आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त ‘खल’नायक(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्याचरण शुक्ल हे गेल्या सहा-सात दशकांमधील देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. माओवाद्यांनी 25 मे 2013 रोजी बस्तर या छत्तीसगडमधील काँग्रेसच्या ‘परिवर्तन यात्रे’वर केलेल्या निर्घृण हल्ल्यात इतके गंभीर जखमी झाले होते की ते वाचण्याची शक्यता कमीच होती. मंगळवारी दिल्लीजवळील गुरगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झालेला हा काँग्रेसी नेता मध्य प्रदेश व नंतर छत्तीसगडशिवाय दिल्लीमध्ये अनेक वर्षे वेगवेगळ्या राजकीय पक्षांत राहून एक विशिष्ट उंची गाठलेला नेता म्हणून आठवणीत राहील. विद्याचरण व त्यांचे मोठे बंधू श्यामाचरण शुक्ल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविशंकर शुक्ल यांचे पुत्र होत. विद्याचरण यांनी दिल्लीत राजकारण केले तर श्यामाचरण, ज्यांचे निधन काही वर्षांपूर्वीच झाले, ते मध्य प्रदेशातच रमले होते.

श्यामाचरण मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले होते आणि अखंड मध्य प्रदेशच्या छत्तीसगड या भागात त्यांनी सिंचनासाठी मोठे काम केले. शुक्ल कुटुंब मध्य प्रदेशात, जेथे जातीयवाद अन्य राज्यांच्या तुलनेत बराच कमी प्रमाणात आढळतो, तेथील राजकारणात ब्राह्मणांचे कैवारी म्हणून ओळखले जायचे. विद्याचरण काँग्रेसच्या तिकिटावरून 1957 मध्ये पहिल्यांदा महासमुंद या भागातून लोकसभेवर निवडून गेले व त्यानंतर विक्रमी नऊ निवडणुका जिंकून ते सतत थेट सत्तेत किंवा सत्तेच्या वलयात राहिले. मध्य प्रदेश 1956 मध्ये अस्तित्वात येण्यापूर्वीच्या सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार या भागात शुक्ल बंधू व वडील यांचा मोठा दबदबा होता. स्वत: विद्याचरण शुक्ल नागपूरच्या मॉरिस कॉलेज येथून बी.ए. डिग्री घेऊन नंतर राजकारणात आले. इंदिरा गांधी व पुढे संजय गांधी यांच्या ते खूप जवळचे नेते होते. आणीबाणीत त्यांच्याकडे नभोवाणी खाते होते. इंदिरा व संजय यांना खुश ठेवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात असे. स्वतंत्र भारतातील वृत्तपत्रांवरची पहिली (किंवा शेवटची?) सेन्सॉरशिप ही विद्याचरण यांचीच कल्पना. ते, इंदिरा गांधींचे स्वीय सचिव आर. के. धवन तसेच बन्सीलाल व संजय गांधी यांनी जे जे अत्याचार आणीबाणीच्या नावाखाली 1975 ते 1977 या दोन वर्षांत केले, ते आठवले तर आजही अंगावर शहारे येतात.

काँग्रेसचा तो ‘कॉकस’ म्हणून ओळखला जात असे. प्रख्यात पत्रकार कुलदीप नायर यांच्या ‘द जजमेंट’ या गाजलेल्या पुस्तकात व (स्व.) जनार्दन ठाकूर यांच्या ‘द प्राइम मिनिस्टर्स मेन’ या दुसºया गाजलेल्या पुस्तकात व्ही. सी. शुक्ल यांच्याबद्दल अनेक सुरस कहाण्या त्या काळात छापून आल्या होत्या. विद्याचरण यांनी 1966 मध्ये मंत्रिपद पहिल्यांदा मिळवले तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर त्यांनी अनेक खाती सांभाळली. ते पक्ष बदलण्यातही तरबेज होते. परंतु मूळ पिंड काँग्रेसचाच राहिला. राजीव गांधींशी व कालांतराने सोनियांशी त्यांचे सूत कधी जमले नाही. म्हणूनच ते कधी चंद्रशेखर मंत्रिमंडळात गेले तर कधी व्ही. पी. सिंग यांच्या जनता दलात सामील झाले व मंत्रिपद कायम ठेवले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर व्ही. सी. शुक्लांनी त्यांना मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मदतीचा हात पुढे केला होता.

आणीबाणीच्या काळात तर ते वादग्रस्त होतेच, पण त्या पुढे पी. व्ही. नरसिंहराव हे राजीव गांधींच्या हत्येनंतर जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा विद्याचरण यांच्याकडे त्यांची विविध पक्षांमधील मैत्री लक्षात घेता संसदीय कार्यमंत्री ही जबाबदारी देण्यात आली आणि तेव्हाच शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने साथ सोडल्यावरही सरकार वाचवण्याची ‘जादू’ शुक्ल यांनी दाखवली होती. 1993 मध्ये विद्याचरण यांनी नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल व कॅप्टन सतीश शर्मा यांना हाताशी घेऊन जनता दलाचे (अजितसिंह) सात खासदार बरेच पैसे देऊन फोडले होते. रामलखनसिंह यांच्या नेतृत्वाखाली या खासदारांनी विद्याचरण यांनी आखलेल्या योजनेप्रमाणे नरसिंहराव सरकारच्या बाजूने म्हणजे विरोधी पक्षांच्या विरुद्ध जाऊन मतदान केले व सरकार वाचवले. यात चार कोटी रुपयांची लाच खासदारांना विद्याचरण यांच्यातर्फे भजनलाल यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु शुक्ल यांचा ‘क्लास’ निश्चितच वेगळा होता. ते स्वत: स्पष्ट व सुंदर इंग्रजी बोलायचे आणि लिहायचे. त्यांनी जगभर भ्रमंती केली.वन्यप्राण्यांच्या शिकारीपासून खेळापर्यंत, पेंटिंग्ज, खवय्येगिरीपासून उंची कपडे वापरण्यापर्यंत ते नेहमी एखाद्या राजासारखेच वावरले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर सुरेश कलमाडी अध्यक्ष झाले. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ स्पोर्ट्स व त्याआधी ‘स्नाइप्स’चेही प्रमुख होते. मध्य प्रदेशमध्ये शुक्ल बंधू व ठाकूर नेते अर्जुनसिंह आणि त्यांचे एकेकाळचे चेले दिग्विजयसिंह यांचे कधीच पटले नाही. 1 नोव्हेंबर 2000 रोजी जेव्हा मध्य प्रदेशचे विभाजन होऊन छत्तीसगडचा जन्म झाला, तेव्हा
विद्याचरण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती आणि त्यांची तशी तीव्र इच्छाही होती. परंतु सोनिया गांधी यांनी दिग्विजयसिंह यांच्याकडे (ते मुख्यमंत्री होते) अजित जोगींना नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनवण्याची जबाबदारी दिली होती. स्वत: दिग्विजय व जोगी यांचा छत्तीसचा आकडा असूनही त्यांना पक्षश्रेष्ठींची इच्छा पूर्ण करावी लागली होती. त्यामुळे विद्याचरण व त्यांचा काँग्रेसचा कंपू प्रचंड नाराज झाला होता. नवे राज्य स्थापन (ज्यासाठी स्वत: शुक्ल यांनी प्रयत्न केले होते) करताना व मुख्यमंत्री निवडणुकीसाठी जे पर्यवेक्षक रायपूरमध्ये दाखल झाले होते, त्यात प्रभा राव व गुलाम नबी आझाद प्रमुख होते.

1 नोव्हेंबरच्या दुपारी या दोघा नेत्यांबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंह विद्याचरण यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यास गेले तेव्हा ‘जोगी का दलाल दिग्विजय’ अशा घोषणा देत शुक्लांचे समर्थक दिग्विजयसिंहांवर अक्षरश: तुटून पडले होते, इतका विरोध शुक्ल व सिंह यांच्यामध्ये होता. ते मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित भारतीय राजकारणात असे पहिलेच कुटुंब ठरले असते, जेथे वडील व दोन मुले मुख्यमंत्री बनली. असो. विद्याचरण यांच्या निधनामुळे एक वादळी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, इतिहासजमा झाले आहे. नक्षलवाद्यांकडून त्यांची हत्या होणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. कारण वेगळे व लहान राज्य निर्माण व्हावे ही त्यांचीच इच्छा होती!