आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोमेजलेला वसंत! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लोकशाही लोकांनी मनापासून स्वीकारली, तिला आपल्या हृदयात स्थान दिले, तरच ही राज्यपद्धती यशस्वी होऊ शकते. हुकूमशाही प्रवृत्तींच्या रेट्याने बळजबरी अस्तित्वात आलेली लोकशाही कोणत्याही देशात यशस्वी होऊ शकत नाही.’ हे प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डने काढलेले उद्गार इजिप्तमधील सध्याच्या धगधगत्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी समर्पक आहेत. इजिप्तमधील पदच्युत अध्यक्ष मोहंमद मुर्सी यांचे म्हणजेच पर्यायाने मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेचे समर्थक व सुरक्षा दलांमध्ये गेल्या तीन दिवसांत उडालेल्या चकमकींमध्ये अनेकांचा बळी गेला आहे.

इजिप्तमध्ये 2011मध्ये जानेवारी महिन्यात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्याविरोधात त्या देशातील जनतेने मोठा उठाव केला होता. कैरोच्या प्रसिद्ध तहरीर चौकात हजारो नागरिक जमा झाले. त्यांनी इजिप्तमध्ये लोकशाही सरकार प्रस्थापित करण्यासाठी नारेबाजी सुरू केली. या विलक्षण जनक्षोभामुळे मुबारक यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आले व लोकशाही राजवटीसाठी वाट मोकळी करण्यात आली. हा सर्व बदल घडवून आणण्यात इजिप्तच्या लष्कराने पुढाकार घेतला होता, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर इजिप्तमध्ये झालेल्या निवडणुकांत मोहंमद मुर्सी हे अध्यक्षपदी निवडून आले.

सेक्युलर विचारसरणी हेच आपल्या राज्यकारभाराचे प्रमुख सूत्र राहील, अशी दवंडी पिटलेल्या मुर्सी यांचे ‘खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे’ हे काही काळातच दिसून आले. मुर्सी यांनी ज्यांच्या जिवावर उड्या मारल्या होत्या, ती मुस्लिम ब्रदरहूड संघटना ही सर्वधर्मसमभावी वृत्तीचा मुखवटा घालून असली तरी तिची प्रवृत्ती मात्र जात्यंध स्वरूपाचीच आहे. इजिप्तमध्ये इस्लामीकरण करण्याच्या वेडाने मुर्सी यांना पछाडले होते. तशी पावले मुर्सी यांनी उचलली नसती तर मुस्लिम ब्रदरहूडने त्यांचा मुलाहिजा ठेवला नसता. इजिप्तमधील नागरिकांना आर्थिक सुरक्षा, रोजगाराच्या उत्तम संधी, देशाचा विकास, तसेच नागरी हक्कांची जपणूक होणे हे लोकशाही राजवटीकडून अपेक्षित होते; परंतु इजिप्तमधील जनतेला सर्व गोलमाल लक्षात आल्याने त्यांनी मुर्सी यांच्याविरोधात तहरीर चौकात उग्र निदर्शने करून अवघा देश डोक्यावर घेतला.

इजिप्तच्या लष्कराने हस्तक्षेप करीत मुर्सी यांना पदावरून दूर हटवले. या घटनेपासून भारतातील राजकारणी व जनतेनेही काही धडे घेण्यासारखे आहेत. 2011मध्ये जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये मुबारकविरोधात निदर्शने करण्यासाठी जो प्रचंड जमाव गोळा झाला होता, तो फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जागृतीमुळेच, असा डंका पिटला गेला होता. मुबारकविरोधात झालेल्या या उठावाला ‘अरब स्प्रिंग’ असे म्हटले गेले. या परिवर्तनाच्या बहाद्दरीचे प्रमाणपत्र सोशल मीडियाला देण्यात अमेरिकेतील वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सर्वाधिक पुढाकार होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून इजिप्तमधील लोकांनी लोकशाही राजवटीसाठी मोठे आंदोलन उभारले असल्याचा प्रचार त्या वेळी अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला होता. तो फुगा मुर्सी यांच्या जात्यंध राजवटीमुळे आता फुटला आहे. मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेने सोशल मीडियाचा आपल्याला हवा तसा वापर करून घेतला होता. मुबारक यांच्या जुलमी राजवटीविरोधात हवा तापवून त्यांना हटवले व मुर्सी या आपल्या हस्तकाच्या माध्यमातून जातीयवादी राजवट लादण्याचा अजेंडाही या संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आकाराला आणण्याचा प्रयत्न केला होता.

‘अरब स्प्रिंग’चे हे काळे रूप ज्यांनी ओळखले, त्या इजिप्तमधील लोकशाहीवाद्यांना दडपण्याचे सत्र मुर्सी यांनी पद्धतशीरपणे सुरू केले होते. सोशल मीडियाचे व त्यावरील प्रचाराला भुलून स्वत:हूनच बळी जाणा-यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे इजिप्तमधील घडामोडी होत. केवळ इजिप्तच नव्हे, भारतातही त्याच सुमारास परिवर्तनाची आस ठेवून मध्यमवर्ग सोशल मीडियाच्या नादी लागला. भारतीय लोकशाही व्यवस्थेत असलेल्या कथित उणिवा दाखवून आता क्रांतीशिवाय तरणोपाय नाही, अशी भाषा करीत ‘समाजसेवक’ अण्णा हजारे हे रस्त्यावर उतरले होते. अण्णा हजारे हे करीत असलेली उपोषणे व भ्रष्टाचार निर्मूलनाच्या त्यांच्या घोषणेला भुलून भारतातील मध्यमवर्गही सोशल मीडियावर एकदम सक्रिय झाला होता. ‘देश की व्यवस्था बदलो’ असे नारे त्या वेळी दिले जात होते; पण अण्णा हजारे यांच्याकडे व्यवस्था परिवर्तनाचा कोणताही ठोस कार्यक्रम नव्हता, ते सुचवत असलेले उपाय हे पुन्हा दुसरी चाकोरीबद्ध व्यवस्थाच निर्माण करणार होते.

मात्र, अण्णांच्या विचारांमधील फोलपणा तेव्हा सोशल मीडियाची धुंदी चढलेल्या मध्यमवर्गाला दिसला नाही. इजिप्तप्रमाणे भारतातही परिवर्तनाचा वसंत फुलेल, अशी आस सोशल मीडियाच्या नादी लागलेल्यांना आहे. अण्णा हजारेंचे आंदोलन सपशेल फसल्यामुळे आता तरी हा मध्यमवर्ग शहाणा होईल असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही. आता 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतात पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाची भाषा जोरात केली जात आहे. त्यासाठी हिंदू जातीयवादी प्रवृत्तीचा मेरुमणी असलेल्या नेत्याला ‘आदर्श’ म्हणून उभे केले जात आहे. इजिप्तमध्ये ‘मुस्लिम ब्रदरहूड’ संघटनेने जसा कावेबाज वापर केला, तसाच सोशल मीडियाचा वापर भारतातील ‘हिंदू ब्रदरहूड’कडून होत आहे. सोशल मीडियावरून होणा-या जातीयवादी प्रचाराला व त्याद्वारे सत्ता हस्तगत करण्याच्या षड्यंत्राला भारतातील वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमेही जोरदार विरोध करताना दिसत नाहीत. इजिप्तमध्ये कथित फुललेला वसंत आता कोमेजलेला आहे. भारतामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत इजिप्तप्रमाणे परिवर्तनाचा वसंत फुलेल, अशी भोंगळ आशा मनी बाळगणा-यांनी सोशल मीडियाच्या फार नादी लागू नये व जातीयवादी प्रवृत्तींनी लावलेल्या सापळ्यात स्वत:हून अलगद अडकू नये. एवढा जरी धडा आपण घेतला तर ‘हिंदू ब्रदरहूड’चे कारस्थान नक्कीच हाणून पाडता येईल!