आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहाणी बहिष्काराची...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकी इये।
दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।।
असे साक्षात ज्ञानेश्वरांनी सांगितले असले तरीही मराठी ग्रंथ प्रकाशकांना मात्र तसे काही वाटत नाही. वाटले असते तर त्यांनी घुमानला ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला नसता.

घुमानचे साहित्य संमेलन आता प्रमुख प्रकाशकांविनाच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. घुमानला साहित्य संमेलन घेणार म्हणून प्रकाशक तसेही घुश्शातच होते. शेवटी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने काही मागण्या मान्य केल्या. यासंदर्भात प्रकाशक आणि महामंडळ पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार होती, तीही झाली नाही आणि कार्यवाहीपूर्वीच महामंडळाचे पदाधिकारी घुमानला रवाना झाले. त्यामुळे प्रमुख प्रकाशक दुखावले, असा हा सगळा दृश्यपट आहे. प्रकाशक आणि महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बेबनावामुळे मायमराठीची गळचेपी होत आहे, त्याचे सोयरसुतक कोणालाच नाही.

प्रकाशक आणि आयोजकांमध्ये अधूनमधून वाद होतच राहतात. बहुतांश वेळा ते साहित्य संमेलनस्थळी स्टॉलला मनासारखी जागा न मिळाल्यामुळे होतात. नागपूर येथील ८० व्या साहित्य संमेलनात याच कारणावरून आयोजक आणि प्रकाशकांची जुंपली होती. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक मातब्बर प्रकाशकच उभे होते. त्या वेळी आयोजकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाल्याच्या खमंग चर्चा आजही होतात. अर्थात विक्री व खपावरून आयोजक आणि प्रकाशकांमध्ये फारसे वाद झाल्याचे ऐकिवात नाही. कारण सर्वच संमेलनांत मराठी पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते; पण घुमानच्या साहित्य संमेलनाच्या बाबतीत नेमका याच विषयावरून विरोध झाला. त्यामुळे साहित्यिकांची मांदियाळी असणाऱ्या संमेलनात नेमके प्रमुख प्रकाशकच आता नसणार आहेत.
सुरुवातीला घुमानमध्ये मराठी भाषक नसल्याने विक्री होणार नाही, अशी भूमिका घेत प्रकाशकांनी बहिष्कार घातला. नंतर महामंडळाचे पदाधिकारी व प्रकाशक यांच्यात बैठक होऊन काही अटी मान्य करण्यात आल्या. त्यामुळे प्रकाशकांनी बहिष्कार मागे घेतला; पण आता प्रमुख प्रकाशकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुळात संमेलनावर बहिष्कार टाकणे हा मार्ग नाही. दर संमेलनात पुस्तकविक्रीचा उत्तम व्यवसाय होतो. अशा वेळी खप आणि विक्रीला एखादे संमेलन अपवाद असायला काहीच हरकत नव्हती. महाराष्ट्राबाहेरील अमराठी बांधवांना मराठी प्रकाशन व्यवहाराची ओळख करून देण्याची ही नामी संधी प्रकाशकांनी गमावली. राजहंस प्रकाशनचे प्रतिनिधी नरेश सब्जीवाले यांनी अशाच भावना व्यक्त केल्या तर ते एकटे पडले. साहित्यिक, लेखक आणि प्रकाशक हे एकमेकांना पूरक असायला हवे. प्रकाशन व्यवसायात अलीकडे मंदी आल्याची ओरड होते आहे.

प्रत्यक्षात सत्य काय आहे हे प्रकाशकही उघड करीत नाहीत. एकीकड विशिष्ट सीझनमध्येच पुस्तके खपतात, असे प्रकाशक सांगत असतात. अशा वेळी घुमानच्या संमेलनातही प्रकाशकांनी सहभाग घेऊन एक प्रयोग करायला काय हरकत आहे? साहित्य महामंडळानेही याबाबत सहकार्य ठोसपणे करायला हवे होते. खरे तर प्रकाशकांचेही एक वेगळे साहित्य संमेलन होतेच. एरवी साहित्य संमेलनात किमान दीडशे ते दोनशे स्टॉल्स असतात; पण घुमानच्या संमेलनात केवळ ३० स्टॉल्स राहणार आहेत. त्यातही चार महामंडळाचे, चार सरकारचे आहेत असे म्हणतात. म्हणजे उणेपुरे २२ स्टॉल्स काही प्रकाशकांचे. संमेलनात व्यवहार हा पाहिलाच पाहिजे, या प्रकाशकांच्या भूमिकेमुळे हे चित्र यंदा दिसते आहे.

मराठी माणूस, मराठी नाटक, मराठी चित्रपट आणि विशेषत: मराठी भाषा हे कायम वादाचे विषय झालेले आहेत. मराठी भाषेचे भवितव्य आणि तिच्या अस्तित्वाविषयी अधूनमधून काळजीयुक्त चर्चा होते. मराठी अस्मिता आणि आणि मराठी भाषा या कायम धोक्यात येणाऱ्या गोष्टी आहे, असे भासवले जाते. झपाट्याने नामशेष होणाऱ्या वस्तूंच्या यादीत मराठीचा समावेश करावा, असे वातावरण रंगवण्यात येते. विशेषत: जागतिक मराठी भाषादिनी आणि त्या आसपास मराठीचे अस्तित्व आणि भवितव्याविषयी खूपच चिंता व्यक्त करण्यात येते.
इतिहासकार राजवाडे यांनी १९२६ मध्ये पुण्याच्या शारदाेपासक संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून ‘मराठी भाषा मुमुर्षु आहे काय?’, असा प्रश्न विचारला होता आणि त्याचे उत्तरही त्यांनी स्वत:च दिले होते. ‘‘काही थोडी सबल, दुर्बल वर्तमानपत्रे, लेंचीपेंची गद्यपद्य पुस्तके, गृह्य व ग्राम्य व्यवहार ह्यांच्यांत मराठी भाषेचा उपयोग आपण अद्याप करीत आहोत, त्यावरून दिसतें की मराठी भाषा अद्याप मेली नसून तिच्यांत कांही धुगधुगी उरली आहे. परंतु गृह, ग्राम, दुर्बल वर्तमानपत्रे व दुर्बलस्तर पुस्तके सोडली म्हणजे समाजाच्या व्यवहाराचे जे बाकीचे प्रांत, त्यांत मराठी भाषेची झाडून सारी अंगें थंडगार पडून गेलेली आहेत,’’ असे ते म्हणाले होते. राजवाड्यांनी १९२६ मध्ये केलेल्या भाषणात मराठीविषयी चिंता व्यक्त केली, त्याला आता ८८ वर्षे होतात. पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

हजारो किलोमीटरवरचे घुमान तिकडे मराठीमय होऊन गेले आहे. पंजाब सरकारही मराठी साहित्यप्रेमींच्या तयारीसाठी जय्यत तयारीला लागले आहे. मराठी साहित्य संमेलन कशाशी खातात हेही घुमानकरांना माहीत नाही. तरीही ते मराठीच्या रंगात रंगलेले आहे. बरं, या संमेलनाचा त्यांना काही राजकीय फायदा म्हणावा तर तोही नाही. पंजाब सरकारने संमेलन शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर केलाय. सुमारे दीड कोटी यावर खर्च होताहेत. घुमान मराठी सारस्वतांसाठी स्वागताच्या पायघड्या घालीत असताना प्रमुख प्रकाशकांनी संमेलनाला न जाण्याचा आडमुठेपणा केला आहे.

संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी मायमराठीला पंजाबात नेले. आज प्रवासाची सर्व साधने असतानाही थकायला होते. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी प्रवास कसा केला असेल, याच्या नुसत्या विचारानेही अंगावर काटा येतो. एखाद्या संमेलनानिमित्ताने थोडी तोशीस सोसून मराठी प्रकाशकांनी घुमानला जाऊन मायमराठीची पताका फडकवायला काही हरकत नव्हती. ते त्यांनी केले नसल्याने प्रकाशकांनी यापुढे अटकेपार झेंडे फडकवायच्या बाता करू नये!