आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B. V. Jondhale Writes About Religion Conversion And Temple Entrance

धर्मांतर आणि मंदिर प्रवेश (बी. व्ही. जोंधळे )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आईने आणि भावाने १४ एप्रिल रोजी मुंबई येथे दादरच्या आंबेडकर भवनात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अर्थात यामुळे हिंदू धर्मपीठास हादरा वगैरे बसला असे काही नाही. कारण एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलताना सनातनी धर्माचा एक प्रवक्ता म्हणाला हे धर्मांतर म्हणजे एक राजकारण आहे. रोहितची आई राधिका वेमुला आणि भाऊ राज वेमुला यांची मात्र या संदर्भातील प्रतिक्रिया अशी की, ‘पूर्वी आम्ही बौद्ध नव्हतो, तरीही बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेनेच जात होतो. जातीयवादी हिंदू धर्म त्यागल्याने खऱ्या अर्थाने आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत.'
पण वेमुला कुटुंबीयांची ही भावना जाणीवपूर्वक दुर्लक्षून त्यांच्या धर्मांतराला राजकारण म्हणणारी सवर्ण मानसिकता रोहित कुटुंबीयांच्या धर्मांतरापासून काही शिकण्यास तयार नाही हे उघड आहे. कारण वर्णव्यवस्था ही ईश्वरनिर्मित असल्यामुळे भेदाभेद पाळण्यात काहीच गैर नाही, असे हिंदुत्ववाद्यांचे गोळवलकरकृत ‘विचारधन’ सांगते. पण मुद्दा असा की, वेमुला कुटुंबीयांचे धर्मांतर हे जर राजकारण असेल तर ज्यांनी इस्लाम, ख्रिस्ती, बौद्ध धर्म घेतला त्या धर्मांतरामागे कोणते राजकारण होते? येथील समाजव्यवस्थेने माणसांना धर्म, जाती, रूढी, परंपरांचा आधार घेऊन पशुतुल्य वागणूक दिली म्हणूनच कोट्यवधी लोकांनी धर्मांतर केले ना? पण कितीही धर्मांतरे झाली तरी निगरगट्ट नि बुरसटलेली हिंदू मानसिकता बदलायला तयार नाही. सबब धर्मांतरात त्यांना राजकारण दिसले तर नवल नव्हे. जातिव्यवस्थेचे समर्थक म्हणतात, जाती या समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून रूढ करण्यात आल्या. प्रश्न असा की, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जर जातिव्यवस्था रूढ करण्यात आली असेल तर मग ती कुणाच्या फायद्याची ठरली? मूठभर उच्चवर्णीयांच्याच ना? दलितांवर अत्याचार करून त्यांना सत्ता, संपत्ती, ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आले ना? या स्थितीस कंटाळूनच भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे झाली ना? तरीही मनुग्रस्त हिंदू मानसिकता जातिव्यवस्थेवर प्रहार न करता, बाबासाहेबांच्या धर्मांतरास ‘बाबासाहेबांची उडी हिंदू धर्माच्या रिंगणातच पडली’ अशा शब्दांत हिणवते आणि वेमुला माता-पुत्राच्या धर्मांतरात त्यांना राजकारणही दिसते. बरे, वेमुला कुटुंबीयांच्या धर्मांतरास कुणाचे राजकारण कारणीभूत ठरले? तर भाजप-संघाचेच ना? रोहितने याकूब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने एकूणच फाशीच्या शिक्षेविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे संघ परिवाराच्या कटकारस्थानातून त्याच्या मित्रासह त्याला वसतिगृहातून काढून टाकण्यात येते, त्याची शिष्यवृत्ती बंद करण्यात येते, या जीवघेण्या स्थितीला कंटाळून रोहित आत्महत्या करतो, तेव्हा त्यास आत्महत्येस प्रवृत्त करणारे जातीय राजकारण खेळणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांनी वेमुला कुटुंबीयांच्या धर्मांतरास राजकारण म्हणावे हा दांभिकपणा नव्हे का? अलीकडे हिंदू राष्ट्र निर्मितीच्या धर्मांध संकल्पनेने पछाडलेल्या मंत्री, आमदार, खासदार, साधू, साध्वी, बाबांना जो धर्मांध कंठ फुटला आहे त्याचे काय? एकुणात जातिव्यवस्था मोडायची तर डॉ. आंबेडकरांची धम्म चळवळ गतिमान करण्याची गरज आहे. याच संदर्भात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या शनिमंदिर प्रवेश आंदोलनाकडे पाहावे लागेल.
तृप्ती देसाई यांच्या ब्रिगेडने शनिशिंगणापूर, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तसेच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणजे जे आंदोलन केले ते बरोबरच आहे. पण यातील गुंता असा की, कायदा जरी तृप्ती देसाईंच्या बाजूला असला तरी रूढिग्रस्त समाज त्यांच्याबरोबर नाही. तृप्ती देसाईना कोल्हापुरात जी मारहाण झाली त्याचाही म्हणूनच स्त्री-पुरुष समतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी कुठे निषेध केल्याचे दिसले नाही. तेव्हा ज्या हिंदू धर्ममार्तंडानी व परंपरावादी समाजाने देवदर्शनासाठी महिलांना अपवित्र ठरवून लाथाडण्याची सनातन रूढी-परंपरा स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही कायम ठेवली त्या लाथाडणाऱ्या रूढी-परंपरांवाद्यांच्या देवळात जाण्याचा अट्टहास तृप्ती देसाईंनी तरी का धरावा? न्यायालयाच्या निर्णयामुळे तृप्ती देसाईंना भलेही मंदिर प्रवेश मिळालेला असला तरी स्त्रियांना हीन लेखण्याची रूढी-परंपरावाद्यांची मानसिकता बदलली असे कसे म्हणता येईल? त्याशिवाय का तृप्ती देसाईंना कोल्हापुरात मारहाण झाली? आता त्या द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचेच पाहा ना! त्यांनी म्हटले शनीच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले तर महिलांवरील बलात्कार वाढतील. प्रश्न असा की, जिथे शनिमंदिरेच नाहीत अशा परदेशातही बलात्कार होत असतात त्याचे काय? साईबाबांनी स्वत:ला देव म्हणविले नाही. भेदभाव केला नाही. रंजल्या-गांजल्याची सेवा केली. पण त्यांची पूजा करू नका अशी मुक्ताफळे उधळून शंकराचार्य समाजात फूट पाडीत आहेत. तात्पर्य, हिंदू धर्मपीठाचा एक प्रमुखच स्त्रियांची अवहेलना करीत असेल, सामाजिक एकोप्यास धक्का पोहोचवत असेल आणि हाच हिंदू धर्म असेल तर मग तृप्ती देसाई मंदिर प्रवेशाच्या मळलेल्या वाटेनेच का जात आहेत? यामुळे स्त्रियांची रूढी-परंपरेतून मुक्तता होणार आहे की महिलांचे प्रश्न सुटणार आहेत? यापेक्षा जो धर्म स्त्रियांना हीन लेखून मंदिर प्रवेश नाकारतो तो धर्मच सोडून बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माचा मार्ग तृप्ती देसाई का अंगीकारत नाहीत? म. फुले, सावित्रीबाई फुलेंमुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे मोकळी झाली. मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी स्त्रियांची अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी-परंपरेतून मुक्तता केली. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच मनूचा कायदा अस्तित्वात येऊ शकला नाही. अन्यथा स्त्रियांना शिक्षण जसे नाकारले गेले असते तसेच सती प्रथेचे उदात्तीकरण करून त्यांचे केशवपनही केले गेले असते. पण फुले-आंबेडकरांमुळे हे होऊ शकले नाही. फुलेंनी सत्य धर्माचा आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा मार्ग दाखविला. त्याचा विचार का होऊ नये? तृप्ती देसाईंना कायद्यानुसार शनिशिंगणापूर प्रवेश मिळाल्यानंतर कोल्हापुरात त्यांनी विजय मिरवणूक काढली. सामाजिक प्रश्न असे कोण जिंकले कोण हरले अशा अाविर्भावातून सोडवायेच नसतात तर ते सामंजस्याने हाताळायचे असतात. तात्पर्य, तृप्ती देसाईंनी मंदिर प्रवेशात व्यर्थ शक्ती न दवडता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मवाटेने गेलेले बरे. तृप्तींना खरोखरच बाबासाहेबांचा क्रांतिकारी मार्ग पेलवेल काय?