आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avinash Dharmadhikari Special Artical On Republic Day

सामूहिक शक्तीतील बलस्थाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या एका विश्वविख्यात आणि कविमनाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेली ही गोष्ट आहे. भर गर्दीच्या वेळी ते घराच्या बाल्कनीत उभे होते. रस्त्यावरून वाहतूक ओसंडून वाहत होती. चौकात एक पोलिस उभा होता. तो काही काही वाहनांना अडवत होता. वाहनांची काच खाली जाऊन त्यातून एक हात बाहेर येत होता, तो हात पोलिसाच्या हातावर टेकवत होता. मग पोलिसाचा हात वर्दीच्या वरच्या बटणाकडे जात होता. असे यथास्थित चालू होते. इलेक्ट्रॉनिक्समधल्या या शास्त्रज्ञाने घरात जाऊन व्हिडिओ कॅमेरा आणला आणि घडत असलेल्या प्रसंगाचे ‘शूटिंग’ केले. मध्येच कॅमेरा ‘झूम’ केला. पोलिसाचा हात वर्दीच्या आत जाऊन बाहेर येताना तर ‘क्लोज-अप’मध्ये दिसले, ते वर्दीच्या शर्टचे उघडे बटण आणि त्या बटणावरची सुस्पष्ट अक्षरे ‘सत्यमेव जयते'.
चौकाचौकांत, पावलापावलांवर, घराघरांत आणि क्षणाक्षणाला ‘सत्यमेव जयते’ची अशी धूळधाण उडत असताना कोणातरी एकट्या नागरिकाने उठावे आणि बंड पुकारावे, ही अपेक्षा करणे बरे नाही. बंड तर सोडाच, एकट्या-दुकट्याने समाजातल्या गैर गोष्टी, अन्याय यांबाबत आवाज उठवावा, चौकीवर जावे, न्यायालयात जावे, साक्षी-पुराव्यांसाठी आपणहून पुढे यावे, पुढाकार घेऊन विधायक-विकासाचे उपक्रम हाती घ्यावेत...वगैरे...वगैरे अपेक्षा करणे आता स्वप्नवतच वाटते.
तुमच्यासमोर प्लॅटफॉर्मवर काही माणसे दुस-या एका माणसाला गोळ्या घालत आहेत किंवा भोसकत आहेत, त्या वेळी तुम्ही मध्ये पडाल? चार गुंड महिलेच्या अंगचटी जातायत, त्यांना ‘का रे’ म्हणाल? मला एक पत्रकार मित्र एकदा म्हणाला की, तो मित्र-मैत्रिणींबरोबर एकदा पावभाजी खात होता. तेव्हा भरधाव वेगाने एक रिक्षा आली. त्यातून ‘एके-47’ घेऊन तीन तरुण खाली उतरले. पानपट्टीच्या दुकानावर असलेल्या एका माणसाला गचांडी धरून, भसाभस रिक्षात कोंबून आल्यापेक्षाही भरधाव वेगाने सुसाट गेले...तर तुम्ही मध्ये पडाल? एक तर पडायचे ठरवले तरी काय घडतेय, हे कळून तुम्ही मध्ये पडायच्या आधी प्रसंग संपूनसुद्धा गेलेला असतो. कारण अचानक घडणा-या प्रसंगाला तत्परतेने प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण आपल्याला नसते. आपले ‘रिफ्लेक्सेस’ तयार नसतात आणि समजा प्रशिक्षण झालेच असले, तरी घडणा-या प्रसंगातला चोर कोण आणि साव कोण, बळी कोण आणि कसाई कोण, गुन्हेगार कोण आणि सर्वसामान्य सज्जन-नागरिक कोण, की एकूणच दोघेही चोर, दोघेही कसाई, दोघेही गुन्हेगार, हे सर्व कसे ठरवणार? पण एकूण मिळून परिणाम काय, तर वेगवेगळ्या नेपथ्यांमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे गप्प बसणे, सोसणे आणि गप्प बसणे.
हे गंभीर आणि धोकादायक प्रसंग तर सोडाच, समोरची कचरापेटी चार दिवस साचत आली आहे. नागरिक तक्रार करील? रॉकेल, गॅस, टेलिफोन, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शाळांमध्ये प्रवेश, रेशन कार्ड, हजारो दाखले, परवाने, अर्ज, प्रत्येक पावलावर अपमान, हेळसांड, विलंब, गैरप्रकार घडले तर आपला नागरिक खवळून उठतो का? तर नाही. तो सर्वसाधारणपणे सोसतो, सहन करतो. झाला गेला प्रसंग साजरा करून आपले आयुष्य जगण्याच्या मार्गाला लागतो. आणि याचा दोष तरी कोणाला द्यायचा? साधे जगत राहणे, पावलापावलावर ठेचकाळणे, खडकावरती डोके आपटत राहण्याच्या लढाईतच आपल्या सर्वांच्या तोंडाला रोजच्या रोज इतका फेस येत असतो की तो फेस पुसून, छातीतला श्वास फुलवून एक गर्जना करण्यासाठी एवढी शक्ती, एवढा वेळ कोणापाशीही शिल्लक नसतो.
एकेकटा माणूस संघर्षाला, प्रतिकाराला उभा राहील, ही अपेक्षा नाही करता येणार. तो एकेकटा मोडून पडेल, पराभूत होईल. त्याला कापून काढणे सोपे जाईल. पण एकाच वेळी शेकडो, हजारो, लाखो जणांनी एकच छोटी, सामान्य कृती करायची ठरवली, तर! चौकामध्ये एकच माणूस उभा राहून काही हातवारे करायला लागला, तर सर्व ट्रॅफिक त्याला चुकवून वेडा ठरवत आपापल्या मुक्कामाला निघून जाईल. पण असे हजारो जण एका वेळी, ‘नीट’ असे हातवारे करायला लागले, तर त्याचे ‘कॅलेस्थेनिस’ होईल. ते दूरदर्शनवरून आंतरराष्ट्रीय उद्घाटन वा समारोप सोहळा म्हणून दाखवले जाईल. एकच माणूस गदारोळात उभे राहून ‘नवीन पर्व के लिए, नवीन प्राण चाहिए' म्हणून कितीही जोरात ओरडायला लागला,तरी त्याचा आवाज गदारोळात बुडून जाईल . टप्पू मारून त्याला गप्प बसवले जाईल. पण अशा हजारो गळ्यांतून एका वेळी ही कविवर्य ‘निराला’ची धून निघाली ‘नवीन प्राण’ निर्माण होईल.
मुंबईच्या रस्त्यांवर सकाळी सर्रास दिसणारे हे दृश्य आहे. कार्यालये सुटतात. माणसांचे थवेच्या थवे सीएसटी किंवा चर्चगेट रेल्वे स्थानकाकडे निघालेले दिसतात. ट्रॅफिकला अजून हिरवा सिग्नल चालू असला, तरी थवा हळूहळू पुढे सरकत येतो. माणसांच्या या थव्याला कोणीही थोपवू शकत नाही, ना कोणता अजस्र ट्रक, ना लाल सिग्नल, ना पोलिसांची शिट्टी. गर्दीची, समूहाची एक ताकद आहे. ती विघातकही असू शकते आणि विधायकही. मग एकच छोटी कृती, गळ्यातून येणारी एकच साधी धून, पण एकाच वेळी समूहातून उमटणारी संघटित कृती, अगदी साधीच कृती; पण एकाच वेळी केलेली, तर विधायक संघर्ष उभा राहील. माणसा-माणसाला बळ येईल. समूहाच्या आवाजातून ‘नवीन प्राण’ जन्माला येईल. लोकशाहीमध्ये घटनेने आखून दिल्यानुसार नागरिकांचा आवाज उमटवणारी एक अत्यंत साधी, पण प्रभावी कृती आहे, ती म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारणे किंवा आता बटण दाबणे. इतक्या साध्या कृतीतून सामान्य माणसाला इतका स्पष्ट आवाज उठवण्याचे बळ मिळणे, हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. पण असे दोनदा बटण दाबण्याच्या मधल्या काळाचे काय? पूर्वी हा मधला काळ चार-पाच वर्षांचा असे, म्हणे! आजकाल तो कमी-कमी होत चाललाय, होत जाणार आहे. तरी पण या मधल्या काळात असा काही आवाज उठवण्याच्या साध्या-साध्या कृती आहेत का? अशा कृती, की ज्या कोणालाही करता येतील, इतक्या साध्या सोप्या आहेत. तरीही एकत्रित, सामूहिकरीत्या केल्या, तर संघटित सामर्थ्य निर्माण होईल. अशी कृती की, जी तुमच्या-माझ्याकडून कसल्या तरी फार मोठ्या अचाट त्यागाची मागणी करणार नाही. पण छोटी-छोटी, साधी-साधी सामूहिक हालचाल मात्र करायला लावील. अशा ज्या अनेक कृती आहेत, त्यांचे एकत्रित नाव म्हणजे ‘नागरिक कृती योजना.’ तर अशा योग्य कृती आहेत, याचा प्रत्येकाने शोध घेणे गरजेचे आहे. आणि तो घेताना समुद्र रिकामा करण्याची उमेद बाळगून आपल्या चोचीत पाणी भरणा-या टिटवीची आठवण ठेवायची आहे.