आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.V. Jondhale Article About Buddha Religion,Divya Marathi

बौद्ध साहित्य संमेलन की जात संमेलन?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बौद्ध साहित्य संमेलनाच्या आयोजकांची भूमिका अशी की, भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित वाङ्मय म्हणजे बौद्ध साहित्य होय, तर डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मते बुद्धविचार समजण्यासाठी त्रिपिटकाचा चिकित्सक अभ्यास करतानाच त्रिपिटकाचे तसेच संस्कृत भाषेतील बौद्ध वाङ्मय व सिंहली, थाई, बर्मी, तिबेटी, चिनी इत्यादी भाषांतील बौद्ध वाङ्मयाचे मराठी भाषेत भाषांतर करून पाली भाषा, जातक कथा, बौद्ध कलांचाही अभ्यास झाला पाहिजे. राजा ढालेंच्या मते दलित म्हणजे दडपलेले, बौद्ध आता दडपलेले नसल्यामुळे त्यांच्या साहित्याला बौद्ध साहित्य म्हणावे.
1967-68 मध्ये उदयास आलेल्या ज्या दलित साहित्याने प्रस्थापित-पांढरपेशा साहित्य विश्वास हादरा दिला त्या दलित संकल्पनेची डॉ. म. ना. वानखेडे, प्राचार्य म. भि. चिटणीस, प्रा. वा. ल. कुलकर्णी, बाबूराव बागूल, रा. ग. जाधव, मे. पु. रेगे प्रभृतींनी अशी व्याख्या केली की, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या जे जाती, वर्ग, समूह-पिडले गेले त्यांनी अभिव्यक्त केलेले जीवनानुभव म्हणजे दलित साहित्य होय. या संकल्पनेनुसारच दाहक दलित जीवनानुभव लेखनाच्या-कवितेच्या रूपात प्रकट होऊ लागले. दलित साहित्याची व्यापक संकल्पना स्वीकारून दलितेतर लेखक-कवी दलित साहित्य प्रवाहात सामील झाले. या पार्श्वभूमीवर दलित शब्द नाकारून बौद्ध शब्द आणला म्हणजे आपण फार क्रांतिदर्शी साहित्य संकल्पनेचे भाष्यकार ठरतो, असे जे मानतात तो त्यांचा खुळेपणाच नसून संकुचित मनोवृत्तीचा पोरकट नमुनाच आहे, याविषयी शंका नसावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समस्त दलितवर्गाला एका झेंड्याखाली आणावयाचे होते. या आंबेडकरी विचारातूनच दलित साहित्य संकल्पनेचा उदय झाला. दलित साहित्य चळवळीचा परिणाम म्हणून ग्रामीण आदिवासी, विद्रोही साहित्य संकल्पना स्वीकारूनच डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फ. मुं. शिंदे, लक्ष्मण माने, बापूराव जगताप, भास्कर चंदनशिव, लहू कानडे, लक्ष्मण गायकवाड, चंद्रकुमार नलगे यांच्यासारखे बहुजन समाजातील लेखक-कवी दलित साहित्य प्रवाहात सामील झाले. पु. ल. देशपांडे, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. भालचंद्र नेमाडे, के. रं. शिरवाडकर, डॉ. प्रभाकर मांडे, दलित साहित्याच्या प्रेमात पडले. तत्कालीन दैनिक ‘मराठवाडा’ने दलित साहित्यावर पहिला दिवाळी अंक काढला होता. गं. बा. सरदार, लक्ष्मणशास्त्री जोशी, यांनी मुंबई दलित साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली होती. दलित साहित्य इंग्रजी, तेलुगु, मल्याळम, कन्नड, हिंदी, ओरिया भाषेत गेले. दया पवार, लक्ष्मण माने यांना अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशनची पारितोषिके मिळाली. तेव्हा व्यापक दलित साहित्य संकल्पना नाकारून संकुचित मनोवृत्तीचा आविष्कार करणारी एकजातीय-एकधर्मीय बौद्ध संकल्पना स्वीकारणे म्हणजे आंबेडकरवादाला छेद देणेच नव्हे काय?
बौद्ध साहित्य संमेलनाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या प्रश्नांचा विचार करावयाचा असेल तर त्यासही हरकत नाही; पण त्रिपिटकाचा चिकित्सक अभ्यास केला वा इतर भाषेतील बौद्ध वाङ्मयाचे मराठी भाषेत भाषांतर केले म्हणजे बौद्ध समाजाचे प्रश्न सुटणार आहेत काय? बौद्ध तरुणांची बेकारी मिटणार आहे काय? त्यांना उच्च दर्जाचे महागडे शिक्षण मिळणार आहे काय? खेड्यापाड्यातील दलित शोषित समाजाचे हाल संपणार आहेत काय? आणि मूळ प्रश्न असा की, स्वत:ला बौद्ध विचारवंत म्हणवणारी तथाकथित बुद्धिवादी मंडळी (एखाद्-दुसरा अपवाद) वगळता बौद्धांच्या ज्वलंत प्रश्नांवर कुठली ठोस भूमिकाच घ्यायला तयार नाहीत, त्याचे काय? मतलबी स्वार्थाखातर शिकले-सवरलेले बौद्धच विषारी प्रादेशिकवादी राजकारणाचाही अवलंब करतात, त्याचे काय? स्वत:ला बुद्धाचे अनुयायी म्हणवणारा बौद्ध समाज पोटजातीही पाळतो हे कसे? सवलतीच्या संधीवर शिक्षण-नोकर्‍या
मिळवणारा बौद्ध समाज आता लाखांनी हुंडाही घेऊ लागला आहे आणि लग्नातून श्रीमंतीचे-बडेजावाचे उर्मट प्रदर्शनही करू लागला आहे. यालाच बौद्ध संस्कृती म्हणावी काय?
दलित लेखकांनी मराठीतील बुद्धिवादी-कलावंत-लेखकांना सामाजिक सुख-दु:खाशी काहीही देणेघेणे नाही, मराठी साहित्य हे साडेतीन टक्केवाल्यांचे सदाशिवपेठी साहित्य असल्याचा विद्रोही शिक्का मारला होता. तो बरोबरही होता, पण आता बौद्ध साहित्याच्या नावाखाली आपणही संकुचित मनोवृत्तीच अनुसरत आहोत, हे का नाकारावे? खरे तर बौद्ध समाजाचे स्वाभिमानी जीणे, शिक्षणात या समाजाने घेतलेली भरारी सवर्ण मानसिकतेला सहन न झाल्यामुळे बौद्ध आणि बौद्धेतर दलित जातींत फूट पाडण्याचे कारस्थान सनातनी शक्ती करीत असतात. परिणामी बौद्ध समाज आजही मित्राअभावी एकाकी पडला आहे. अशा स्थितीत बौद्ध साहित्याची वेगळी चूल मांडणारे सर्व दलित शोषित वर्गाला सोबत घेण्याचे प्रगल्भ साहित्यकारण न करता संकुचित मनोवृत्तीचाच आविष्कार करीत आहेत, ही बाब आंबेडकरवादाशी सुसंगत ठरते काय, याचे उत्तर लातूरच्या बौद्ध संमेलनातून मिळावे, अशी अपेक्षा आहे.