आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.V.Jondhale's Artical On Dr. Babasaheb Ambedkar

मकरणपूर परिषदेची 75 वर्षे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निझामकालीन मराठवाड्यात दलित समाजाला अस्पृश्यतेच्या दुहेरी जाचाला तोंड द्यावे लागत होते. हिंदू समाजाकडून दलित समाजाला हीन वागणूक तर मिळतच होती; पण ज्या इस्लाम धर्मात जातिभेदाला स्थान नाही तो धर्म प्रमाण मानणा-या निझाम राजवटीतही दलितांना सामाजिक न्यायाची वागणूक मिळत नव्हती. दलितांना आर्थिक शोषणास तोंड द्यावे लागत होते. गावकीची कामे करणे, भीक मागणे व तुटपुंज्या बलुत्यावर जगणे असले कफल्लक अन् लाचार जिणे दलितांच्या वाट्याला आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निझाम संस्थानातील अस्पृश्यतेचा दाहक अनुभव 1934 मध्येच आला होता. हैदराबाद राज्यात तसेच मराठवाड्यात अस्पृश्यांना सवर्ण हिंदूंबरोबरच मुस्लिमांचाही जातीय त्रास सहन करावा लागतो हे बाबासाहेबांनी ओळखले. हैदराबाद राज्यातील अस्पृश्यता संपवायची तर मराठवाड्यात जनजागरण केलेच पाहिजे. या जनजागरणाचा एक भाग म्हणूनच बाबासाहेबांनी 1950 मध्ये औरंगाबादेत मिलिंद महविद्यालय सुरू केले हे विशेष उल्लेखनीय. मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबर 1938 रोजी मकरणपूर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत जी परिषद झाली त्या परिषदेचा परिणाम म्हणून दलित समाजात जागृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली व दलितोद्धाराच्या चळवळीने गती घेतली. मकरणपूरची परिषद आयोजित करण्यात शामराव जाधव यांचा मोठा वाटा होता. याचा परिषदेपासून स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे या झुंजार नेतृत्वाचा उदय मराठवाड्यात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निझाम संस्थानात प्रवेशबंदी होती. बाबासाहेबांनी म्हणूनच त्या वेळी मराठवाड्याच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्यातील मकरणपूर (आता ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील परिषदेला उपस्थित राहून दलित समाजात अस्मिता जागविणारे प्रबोधन केले होते. बाबासाहेब या परिषदेत भाषण करताना म्हणाले होते, ‘इस्लाम धर्मात श्रीमंत व गरीब एकाच मशिदीत बसू शकतात असे सांगण्यात येते. पण याच निझाम सरकारच्या राज्यात मुसलमान बांधवांनी अस्पृश्यता पाळावी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.’
बाबासाहेब पुढे म्हणाले, हैदराबाद संस्थानात अस्पृश्यांकरिता शाळा नसाव्यात ही आश्चर्याची बाब आहे. मी लंडन येथे असताना पुष्कळ विद्यार्थी निझामाची शिष्यवृत्ती घेऊन शिकायला आले होते. पण यात एकही महार, मांग वा चांभार नव्हता. बडोदा सरकारप्रमाणे हे सरकार वागेल अशी माझी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निझामविरोधी भूमिका घेतली याचा अर्थ बाबासाहेब मुस्लिमद्वेष्टे होते असा मात्र नव्हे. निझामाच्या पाताळयंत्री देश व दलितविरोधी राजवटीस बाबासाहेबांचा विरोध होता. राष्टÑभक्त बाबासाहेब म्हणूनच निझामविरोधी भूमिका घेताना हैदराबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाले पाहिजे अशीच भूमिका ठासून मांडत होते. मकरणपूरच्या परिषदेतही त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
मकरणपूरच्या परिषदेचा परिणाम म्हणून दलित समाजाची निझामविरोधी चळवळ संघटित झाली. भाऊसाहेब मोरे यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील गावोगावी जाऊन सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबवत असतानाच निझामाविरोधही तीव्र केला. भाऊसाहेब मोरे यांच्यासह एस.एन. शिरसाठ, टी.जी. खरात, चोखोबादादा साठे, भागीनाथ बंजारे, सावळाराम त्रिभुवन, व्ही.एल. सुरवसे, माधवराव नेरलीकर, प्रभाकरराव हिंगोले, चोखोबा पैलवान जोंधळे, दशरथ साळवे, दंडू किसन कांबळे, रायभान पारखे, सेवाजी भराडे, माजी खासदार हरिहरराव सोनुले, कडकनाथ हटकर आदींनी निझामविरोधी भूमिका घेतानाच जनजागरणाच्या चळवळी हाती घेतल्या. मकरणपूर परिषदेचा परिणाम म्हणून मराठवाड्यात दलित समाजात प्रबोधनाची एक लाट आली.
विशेषत: भाऊसाहेब मोरे यांनी सामाजिक सुधारणेचे अनेक प्रयोग मराठवाड्यात राबविले. उदा.- दलित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून भाऊसाहेब मोरे व त्यांचे सहकारी नारायणराव जाधव, गणोरकर, एन.डी. नगारे, आसाराम डोंगरे, एन.जी. शिरसाठ, बन्सीलाल कुरील आदींनी खेड्यापाड्यांतून धान्य गोळा करून 50 विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले होते. तसेच बाबासाहेबांना औरंगाबादेत महाविद्यालय सुरू करा असेही मोरेंनी सुचविले आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर गावोगावी प्रचार करून विद्यार्थी महाविद्यालयात आणले. अस्पृश्य समाजातील पोटजातीचे वाद मिटवून त्यांनी सहभोजन करावे व आपसात बेटी व्यवहार करावा असाही प्रयत्न भाऊसाहेब मोरेंनी केला. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन दलित समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आंबेडकर जयंती, व्याख्याने, जलसे असे कार्यक्रम हाती घेतले. मकरणपूरच्या परिषदेपासून प्रेरणा घेऊन हैदराबादच्या मुक्तिलढ्यात दलित स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला. दलित स्वातंत्र्यसैनिकांनी हैदराबाद मुक्तिलढ्यातील योगदान काही हितसंबंधी लोकांनी जरी नाकारले असले तरी बहुतेकांनी दलित स्वातंत्र्यसैनिकांची नोंदही घेतली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी दलित समाजाचे कार्यकर्ते आमच्या लढ्यात सहभागी होते असे म्हटले आहे. (दै. प्रजावाणी दि. 11-08-1981) हैदराबाद मुक्तिसंग्राम या पुस्तकाचे लेखक प्रा. उत्तम सूर्यवंशी यांनी म्हटले आहे : या लढ्यात हिंदू, समंजस मुस्लिम, दलित, आदिवासी व स्त्रियांनी सहभाग नोंदविला आहे. आर्यवीर दलाचे स्वयंसेवक जगदीश आर्य (हैदराबाद) यांनी म्हटले : मराठवाड्यातील दलितांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय मदत केली. वसंत ब. पोतदार यांनी हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम या ग्रंथात मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांबरोबरच दलित स्वातंत्र्यसैनिकांची व हुतात्म्यांची नावे नोंदविली आहेत. अनंत भालेरावांनीही हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा या ग्रंथात दलित हुतात्म्यांचा उल्लेख केला आहे.
हुतात्मा दर्शन या जिल्हा माहिती पुस्तिकेतही दलित हुतात्म्यांची नावे आढळतात. स्वातंत्र्य चळवळीतील दलितांच्या सहभागाचा शासकीय पुरावा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक चरित्र कोश, महाराष्टÑ राज्य मराठवाडा विभाग हा ग्रंथ होय. दलितांनी आर्य समाजाच्या चळवळीतही भाग घेतला. जंगल सत्याग्रहातही ते होते. मकरणपूरच्या परिषदेमुळे मराठवाड्यात राजकीय आणि सामाजिक चळवळीने गतिमानता धारण केली पण खेदाची बाब अशी की, ज्या मकरणपुरात बाबासाहेबांच्या उपस्थितीत ऐतिहासिक परिषद झाली व ज्या परिषदेमुळे मराठवाड्यात समाजप्रबोधनाची पहाट उगवली त्या मकरणपूरच्या परिषदस्थळी कुठलेही स्मारक आज उभे नसून ती जागा पडीत अन् ओस पडली आहे. या दैवदुर्विलासास काय म्हणावे?