आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B V Jondhale Article About Dalit Movement And Congress And NCP

दलितांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर रोष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलितांना सतत फसवण्याचा आणि आंबेडकरी चळवळीचा तेजोभंग करण्याचाच गोरखधंदा काँग्रेसने सातत्याने केला. हे कसे विसरता येईल? काँग्रेसने दलितांबरोबर बेइमानी, दगलबाजी करताना सरंजामी-सामंती कुटुंबशाहीच्या नात्यागोत्याचे राजकारण करून दलितांना सत्तेत सहभागी करून न घेता त्यांच्यावर वरपासून खालपर्यंत राज्य मात्र केले. या कुटील काँग्रेसी डागण्या दलितांनी कशा विसराव्यात?
16 व्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसचा आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जो धुव्वा उडाला, ती बाब आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने एक इष्टापत्तीच म्हटली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या प्रचारकाळात हिंदूंच्या चष्म्यातून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही मानणार्‍या आंबेडकरवाद्यांना ती मान्य जरी नसली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळते घर आहे, असे जे म्हटले होते. त्याचा सुखद प्रत्यय ताज्या लोकसभा निवडणुकीत जर येऊन गेला असेल, तर त्याचा आनंद आंबेडकरानुयायांनी का व्यक्त करू नये? कारण काँग्रेसने आजवर प्रत्येक निवडणुकीत दलित समाजाचा वापर करून त्यांना फेकून देण्याचा, दलितांना सतत फसवण्याचा आणि आंबेडकरी चळवळीचा तेजोभंग करण्याचाच गोरखधंदा सातत्याने केला. हे कसे विसरता येईल? काँग्रेसने दलितांबरोबर बेइमानी, दगलबाजी करताना सरंजामी-सामंती कुटुंबशाहीच्या नात्यागोत्याचे राजकारण करून दलितांना सत्तेत सहभागी करून न घेता त्यांच्यावर वरपासून खालपर्यंत राज्य मात्र केले. या कुटील काँग्रेसी डागण्या दलितांनी कशा विसराव्यात?
काँग्रेसी राज्यात दलित समाजावर खेडोपाडी रानटी अत्याचार सातत्याने होत आले. खैरलांजीसारखे दलित महिलांवर बलात्कार करून त्यांचे मुडदे पाडणे, उच्चजातीय मुलींशी लग्न केले म्हणून कुणाचे डोळे फोडणे, कुणाला हालहाल करून मारणे, ग्रामीण भागात दलित ताठ मानेने वावरतात म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, दलित वस्त्यांवर हल्ले करणे असे शेकडो प्रकार काँग्रेसी राज्यात घडत आले आहेत; पण या शासनाने या अत्याचारांकडे दुर्लक्षच केले. शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील सवर्ण धनदांडग्यांना दलितांवर अत्याचार करताना कायद्याची भीती कधी वाटलीच नाही. उलट खैरलांजीप्रकरणी नागपूरला जेव्हा दलित युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला, तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दलित संतापाचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले. एखाद्या शासनाने दलितांप्रति इतके असहिष्णू असावे? नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा वर्तनव्यवहार असाच राहत आला. तेव्हा दलितांना देशभर सुरक्षा न देणारे सरकार जर बुडाले असेल आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवाचे वर्तुळ पूर्ण होणार असेल, तर दलितांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अश्रू का ढाळावेत?
काँग्रेस पुढार्‍यांचा अजून एक गुन्हा असा की, दलित पुढार्‍यांना वेगवेगळी आमिषे दाखवून रिपब्लिकन चळवळ तोडण्याचे पाप काँग्रेसनेच केले. माणसात माणूस आणि घराला घर राहू दिले नाही. तेही काँग्रेसनेच. रिपब्लिकन ऐक्य केव्हा करायचे आणि केव्हा फोडायचे याचे पडद्यामागचे सूत्रधार काँग्रेसवालेच राहत आले. दलितांच्या राजकारणाची पुरती वाट लावून रिपब्लिकन चळवळ मोडीत काढणारी काँग्रेस जर आता भुईसपाट होत असेल, तर आंबेडकरी समाजाने वाईट का वाटून घ्यावे?
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपेक्षा करतानाही कुठलीच हयगय केली नाही. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देताना 17 वर्षे आंबेडकरानुयायांना झुलवत ठेवले. अखेर तडजोडीतून विद्यापीठाचे नामांतर नव्हे, तर नामविस्तार केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समाजावर जे अत्याचार झाले, त्याबद्दल सोनिया गांधींनी शीख बांधवांची माफी मागितली; पण मराठवाड्यात नामांतर प्रकरणात खेडोपाडी दलित समाजावर जे अत्याचार झाले, त्याबाबत कोणा समाजवाद्याने, गांधीवाद्यांनी सोडाच; पण नामांतराचे जे कोणी ‘जाणते राजे’ शिल्पकार म्हणवतात त्यांनीसुद्धा दलित समाजाची कधी माफी तर सोडा, पण खेदही व्यक्त केलेला नाही. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाधी, ती राजधानी दिल्लीत नसल्यामुळे बाबासाहेबांचा समावेश राष्ट्रीय नेत्यांत करता येत नाही, असे केंद्र सरकारच्या बांधकाम विभागाने जाहीर केले होते. तेव्हा अशी ही आंबेडकरविरोधी काँग्रेस नाका-तोंडात पाणी जाऊन बुडत असेल, तर शोक कोणी व्यक्त करावा?
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दलितप्रेमाचे नाटक करताना दलितांच्या झोपडीत जाऊन त्यांच्या हातचा घासकुटका जरूर खाल्ला; पण याच राहुल गांधींनी मध्यंतरी औरंगाबाद भेटीत महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधताना ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले, त्या विद्यापीठास भेट देण्याची आवश्यकता का भासली नाही? खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बाबासाहेबांच्या मिलिंद परिसरात शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटकांतील दलित विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात; पण दलितप्रेमाचा देखावा करणार्‍या राहुलनी या परिसरातील विद्यार्थ्यांची भेट टाळून हाय-फाय विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. शिवाय खैरलांजी गावास सोनिया गांधी यांना भेट द्यावीशी वाटली नाही. अथवा राजीव गांधी हत्येप्रकरणात नलिनीची भेट घेणार्‍या प्रियंका गांधी यांनाही वाटली नाही, ना राहुल गांधी यांना तशी गरज जाणवली. तेव्हा दलित प्रेमाचे नाटक करणार्‍या दलितांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाचा कोणताही ठोस अजेंडा न राबवणार्‍या काँग्रेस सरकारला मतदारांनी जर अस्मान दाखवले असेल, तर यासारखी परमसंतोषाची दुसरी कोणती गोष्ट असू शकेल! अर्थात, भविष्यात काँग्रेस कधीच उभारी घेणारच नाही, असे नाही. लोकशाहीत जय-पराजय होतच असतात. हेच तर खरे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे; पण काँग्रेसच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून धडा शिकवणे गरजेचे होते. ते काम मतदारांनी चोखपणे बजावले, हे चांगलेच झाले. काँग्रेसचा पराभव महागाई, बेकारी, भ्रष्टाचार यामुळे झाला, हे आता काँग्रेसने मान्यच केले आहे. शिवाय केलेल्या चांगल्या कामाचे मार्केटिंग पक्षाला करता आले नाही, म्हणून पक्षाचा पराभव झाला, असेही एक कारण पुढे केले जात आहे. काही अंशी हे खरेही आहे; पण महत्त्वाचे असे, काँग्रेसचा समाजहिताचा कळवळा लोप पावून या पक्षाचे लोक आपला व्यक्तिगत स्वार्थ साधण्यात मश्गुल झाले, म्हणूनही काँग्रेसचा पराभव झाला, हे विसरता येत नाही. दलित, मुस्लिम, आदिवासी यांना गृहित धरून आत्मवंचनेचे बेजबाबदार राजकारण केले, याची प्रांजळ कबुली काँग्रेसचे नेते अजूनही देत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे सरकार हे गरीब, उपेक्षित, वंचितांसाठी काम करेल अशी ग्वाही दिली आहे. पंतप्रधानांचे हे अभिवचन निश्चित स्वागतार्ह आहे. कारण मतदारांनी भाजपच्या हिंदुत्वाला मत दिले नसून त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला मतदान केले आहे. पंतप्रधानांना याची जाणीव आहे; पण उपेक्षित-वंचितांसाठी काम करण्याचा संकल्प मोदींच्या पाठीशी असलेले कॉर्पोरेट जगत कितपत सफल होऊ देईल, हा प्रश्नच आहे. शिवाय हिंदुत्ववादी परिवारातील काहींना राम मंदिर बांधावयाचे आहे. अयोध्या तो सिर्फ झांकी है, काशी-मथुरा बाकी है, हा पण तडीस न्यायचा आहे. काहींना समान नागरी कायदा हवा आहे. काहींना पाकिस्तान तसेच मुस्लिमांना धडा शिकवायचा आहे. काहींना दलितांचे आरक्षण काढून घ्यावयाचे आहे. हिंदुत्ववाद्यांच्या या धर्मांध आव्हानांना पंतप्रधान कसे तोंड देतात, हे पाहावे लागेल; पण या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, देशभरातील दलित मतदारांनी भाजपच्या हिंदुत्वावादाच्या बागुलबुवाला भीक न घालता, मोदींच्या विकास संकल्पनेस मतदान केले आणि काँग्रेसचा सफाया केला. अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वास्तवाची जाण ठेवून देशभर दलित समाजावर होणारे अमानुष अत्याचार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करतानाच दलित समाजाच्या सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक विकासाठी भरीव प्रयत्न करतील, अशी अपेक्षा केली, तर ती गैर ठरू नय; अन्यथा ज्या गतीने मोदी लाट आली, त्या गतीनेच ती विरायला वेळ लागणार नाही. हे वेगळे सांगायची गरज नाही.