासून ते दमट हवामानाच्या तामिळनाडूपर्यंत या देशात लोकशाही रुजली. त्याचे श्रेय या देशातील गांधी-नेहरूंच्या परंपरांना आणि विविध लोकशाही संघटनांना द्यायला हवे.
    लोकशाही मूल्यांवरील जनतेचा विश्वास ढासळायला लागला की, त्याचे परिणाम लोकशाहीच्या चारही स्तंभांवर दिसू लागतात. सध्या संसदेपेक्षाही अधिक शक्तिशाली होऊ पाहणारे स्वयंसेवी संघटनांचे अण्णा-बाबा किंवा तत्सम पुढारी आणि पत्रकारांवरील हल्ले, त्यांच्या दिवसाढवळ्या होणाºया हत्या हे सर्व लोकशाही मूल्ये खिळखिळी होत असल्याचेच लक्षण आहे. जे. डे यांच्यावरील हल्ल्याकडे नेमक्या याच दृष्टिकोनातून पाहावे लागेल. जे. डे ज्या ‘मिड डे’ या वर्तमानपत्रात काम करीत होते, त्यांच्या संपादकांनीदेखील पत्रकारांच्या बैठकीत हेच सांगितले की, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून डे यांनी गुन्हेगारी विश्वाशी संबंधित दैनंदिन बातम्यांपलीकडे जाऊन कोणताही मोठा गौप्यस्फोट केला नव्हता. आॅईल माफियावर त्यांनी एक मालिका जरूर चालविली होती. मात्र, अनेक वर्तमानपत्रांमधून अनेक वार्ताहरांनी मुंबई आणि शेजारील छोट्या शहरांमधून चालणाºया आॅईल माफियांचा गैरव्यवहार व त्याला मिळणारे सरकारी संरक्षण यांच्यावर आजवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे जे. डे यांनी चालविलेल्या आॅईल माफियांवरील मालिकेमुळे त्यांचा इतक्या निर्घृण पद्धतीने खून झाला असावा का, या प्रश्नाबाबत पत्रकारितेच्या जगतातील ज्येष्ठ मंडळी तसेच पोलिस अधिकारीही संभ्रमात आहेत.
    सध्याच्या काळात देशातील शहरी व निमशहरी भागांवर प्रसारमाध्यमे आणि पैसा यांचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. ‘बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज ए क्राईम’ असे म्हणतात ते खरेच आहे. मुंबईसारख्या शहरात तर अशा लाखो सक्सेस स्टोरीज आहेत. त्यांच्या यशामागील गुन्हेगारी जगताबाबतचे एखादे गुपित डे यांना सापडले होते का, त्याची वाच्यता त्यांनी कुणाकडे केल्यानेच त्याचा वचपा काढला गेला आहे का, की डे यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटनेचा या हत्येशी काही संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उकल जर यातील खरे गुन्हेगार पकडले गेले तरच होऊ शकेल. त्यामुळे पोलिसांवर खरे गुन्हेगार पकडण्यासाठी नैतिक दबाव ठेवणे हे पत्रकार जगताचे काम आहे.

Trending